आमचा पंत आणि तुमचा मेअर्स!

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com
Sunday, 14 February 2021

सप्ततारांकित
चेन्नईत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा मोठा पराभव होईपर्यंत ब्रिस्बेनमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर सगळ्या क्रिकेटविश्वासाठी एक आश्चर्यच होतं. त्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात खरं तर दुसऱ्या पसंतीचा यष्टिरक्षक असलेला रिषभ पंत हीरो झाला होता.

चेन्नईत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा मोठा पराभव होईपर्यंत ब्रिस्बेनमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर सगळ्या क्रिकेटविश्वासाठी एक आश्चर्यच होतं. त्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात खरं तर दुसऱ्या पसंतीचा यष्टिरक्षक असलेला रिषभ पंत हीरो झाला होता. ‘ईंट का जबाब पत्थर से’ अशा पद्धतीनं त्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर केलेला हल्ला हा ऑस्ट्रेलियाचे समर्थक असलेल्यांनाही मनमुराद आनंद देणारा होता. भारतीय क्रिकेटमध्ये काहीही घडलं तरी त्याची दखल क्रिकेटविश्वात घेतली जाते, त्यानुसार पंतचा उदो उदो सुरू होता. दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये बलाढ्य संघांसाठी ‘गिऱ्हाईक’ असलेला, आणि त्यातही दुसऱ्या फळीचा वेस्ट इंडीज संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्यासाठी वेस्ट इंडीजच्या प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली, त्यामुळे नवोदितांसाठी दारं उघडली गेली. वन डे मालिकेत त्यांचा पराभव झाला. आता याचीच पुनरावृत्ती कसोटीतही होणार या अपेक्षेनं सर्वांनीच तिकडे दुर्लक्ष केलं; परंतु ऑस्ट्रेलियात मर्दुमकी गाजवणारा तोच भारतीय संघ इंग्लंडपुढं निष्प्रभ होत असताना बांगलादेशातील चतोग्राममध्ये एका चित्त्यानं डरकाळी फोडली...त्याचा आवाज इतका बुलंद होता, की आख्ख्या क्रिकेटविश्वाला त्याची दखल घ्यावी लागली. क्रिकेटमधला हा नवा वाघ आहे वेस्ट इंडीजचा कायले मेअर्स!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘रिषभ पंत हा शेर आहे, तर मेअर्स सव्वाशेर आहे,’ असं म्हणायला हरकत नाही. कारण, पंतच्या दोन पावलं पुढं जाऊन त्यानं इतिहास घडवला. वेस्ट इंडीजला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान होतं. मुळात, प्रमुख खेळाडूंची माघार; त्यात हे नवखे काय करणार, असा सर्वांचा अंदाज; पण आत्ताची पिढी हार मानणारी नाही याचं प्रत्यंत्तर आलं. प्रचंड मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मेअर्सनं नाबाद २१० धावा ठोकल्या. पहिल्या तीन फलंदाजांनी संघाच्या खात्यात जेमतेम अर्धशतकी धावा जमा केल्या होत्या. अशा परिस्थितीत मेअर्स मैदानात आला होता. खरं तर, त्या वेळी वेस्ट इंडीजच्या पराभवाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे असंच चित्र होतं; पण मेअर्सनं अफलातून टोलेबाजी करत द्विशतक केलं आणि संघाला तीन विकेटनं विजय मिळवून दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतनं जे काही केलं तो ब्रिस्बेनमधला चमत्कार होता, तर मेअर्सनं बांगलादेशात जे काही केलं तो कल्पनेच्याही पलीकडचा अद्भुत आविष्कार होता. मुळात, त्याचा तो पहिलाच सामना होता. आपल्या पंतकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा चांगला अनुभव तरी आहे; पण मेअर्स तर पहिल्यांदाच कसोटीक्रिकेट खेळत होता. त्यातही दुसऱ्या डावात द्विशतक म्हणजे अलौकिकच. कसोटीत चौथ्या डावात द्विशतक करणं हेच मुळात कठीण आणि त्यात संघाला विजय मिळवून देणं हे तर महाकठीणच.

