आम्ही केवळ आयपीएलपुरतेच?

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची पहिली स्पर्धा २००७ मध्ये झाली. त्याअगोदर केवळ एकच ट्वेन्टी-२० सामना भारतीय संघ खेळला होता आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघानं, या प्रकाराचा कोणताही अनुभव नसताना, विजेतेपद मिळवलं होतं.
Indian Cricket Team
Indian Cricket TeamSakal
Summary

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची पहिली स्पर्धा २००७ मध्ये झाली. त्याअगोदर केवळ एकच ट्वेन्टी-२० सामना भारतीय संघ खेळला होता आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघानं, या प्रकाराचा कोणताही अनुभव नसताना, विजेतेपद मिळवलं होतं.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची पहिली स्पर्धा २००७ मध्ये झाली. त्याअगोदर केवळ एकच ट्वेन्टी-२० सामना भारतीय संघ खेळला होता आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघानं, या प्रकाराचा कोणताही अनुभव नसताना, विजेतेपद मिळवलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतची ही आठवी विश्वकरंडक स्पर्धा आहे. त्या पहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर पुढच्याच वर्षी आयपीएलचा जन्म झाला. दरम्यानच्या काळात आयपीएलच्या अनुभवानं भारतीय खेळाडू समृद्ध झाले; पण टी-२० विश्वकरंडकाचं विजेतेपद काही हाती लागलं नाही. मग अब्जावधी रुपयांची उधळण होणाऱ्या आयपीएलचा भारतीय क्रिकेटला किती फायदा होतो, हा साधा-सोपा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पडणं स्वाभाविक आहे.

एकदिवसीय आणि कसोटीतील विजेतेपद मिळत नसतं तर वेगळी गोष्ट आहे; पण ट्वेन्टी-२० प्रकारातील आयपीएलमध्ये आपले खेळाडू एकापेक्षा एक भन्नाट कामगिरी करत असतील आणि विजेतेपद मिळवल्यावर जणू काही जग जिंकल्याचा जल्लोष होत असेल तर आणि त्याच टी-२० प्रकारात खरंखुरं क्रिकेटचं जग जिंकता येत नसेल तर नक्कीच मोठी विषमता आहे. प्रश्न केवळ एकेका खेळाडूचा नाही, तर संपूर्ण संघाचा आहे. ‘आयपीएलमधून तुम्ही केवळ पैसेच कमावता...’ असं जर कुणी म्हटलं तर त्याच्या उत्तराला बीसीसीआयही बांधील आहे.

दरवर्षी आयपीएलचा नवनवा अनुभव मिळत असतो. म्हणजे, प्रत्येक टी-२० वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळवायलाच हवं असंही नाही. शेवटी, संघरचना आणि निवडलेल्या खेळाडूंचं प्रत्यक्ष स्पर्धेत योगदान महत्त्वाचं; त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं असतं ते दडपणाखाली खेळ कसा करायचा. आयपीएलमध्ये श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात जिवाची बाजी लावून विजयासाठी प्रयत्न कसे केले जातात; मग बहुराष्ट्रीय स्पर्धांतच काय घोडं अडतं, असे अनेक प्रश्न, उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर, सर्वांनाच पडले आहेत. रोहित शर्मा पाच आयपीएल विजेता कर्णधार...गतस्पर्धेत हार्दिक पंड्याचा विजेता कर्णधार म्हणून झालेला उदय...असा अनुभव पाठीशी असताना नेमकं बिनसतं कुठं? ‘आयपीएलमध्ये बाद फेरीच्या सामन्यात दडपणाची स्थिती आपले गोलंदाज सांभाळतात; पण इंग्लंडविरुद्ध मात्र दडपणाचा सामना करता आला नाही,’ अशी खंत कर्णधार रोहितनं इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केली, यातच कदाचित आयपीएल आणि विश्वकरंडक स्पर्धा यांतील अंतराचं इंगित दडलेलं असावं.

हार-जीत हा खेळाचा भाग; पण पराभवातही ज्याची मान ताठ राहते तो खरा योद्धा असतो; कारण, तो लढलेला असतो आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यानं सर्वोत्तम खेळ केलेला असतो, म्हणून आपला पराभव झालेला असतो; पण इंग्लंडविरुद्ध ज्या पराभवानं भारताची मोहीम संपली त्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी सपशेल शरणागती स्वीकारली. एकही फलंदाज बाद न करता येणं ही शोकांतिकाच म्हणायला हवी.

