esakal | लेडी डॉन
sakal

बोलून बातमी शोधा

Mithali Raj

लेडी डॉन

sakal_logo
By
शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

खरं तर खेळाच्या दुनियेत तरी खेळाडूंची एकमेकांशी तुलना करणं योग्य नाही. प्रत्येकाचं अस्तित्व वेगवेगळं आणि त्यातही सुपरस्टार व अलौकिक गुणवत्ता असलेले खेळाडू एकमेवाद्वितीय असतात; पण काही योगायोग निश्चितच असतात आणि भारतीय क्रिकेटमध्ये ते अधूनमधून जाणवतात. सचिन तेंडुलकर आणि मिताली राज यांच्यातील ही अशीच योगायोगाची दोन साम्ये तर अफलातूनच. सचिननं १६ वर्षं आणि २०५ व्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मितालीनंही बरोबर १६ वर्षं आणि २०५ व्या दिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. सचिननं आपल्या अलौकिक कारकीर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम मितालीनंही काही दिवसांपूर्वीच केला. याच मितालीला ‘लेडी तेंडुलकर’ असंही संबोधलं जायचं. तिच्यासाठी अशी तुलना हा सन्मानच असेल. एकीकडे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सचिननं विक्रमांचा हिमालय उभा केला. त्याच वेळी महिला क्रिकेटमध्ये मितालीनंही महामेरू उभारला. सचिन २४ वर्षांच्या कारकीर्दीनंतर वयाच्या ३९ वर्षी निवृत्त झाला. मिताली २२ वर्षांच्या कारकीर्दीत वयाच्या ३९ व्या वर्षीही खेळत आहे. यात साम्य आहे ते प्रदीर्घ कारकीर्दीचं. आधुनिक क्रिकेटमधील स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दुखापतींचं दुष्टचक्र यातून कुणाचीच सुटका नसते, म्हणूनच २० वर्षं सातत्यानं खेळणं हे दैवीच असतं.

मिताली राजसारखी खेळाडू भारतात घडली हे भारतीय क्रिकेटचं सुदैवच म्हणायला हवं. सचिन काय किंवा मिताली काय, त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक गुणवत्तेला विक्रमांचं कोंदण लाभत असतं; पण अशा खेळाडूंकडून स्फूर्ती घेत पुढची पिढीही घडत असते म्हणून अशा खेळाडूंचं अस्तित्व अनन्यसाधारण असतं. हल्लीच्या क्रिकेटमध्ये एक फॉरमॅट खेळायला मिळण्यात धन्यता मानली जाते; पण मिताली ही कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत खेळलेली आहे. (आता मात्र झटपट क्रिकेटच्या टी-२० प्रकारातून ती निवृत्त झालेली आहे).

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघानं अगोदर एकमेव कसोटी अनिर्णित राखली. त्यानंतर एकदिवसीय मालिका गमावली असली तरी अखेरचा सामना जिंकताना मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला. एकीकडे हरहुन्नरी शेफाली वर्मा, भविष्यातील स्टार स्मृती मंधाना, अनुभवी हरमनप्रीतकौर अपयशी ठरत असताना मितालीनं सलग तिन्ही सामन्यांत अर्धशतकं करण्याचं सातत्य दाखवलं. संघ अडचणीत असताना तिनं दाखवलेल्या इतक्या सातत्यातून नवोदितांनी नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे. तुमच्याकडे किती गुणवत्ता आहे यापेक्षा तिचं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं कसं सादरीकरण केलं जातं हे अतिशय महत्त्वाचं असतं.

मितालीचा जन्मच जणू काही क्रिकेटसाठी झालाय. ती तमिळ कुटुंबातील असली तरी वडिलांच्या नोकरीमुळे तिचा जन्म जोधपूर (राजस्थान) या शहरातला आहे. ती दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला लागली ती हैदराबादमधून. शालेय शिक्षण हैदराबादमध्येच पूर्ण झालं. चार वर्षांतच म्हणजे चौदाव्या वर्षीच तिला विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली असती...सन १९९७ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी मितालीची संभाव्य संघात निवड झाली होती; परंतु अंतिम संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या सर्व विश्वकरंडक स्पर्धांत ती केवळ खेळलेलीच नाही तर, भारताकडून एकापेक्षा अधिक एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धांत तिनं नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे.

एकूण काय तर, गुणवत्ता कधीच दुर्लक्षित राहत नाही. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात (आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय) मितालीनं नाबाद शतक करून आपल्या आगमनाची वर्दी दिली होती. ता. २६ जून १९९९ हा तो दिवस होता. २२ वर्षांनंतर ता. तीन जुलै २०२१ या दिवशी नाबाद ७५ धावा करून ती संघाची तारणहार ठरली. यावरून तिच्या अंगी असलेलं कमालीचं सातत्य आणि झुंझार वृत्ती किती प्रबळ आहे हे सिद्ध होतं. आजच्या पिढीनं हेच महत्त्वाचे गुण एकलव्याप्रमाणे शिकण्याची गरज आहे.

वादाची किनार आणि योगायोगही

कितीही मोठा खेळाडू असला तरी एखादा प्रसंग वादाचा ठरत असतोच. सन २०१८ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत मिताली खेळाडू म्हणून संघात होती, तर रमेश पोवार संघाचे प्रशिक्षक होते. मितालीचा स्ट्राइक रेट कमी होत असल्यानं तिला उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी वगळण्यात आलं.

अहंकार दुखावलेल्या मितालीनं त्यानंतर पोवार आणि त्या वेळी बीसीसीआयच्या कारभाराची सूत्रं हाती असलेल्या प्रशासकीय समितीतील सदस्या आणि माजी महिला खेळाडू डायन एडलजी यांच्यावर पत्रातून टीका केली. आपल्याला वगळण्यामागं त्या दोघांना तिनं जबाबदार धरलं. पुढं पोवार यांना पदावरून दूर करण्यात आलं; पण आता योगायोग असा की, कसोटी आणि एकदिवसीय संघाची मिताली हीच कर्णधार असताना पोवार हेही संघाचे पुन्हा प्रशिक्षक झाले आणि मितालीच्या बॅटमधून धावांबरोबर विक्रमांचीही गंगा वाहू लागली.

मितालीनं काही महिन्यांपूर्वी निवृत्तीचे संकेत दिले असले तरी, ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी सामना ती कर्णधार म्हणून खेळणार हे निश्चित. पुढं न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धाही आहे. फलंदाजीतले महत्त्वाचे असे जवळपास सगळे विक्रम मितालीच्या नावावर आहेत. मात्र, विश्वकरंडक विजेतेपदाचं अपूर्ण असलेलं तिचं स्वप्नही पूर्ण होवो हीच शुभेच्छा!

मितालीचं विक्रमी ‘राज’

  • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा (७३०४)

  • सर्वाधिक (२२ वर्षं) आंतराष्ट्रीय कारकिर्द.

  • पदार्पणात शतकवीर.

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९० च्या पलीकडे धावा.

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक (१४०) सामने.

  • सलग सात एकदिवसीय सामन्यात अर्धशतकं.

  • ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगली सरासरी (३७.५२).

  • २००५ मध्ये फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल २०२१ मध्येही हाच बहुमान.

loading image