गॉर्डन ग्रीनिज यांची आठवण
दुसऱ्या डावात द्विशतक आणि संघाचा विजय असं कसोटीक्रिकेटच्या इतिहासात एकदाच घडलं आहे. अशी अद्वितीय कामगिरी वेस्ट इंडीजच्या बार्बाडोस बेटावरील गॉर्डन ग्रीनिज यांनी इंग्लंडविरुद्ध सन १९८४ मध्ये केली होती. २४२ चेंडूंत नाबाद २१४ धावा त्यांनी कुटल्या होत्या. इयन बोथम, बॉब विलिस आणि डेरेक प्रिंगल अशा निष्णात गोलंदाजांची दाणादाण उडवणारी ती खेळी होती. 

‘रात्रीचा हँगओव्हर होता आणि समोर येणारा चेंडू फटकवायचा एवढंच दिसत होतं. त्याच आवेशात मी फलंदाजी केली,’ असं ग्रीनिज यांनी तेव्हा म्हटलं असल्याची नोंद आहे. ते खरंही असेल; पण आत्ताच्या क्रिकेटमध्ये असा हँगओव्हर असू शकत नाही. मात्र, अशी अलौकिक फलंदाजी ‘आठवणींचा हँगओव्हर’ वर्षानुवर्षं ठेवू शकते हे निश्चित! मेअर्स हाही ग्रीनिज यांच्या बार्बाडोसचाच. फ्रँक वॉरेस, गॅरी सोब्रर्स आणि ग्रीनिज यांचा सलामीचा साथीदार डेस्मंड हेन्स यांची परंपरा मेअर्सनं जागवली.

हजरजबाबी!
आक्रमकता ही कॅरेबियन खेळाडूंच्या नसानसात भिनलेली आहे. कधी काळी ‘क्रिकेटमधले दैत्य’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं; पण सध्या फुटबॉल आणि ॲथलेटिक्सकडे तिथल्या खेळाडूंची ओढ असल्यानं क्रिकेटकडे येणारा तरुणाईचा ओघ आटला असल्याचं वेस्ट इंडीजच्या क्रिकेटबाबत सांगितलं जातं. हे सत्य असेलही; पण बार्बाडोस, त्रिनिदाद यांसारख्या बेटांवरील तरुण खेळाडूंपासून क्रिकेट आणि त्याचं ज्ञान दूर ठेवलं जाऊ शकत नाही हे मेअर्सनं दाखवून दिलं. 

चेन्नईतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला अखेरच्या दिवशी जेव्हा भलं मोठं आव्हान मिळालं होतं तेव्हा ‘भारतीयाना काय सल्ला देशील,’ असं मेअर्सला विचारण्यात आलं. त्या वेळी त्यानं ‘हे पंत अधिक चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो,’ असं हजरजबाबी उत्तर दिलं. तो छोट्याशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती प्रगल्भ झाला आहे हे स्पष्ट करणारं ते उत्तर होतं. 

नव्या पिढीच्या हाती भवितव्य
कसोटीक्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांच्या शर्यतीत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, ज्यो रूट यांची नावं घेतली जातात; पण आता पंत आणि मेअर्स यांच्यासारख्या ‘तोडफोड आणि बेधडक’ युवकांच्या हाती भवितव्य आहे. प्रेक्षकांनाही असंच क्रिकेट आवडतं. असे खेळाडू नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. ‘चेन्नईतील कसोटीत इंग्लंडचा डाव घोषित का केला नाही,’ असा प्रश्न इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला विचारण्यात आला, तेव्हा त्यानं ‘पंतची आम्हाला भीती होती,’ असं उत्तर दिलं. आता वेस्ट इंडीज जेव्हा समोर असेल तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी मेअर्सचीही अशीच भीती बाळगतील! 

एकूणच काय तर, ‘डर होना चाहिये’ अशी वेळ या युवकांनी आणली आहे. हे कसोटीक्रिकेटच्या भल्याचंच आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailesh nagvekar writes about rishabh panth and kyle mayers