विश्‍वकरंडक अजून जिंकायचाय!

बरोबर गेल्या रविवारी जणू काही क्रिकेटचे जग जिंकल्याचा अभूतपूर्व आनंद आणि उत्साह देशभरात साजरा झाला.
ICC Mens T20 Worldcup
ICC Mens T20 Worldcupsakal
Summary

बरोबर गेल्या रविवारी जणू काही क्रिकेटचे जग जिंकल्याचा अभूतपूर्व आनंद आणि उत्साह देशभरात साजरा झाला.

बरोबर गेल्या रविवारी जणू काही क्रिकेटचे जग जिंकल्याचा अभूतपूर्व आनंद आणि उत्साह देशभरात साजरा झाला. दिवाळीसाठी आणलेले फटाके तैनातच होते, सोबत मिठाई आणि फराळाला सुगंध सुटला होता. विराट कोहलीने एक दिवस अगोदरच दिवाळी साजरी करण्याचा आनंद दिला. काय ती अफलातून आणि रोम रोमांच उभी करणारी खेळी... त्यामुळे साकारला होता अविस्मरणीय विजय. पाकिस्तानचा धूळ चारून मिळवलेल्या विजयाची बातच न्यारी. अख्खा देश जल्लोषात न्हाऊन निघाला होता. खेळ कोणताही असो, स्पर्धा कोणतीही असो... पाकिस्तानवरचे विजय हे नेहमीच खास... त्याची महती केवळ आपल्यासारख्या सर्वसामान्यांनाच असते असे नाही, तर ज्या महान खेळाडूंनी असे विजय मिळवलेत किंवा पराभव पचवलेत ते आता सत्तरीपार केलेले सुनील गावसकर भरमैदानात लहान मुलाप्रमाणे नाचताना स्वतःला रोखू शकले नव्हते.

गावसकर हे समालोचन टीममध्ये आहेत. पण त्या सामन्याच्या अंतिम क्षणी मैदानात आले होते. अश्विनने विजयी धाव घेतल्यानंतर गावसकर लहान मुलांप्रमाणे उड्या मारत होते. हात वर करून नाचत होते. या गावसकरांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला हरवून याच ऑस्ट्रेलियात मिनी वर्ल्डकपचा दर्जा असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्सशिपचा करंडक जिंकला होता. त्या वेळी कदाचित एवढा आनंद त्यांना झाला नसेल किंवा प्रदर्शित केला नसेल तेवढा जल्लोष त्यांनी गेल्या रविवारी केला होता...

ही झाली पाकिस्तानवर मिळवलेल्या अफलातून विजयाची आणि त्यानंतर झालेल्या जल्लोषाची एक बाजू... परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूचेही भान असणे तेवढेच महत्त्वाचे. कारण ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे येथे अंतिम ध्येय हा करंडक जिंकण्याचा आणि क्रिकेट विश्वात आपण सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करण्याचीही आहे.

यशाचा कळस अजून खूप दूर आहे. केवळ एका विजयाच्या आनंदात राहून गाफिल राहण्याचा चुका होत असतात आणि कोणी तरी दुसराच या संधीचा फायदा घेत असतो. याच ऑस्ट्रेलियात १९९२ मध्ये पहिल्यांदा ५०-५० षटकांचा विश्वकरंडक झाला होता. त्यात आपण पाकिस्तानला हरवले होते. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक स्पर्धेत सुरू झालेली पाकिस्तानवर विजय मिळवण्याची परंपरा गेल्या वर्षी दुबईत खंडित झाली होती. पण १९९२ च्या स्पर्धेचा विचार केला, तर ज्या पाकिस्तानला आपण हरवले होते, त्या संघाने त्याच स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवले होते. शेवटी पाकच्या नावावर विजेतेपद लागले आणि आपल्या नावावर एका साखळी सामन्यातला विजय.

महेंद्रसिंह धोनीने आपल्याला दोन विश्वकरंडक स्पर्धांत विजेतेपद मिळवून दिले. या दोन्ही वेळेस पाकिस्तानला हरवले होते. २००७ मधील पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत तर अंतिम सामन्यात पाकला पराभूत करून विजेतेपदाला सोनेरी मुलामा देण्याअगोदर धोनीने साखळी सामन्यातही पाकला नमवल्यानंतर अंतिम ध्येयापासून आपले लक्ष्य बाजूला होऊ दिले नव्हते.

शारजात जावेद मियाँदाद यांनी अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार आणि त्यामुळे अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाच्या जखमांवर दशके उलटली तरी अधूनमधून खपली धरत असते. हे कमी होते, त्यात भर पडली होती २०१६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची. त्या स्पर्धेत आपल्या संघाने पाकिस्तानला साखळी सामन्यात चारीमुंड्या चीत केले होते; परंतु अंतिम सामन्यात त्याच पाक संघाकडून आपला संघ चीतपट झाला होता.

हा इतिहास सांगायचा मुद्दा एवढाच की, प्रत्येक सामना मग तो गमावलेला असो वा जिंकलेला... यातून शिकण्यासारखे बरेच असते. विराट कोहली कर्णधार म्हणून या अनुभवातून गेलेला आहे. २०१६च्या त्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत विराट कर्णधार होता. म्हणूनच गेल्या रविवारी अख्ख्या क्रिकेटविश्वाचा तो हिरो ठरला असला तरी त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवले होते. एकीकडे अतिशय भावुक झाल्यानंतरही तो वास्तव विसरला नव्हता. अजून बरीच स्पर्धा शिल्लक आहे. पुढच्या सर्व लढतींसाठी आम्हाला एकाग्रता वाढवावी लागेल आणि कोणाविरुद्धही गाफील राहून चालणार नाही, असे तो एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात वास्तवाचे भान ठेवून बोलत होता. खरं तर चॅम्पियन्स खेळाडूंचा हा एक महत्त्वपूर्ण स्वभावगुण असतो. खेळ कोणताही असो... प्रत्येक दिवस नवा असतो आणि याच नजरेने जो पाहतो त्याचा सूर्योदय आशेची नवी किरणे घेऊन येत असतो.

क्रिकेटविश्वातल्या ठेकेदारांसाठी भारत-पाक लढत सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीसारखीच आहे. विश्वकरंडक असो की अगदी आशिया करंडक... या स्पर्धांची सुरुवात भारत-पाक लढतीने होते आणि शेवटही याच दोन संघांच्या लढतीने व्हावा, अशा प्रकारे स्पर्धेची रचना केली जात असते, त्यामुळे भारत-पाक सामना लिहिला जातो आणि त्यानंतर वेळापत्रक तयार केले जात असते. आता या दोन्ही संघांनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला तर विजेतेपदासाठी पुन्हा भारत-पाक लढत होऊ शकते. शेवटी गल्ला भरण्याचा हा प्रकार. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे शहर स्टेडियमची क्षमता जवळपास लाखभर... पण तेथे गेल्या रविवारी हल्लागुल्ला भारतीय लोकांचाच अधिक होता. तो सामना भारतात होत आहे की ऑस्ट्रेलियात, हेच समजत नव्हते. अशा परिस्थितीत अंतिम सामना भारत-पाक यांच्यात झाला तर?... पण त्यासाठी अंतिम ध्येय वर्ल्डकपच... असा विचार करून भारतीयांना खेळ करत राहावा लागणार आहे. कालचा दिवस भूतकाळ होता, आजचा दिवस वर्तमान आहे, हेच वास्तव लक्षात ठेवायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com