बरोबर वर्षापूर्वी गतवेळची ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा दुबईत झाली होती, तिथं सलामीला पाकिस्तानच्या सलामीवीरांनी अशीच पिटाई केली होती. आता इंग्लंडच्या सलामीवीरांनी बिनबाद १६८ धावा पार केल्या, म्हणजेच वर्षभरानंतरही गोलंदाजीचं रडगाणं कायम राहणं ही डोळ्यांत अंजन घालणारी बाब आहे. गतवेळी भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. या वेळी उपांत्य फेरी गाठली म्हणजे एक पाऊल पुढं टाकलं; याला प्रगती म्हणता येत नाही!

ज्या पाकिस्तान संघाला आपण सलामीला हरवलं तो संघ खरं तर गाशा गुंडाळून परतीच्या मार्गावर जाणार होताच; पण दक्षिण आफ्रिकेच्या नेदरलँड्सकडून झालेल्या धक्कादायक पराभवानं त्यांना जीवदान मिळालं आणि त्यांनी न्यूझीलंडला ज्या प्रकारे उपांत्य सामन्यात पराभूत केलं, त्यावरून त्यांचा खेळ उंचावत गेला; पण आपल्या संघाचा आलेख वरून खाली घसरला...असं का झालं याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर अनेक कच्चे दुवे सापडतील.

अडखळणारी गाडी...

भारतानं साखळीत पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स आणि झिंबाब्वे यांचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार झाली.

यातील पाकिस्तानविरुद्धचा विजय हा केवळ आणि केवळ विराट कोहलीच्या अनन्यसाधारण फलंदाजीमुळे मिळाला. बांगलादेशविरुद्ध प्राण कंठाशी आला होता. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेविरुद्धचे विजय तर अपेक्षित होते; म्हणजेच ‘मुख्य संघांविरुद्ध दमदार विजय’ असं काही घडलं नाहीच. रोहित शर्माचं अपयश...केएल राहुलचा कधी तरी पेटणारा बल्ब...गोलंदाजीत एकाकडूनही लक्षवेधक कामगिरी नाही... थोडक्यात काय तर, कोहली आणि सूर्यकुमार यादव हे प्रत्येकाचं अपयश आपल्या पंखांखाली घेत होते. अडखळत अडखळत असा प्रवास होत होता; मग अशा संघाची गाडी चढावर बंद पडणारच होती.

...पण निकाल तोच

रवी शास्त्री आणि विराट कोहली या गुरू-शिष्याच्या जोडीनं भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं; पण विश्वकरंडक जिंकण्याचा पराक्रम त्यांना करता आला नाही. बदल झाला. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा अशी नवी जोडी तयार झाली. आयपीएलमधून अर्षदीपसारखे नवे चेहरे मिळाले; पण निकाल तोच राहिला, त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातोय...दोष कुणाचा?

आयपीएल आणि दुखापती

आयपीएलच्या अनुभवातून विश्वकरंडक जिंकता येत नाही हे आत्तापर्यंत तरी सत्य आहे; पण दोन-अडीच महिन्यांच्या या सर्कशीचा ताण मात्र खेळाडूंवर येतो हे तेवढंच सत्य आहे. जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा हे त्याचे बळी ठरले. हे दोन्ही खेळाडू मॅचविनर आहेत, ते असते तर आपण ही विश्वकरंडक स्पर्धा जिंकली असती असंही नाही; पण किमान लढा तरी दिला असता.

आता आयपीएलची वाट पाहू या!

वर्ल्डकप स्पर्धेत आलेल्या आणखी एका अपयशाचे पडसाद कसे उमटतात हे आता पाहायचं. भारतीय संघ आता लगेचच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जात आहे. तिथून बांगलादेशमधील मालिका, मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटीचा सामना...सोन्याचं अंडं कसं मिळत राहील हे महत्त्वाचं आणि त्यानंतर मार्च-एप्रिल-मे महिन्यांत पुन्हा आयपीएल! Public memory is very short असं म्हटलं जातं. प्रेक्षकांसह खेळाडूही विश्वकरंडक स्पर्धेतील हार विसरतील आणि पुन्हा ‘आयपीएलची सर्कस हेच खरं क्रिकेट’ असं समजण्यात सर्वच जण धन्यता मानतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com