फिरकीचा जादूगार शेन वॉर्नची फायनल वॉर्निंग

Shane Warne
Shane WarneSakal Digital
Updated on

आयुष्य आणि शरीर संपत्ती हे केवळ पैसा जवळ बाळगणे, खूप श्रीमंत होणे, खूप मोठे नाव असणे, व्यायाम, जिम आणि वर्क आऊट करणे, बॉडी बिल्डिंग करणे इतके मर्यादित नाही. वयाच्या 52 व्या वर्षी शेवटचा श्वास घ्यावा लागणार्या शेन वॉर्नने सगळ्या जगाला वॉर्निंग दिली आहे आनंदी राहा, मिळालेल्या प्रत्येक श्वासासाठी कृतज्ञता बाळगा, आपल्याला जे मिळाले आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा , सदैव आनंदी राहा आणि संतुलित आयुष्य जगा. उद्याचा दिवस काय असेल याची कल्पना कोणालाही नसते.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे जेष्ठ विकेट किपर रोडनी मार्श वय वर्षे 74 यांच्या निधनावर सकाळी ०७:२३ मिनिटांनी शोक व्यक्त करणारा शेन वॉर्न, कोणताही आजार नसताना अवघ्या तेरा तासानंतर हृदय विकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतो ही बाब मन सुन्न करणारी आहे. मुथय्या मुरलीधरन नंतर जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज, क्रिकेट च्या टेस्ट करियर मध्ये 708 बळी घेणारा, दररोज व्यायाम करणारा, खूप पैसे बाळगणारा, सेलीब्रेटी आणि प्रचंड श्रीमंत माणूस वयाच्या 52 व्या वर्षी हे जग सोडून जातो; नव्हें - नव्हें हे जग त्याला सोडावे लागते हे कशाचे लक्षण आहे?

संपूर्ण मानवजातीला शेन वॉर्नने दिलेला हा निरोप नव्हे (वॉर्निंग) धमकीवजा संदेश आहे जीवन हे फक्त आनंदाने जगण्यासाठी आहे. कधीही, केव्हाही, चुकूनही, एकमेकांशी वाद, भांडणे, घृणा, तिरस्कार करण्यात वेळ घालवू नये, इतरांकडून भयंकर अपेक्षा आणि त्या पूर्ण न झाल्यास सतत मनात कुढत राहणे, इतरांना किंवा स्वतःला दोष देत राहणे या सर्व कारणांमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होऊन अचानक हृदयविकाराचा झटका येतो हे सर्व संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. आपल्याला माहित नसते हे जग आपल्याला कधी सोडावे लागणार आहे. इतरांकडून खूप अपेक्षा ठेवणं हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे.

कारण इतर लोक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत आणि ते तसे वागले नाहीत तर माणूस स्वतःला सतत दुःखात किंवा काहीतरी कमी असल्याच्या भावना ठेवून जगत असतो. वाढत्या वयासोबत हृदयाच्या रक्तवाहिन्याही ठिसूळ आणि कडक होऊन जातात, त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. खूप व्यायाम केला म्हणजे रक्तवाहिन्या खूप चांगल्या असतात असेही नाही. मानसिक तणाव हे हृदयविकाराचं महत्त्वाचे कारण होत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःला आनंदी ठेवणं ही त्याची स्वतःची जबाबदारी आहे इतरांची नाही मग तुम्ही कोणीही असा.

कोणताही भलामोठा व्यायाम जिम किंवा वर्कआउट न करणाऱ्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लता मंगेशकर 91 वर्षे भरभरून जगल्या, कसल्याही प्रकारची जिम, प्रोटीन सप्लीमेंट किंवा डायेट म्हणून विकत आणून फूड सप्लीमेंट न खाता जगावर नाव कोरुन जाणारे आदरणीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम 84 वर्षे आनंदी आणि सतत दुसऱ्यांना देणारं आयुष्य जगले. सुईपासून विमानांपर्यंत प्रत्येक गोष्ट तयार करून विकणारे, भला मोठा व्यायाम न करणारे, लग्न न करता किंवा मुलाबाळांचा व्याप न वाढवता आणि याबद्दल यत्किंचितही दुःख न बाळगता प्रत्येक भारतीयांच्या घरात राहणारे आदरणीय श्री रतन टाटा, आणि सतत दुसऱ्याचं भलं व्हावं समाजाच्या उत्कर्ष व्हावा ही भावना बाळगणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला मिळालेल्या मानवी जीवनाचा उपयोग किती चांगला करता येतो याची या पिढीने पाहिलेली ज्वलंत उदाहरणे आहेत.

अकाली हे जग सोडून जाणाऱ्या क्रिकेट जगातल्या एक सर्वश्रेष्ठ खेळाडू ज्याच संपूर्ण आयुष्य हे व्यायाम करण्यामध्ये गेलं. त्याचा आहार किती चांगला असेल हे वेगळं आणि विस्तृत करून सांगण्याची गरज नाही. त्याची काळजी घेणारे कित्येक निष्णांत डॉक्टर्स त्याच्याभोवती नेहमीच असतील हेही आपल्याला माहित आहे. तरीदेखील शेन वॉर्न अचानक हे जग सोडून गेला ही गोष्ट प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मनात खोलवर जखम करून निश्चितच गेली आहे. असं असलं तरी मोरारी बापू जसे म्हणतात 'जो आयेगा वो जाएगा, तू किसका शोक मनायेगा?

काही दिवसांनी आपण शेन वॉर्नला विसरून जाऊ, आपापल्या कामांमध्ये मशगुल होऊन परत धावपळीचे जीवन जगत राहू. परंतु त्यांने दिलेली 'वॉर्निंग' ही प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायला हवी. कारण आपल्याला फारच थोड्या वेळासाठी या पृथ्वीवर आनंद घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायला हवे. हे जीवन गृहीत धरून कधीही वागू नये. आपल्याला माहित नाही हे जग आपल्याला कधी सोडावं लागणार आहे.

शेन वॉर्न, तुझ्या खेळाने आम्हाला दिलेला आनंद आम्ही सदैव स्मरणात ठेवू. तुझ्या आठवणी आमच्या मनात नेहमीच असतील. तू दिलेली वॉर्निंग मात्र आम्हीं निश्चितच लक्षात ठेवू. तुझ्या आत्म्याला चिरशांती मिळो ही त्या निसर्ग निर्मात्याकडे प्रार्थना. तुझा चाहता…

लेखक: डॉ. नितीन जोशी.

गॅलक्सी हॉस्पिटल, नांदेड महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com