अजून यौवनात मी

ऑस्ट्रेलियन टेनिस ही व्यावसायिक स्पर्धा असेल पण बोपण्णा जर वयाच्या ४३ व्या वर्षी क्रांती करू शकतो तर आपण का नाही? असा विचार प्रत्येकानं केला तर अर्धा मार्ग सोपा होऊ शकतो.
rohan bopanna
rohan bopannasakal

Age is just a number असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. अनेकांनी आपापल्या व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात हे खरं करून दाखवलं आहे. पण खेळाच्या विश्वात जिथं कौशल्य, गुणवत्ता, अनुभव, शारीरिक क्षमता आणि दमसास पणाला लागतो, त्यातच समोर तरुण आणि हरहुन्नरी प्रतिस्पर्ध्यांची रांग लागलेली असते, अशा परिस्थितीत मिळवलेलं यश सर्वांनाच थक्क करणारं असतं...

एक नवा आदर्श निर्माण करणारं असतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सततच्या अपयशामुळं नाउमेद झालेल्यांना संजीवनी देणारंही असतं. ज्यांचा आदर्श ठेवावा असे विविध खेळांतील अनेक स्टार खेळाडू आपल्याकडं आहेत, पण कदाचित सर्वांगीण खेळाचा विचार करता ज्याचं नाव खचितच घेतलं गेलं असेल, असा रोहन बोपण्णा सध्या सर्वांसाठी आदर्श असाच आहे. वय वर्ष ४३!

क्रीडा क्षेत्रात हे वय निवृत्त होऊन, प्रशिक्षक, मार्गदर्शक, प्रशासक किंवा समालोचक होण्याचं हे वय, पण या वयात हा ‘तरुण’ टेनिस जगात दुहेरीत पहिल्या स्थानी तर येतोच आणि ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं पुरुष दुहेरीतील विजेतेपदही मिळवतो. हे भारतीयांसाठी साधेसुधे नव्हे तर क्रांतिकारी यश आहे. कारण हे ऑलिंपिक वर्ष आहे. काही जण पात्र ठरले आहेत तर अनेकांना पात्रतेचा अडथळा पार करायचा आहे, त्यात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन यांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियन टेनिस ही व्यावसायिक स्पर्धा असेल पण बोपण्णा जर वयाच्या ४३ व्या वर्षी क्रांती करू शकतो तर आपण का नाही? असा विचार प्रत्येकानं केला तर अर्धा मार्ग सोपा होऊ शकतो, कारण क्रीडा क्षेत्रात क्षमता, गुणवत्ता याला आत्मविश्वासाची जोड असेल, तर यशस्वी होण्यास कोणत्याही सीमा-मर्यादा नसतात.

बोपण्णा वयाच्या अकराव्या वर्षी टेनिस खेळायला लागला. तसं पाहायला गेलं तर ही सुरुवातच काहीशी उशिरानं म्हणता येईल कारण हल्ली पाचव्या, सहाव्या वर्षापासूनच मुलांची पावलं टेनिस कोर्टकडं वळत असतात. पण बोपण्णासाठी वय हे कधीच महत्त्वाचं ठरलेलं नाही.

कारण ११ व्या वर्षी सुरुवात, त्याबरोबर हॉकी आणि फुटबॉल या खेळातही हातपाय मारण्याचा केलेला प्रयत्न, १९ व्या वयात टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा घेतलेला निर्णय त्यानंतर व्यावसायिक टेनिसमध्ये पहिलं मोठं यश वयाच्या ३५ व्या वर्षी आणि आता ४३ व्या वर्षी हे कळससाध्यी यश, त्याचा हा आलेख आणि प्रवास आश्चर्यचकितच करणारा.

एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर बोपण्णानं त्यात झोकून दिलं. ज्युनियर गटात यशाच्या पायऱ्या चढल्यानंतर १९९९ मध्ये सीनियर गटात आणि २००३ मध्ये तो व्यावसायिक टेनिसच्या कोर्टवर उतरला. २००३ ते २०२४ ! २१ वर्षांनंतर पुरुष दुहेरीचं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलं. खरं तर अनेकांची कारकीर्दही १५-१६ वर्षे राहिली तरी ती फार मोठी समजली जाते. कारण टेनिस-बॅडमिंटन हे खेळ दिसतात तेवढे खेळण्यासाठी सोपे नाहीत.

इथं दमसास उच्च कोटीचा असावाच लागतो त्याचबरोबर चपळता आणि पदलालित्य जेवढं वेगवान तेवढा तुमचा प्रभाव. एखादा सामना दोन-तीन तास खेळायची क्षमता असायला लागते. जरा जरी कमी पडलात, तर प्रतिस्पर्धी वरचढ होतो. बोपण्णाच्या बाबतीत म्हणायचं तर त्याची क्षमता आणि गुणवत्ता एका बाजूला असेल पण स्टॅमिना त्याहूनही प्रभावशाली.

एकीकडं पेस-भूपती ही भारताची जगद्‍ विख्यात जोडी दुहेरीचं विश्व गाजवत असताना बोपण्णानंही दुहेरी स्पेशालिस्ट अशी आपली ओळख निर्माण केली. सुरुवातीला एकेरीत खेळल्यानंतर आपण दुहेरीत अधिक चांगली प्रगती करू शकतो याची जाणीव झाल्यावर बोपण्णानं आपला ट्रॅक बदलला.

सुरुवातीला कमी श्रेणीच्या स्पर्धा जिंकल्यानंतर बोपण्णानं २००८ मध्ये लॉस एँजलिस ओपन या उच्च श्रेणीच्या एटीपी स्पर्धेचं दुहेरीतलं विजेतेपद मिळवलं.

तिथून हा प्रवास सुरू झाला आणि आतापर्यंत त्याच्या तिजोरीत २४ एटीपी दुहेरीची विजेतेपद मानानं विराजमान झालेली आहेत. यात एटीपी १००० या सर्वोच्चम श्रेणीच्या पाच विजेतेपदाचा समावेश आहे.

चौथा भारतीय

२००६ मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या विश्वात त्यानं पदार्पण केलं. ११ वर्षांनंतर त्यानं फ्रेंच ओपन स्पर्धेत गॅब्रियला दाब्रोवस्की हिच्या साथीत मिश्र दुहेरीचं पहिलं वहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलं. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा पेस, भूपती आणि सानिया मिर्झानंतरचा तो चौथा भारतीय ठरला. पण तिथंही त्याला ११ वर्षे वाट पाहावी लागली. ग्रँडस्लॅममधील हे पहिले यश मिळवल्यानंतर बोपण्णाला पुढं आणखी तीन संधी मिळाल्या होत्या.

२०१८ आणि २०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिमिया बाबोस आणि आपल्याच देशाच्या सानिया मिर्झासह तो मिश्र दुहेरीच्या आंतिम फेरीपर्यंत गेला होता. आता ज्याच्यासह ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, त्या मॅथ्यू एबडेनसह गतवर्षीच्या यूएस ओपनमध्ये पुरुष दुहेरीची त्यानं अंतिम फेरी गाठली होती, परंतु उंबरठ्यावर मागं फिरावं लागलं होतं. तरीही जिद्द आणि आत्मविश्वास वाढत्या वयातही खचू न देणाऱ्या बोपण्णानं या वेळी मात्र विजेतेपदाचा करंडक उंचावलाच.

डेव्हिस करंडकातील यश

डेव्हिस करंडक या देशासाठी प्रतिष्ठेच्या स्पर्धांत बोपण्णानं देशाला सन्मान मिळवून दिला. काही महिन्यांपूर्वी मोरोक्कोविरुद्ध झालेल्या लढतीत सामना १-१ अशा बरोबरीत असताना बोपण्णानं युकी भ्रांबीसह खेळताना विजय मिळवून दिला. तो त्याचा पन्नासावा डेव्हिस करंडक सामना होता आणि त्याचबरोबर तो या स्पर्धेतून निवृत्तही झाला. डेव्हिस करंडकाचे एकूण ५० सामने खेळणाऱ्या बोपण्णानं त्यातील ३३ लढती जिंकल्या.

ऑलिंपिकमधले प्रयत्न

व्यायसायिक खेळात कितीही यश मिळवलं, तरी ऑलिंपिकमधील पदक हे सर्वश्रेष्ठ असते, पेस-भूपती यांनी दुहेरीचं विश्व गाजवलं पण त्यांनाही ऑलिंपिक पदक जिंकता आलेलं नाही. बोपण्णाही त्यात काहीसा कमी पडला, पण प्रयत्न मात्र अथक होते.

२०१२ मधील लंडन ऑलिंपिक आणि २०१६मधील रिओ ऑलिंपिकमध्ये तो अनुक्रमे महेश भूपती आणि लिअँडर पेससह खेळला पण दुसऱ्या आणि पहिल्या फेरीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं होतं. २०१६ च्या स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासह खेळताना अमेरिकेच्या राजीव राम आणि व्हिनिस विल्यम्सकडून उपांत्य फेरी गमावल्यामुळं ब्राँझपदक हुकलं होतं.

आता लक्ष्य ऑलिंपिक

एकीकडं तरुण खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याकरिता झगडत आहेत मात्र बोपण्णा सध्या अव्वल मानांकित असल्यामुळं या वयात येत्या पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे. साथीदार निवडायचाय. ऑलिंपिक पदक जिंकण्याचे तीनदा केलेले प्रयत्न हुकले असले, तरी या वेळी जर हे लक्ष्य साध्य केलं, तर बोपण्णा भारताच्या टेनिसचा इतिहास अजरामर करेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com