संधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णूता!

शेफाली वैद्य
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल ह्या देशात नेहमी हिंदूंविरुद्धच का वापरली जाते? बहुसंख्य हिंदू गोमांस खात नाहीत, तरी त्यांच्या नाकावर टिच्चून केरळमध्ये भर वस्तीत कॉंग्रेस पक्षाचे लोक कुठल्याही परवानगीशिवाय गाय कापतात. नवरात्र जवळ आले की महिषासूरच कसा खरा "हिरो' होता या संदर्भात लेख लिहिले जातात. श्रीराम कसे अन्यायी होते आणि रावण कसा चांगला होता, यावर करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये चर्चासत्रे घेतली जातात. याविरुद्ध सर्वसामान्य हिंदूंनी आवाज उठवलाच, तर त्यांच्यावरच असहिष्णू आणि प्रतिगामी वगैरे शिक्के मारले जातात

गेल्या आठवड्यात सुप्रसिद्ध मराठी लेखक राजन खान यांच्या अक्षर मानव ह्या संस्थेच्या पुणे कार्यालयावर मुस्लिम संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि कार्यालयातल्या सामानाची हुल्लडबाजी करून नासधूस केली. राजन खान ह्यांनी 30 वर्षांपूर्वी ट्रिपल तलाकच्या विषयावर एक कथा लिहिली होती. त्या कथेवरून बेतलेला हलाल हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने आमच्या भावना दुखावल्या, असा दावा करत अवामी विकास पार्टी नामक एका मुस्लिम संघटनेने खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळं फासलं. मजा म्हणजे त्यातल्या एकानेही हे असले प्रकार करण्याआधी खान यांची मूळ कथा वाचलेली नव्हती. खान यांचे म्हणणे आहे की जरी हलाल हा चित्रपट त्यांच्या मूळ कथेवर बेतलेला असला, तरी दिग्दर्शकाने कथेत बरेच फेरफार केले आहेत आणि या चित्रपटाशी त्यांचा काही प्रत्यक्ष संबंध नाही. पण चित्रपट न बघताही आणि मूळ कथा न वाचताही, नुसता ट्रेलर बघून अवामी विकास पार्टीच्या लोकांच्या भावना दुखावल्या म्हणजे त्यांच्या भावना किती नाजूक आहेत हे सर्वाना कळलंच असेल.

एखादा चित्रपट, किंवा पुस्तक किंवा अन्य साहित्यकृती आपल्या विचारांना पटत नाही म्हणून हुल्लडबाजी करणे हा प्रकार तसा भारतात नवीन नाही. मागे संजय लीला भन्साळी या हिंदी चित्रपट दिग्दर्शकाच्या "पद्मावती' या आगामी बहुचर्चित चित्रपटात त्याने राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिलजी ह्यांच्यामध्ये आक्षेपार्ह संबंध दाखवले असतील, या संशयावरून जयपूरमधल्या कर्णी सेना ह्या संघटनेने चित्रपटाच्या सेटवर हल्ला केला तेव्हाही खूप गदारोळ माजला होता. पण राजन खान यांच्या कार्यालयावरचा हल्ला आणि संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर झालेला हल्ला या दोन हल्ल्यांत एक मूलभूत फरक आहे. पारंपरिक प्रसार माध्यमांमध्ये उमटलेली या दोन्ही हल्ल्यांवरची प्रतिक्रिया. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा झाडून सगळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमे हा "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे हो,' असा आक्रोश करत होती. भन्साळी यांची बाजू घेऊन अग्रलेख लिहिले गेले. वृत्त वाहिन्यांवर तासंतास चर्चा रंगल्या. पण राजन खान यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यावर मात्र एखाद्या चुकार मराठी वृत्तपत्रात कुठल्या तरी मधल्या पानावर फक्त चार ओळी जेमतेम लिहून आल्या. हा ढळढळीत विरोधाभास का? विचारस्वातंत्र्य हे घटनेने सगळ्यांनाच दिलेले आहे, पण त्याची अंमलबजावणी करताना एवढी तफावत का?

गेल्या आठवड्यात देशभर शारदीय नवरात्र साजरे केले जात असताना दिल्ली विश्वविद्यालयाच्या दयालसिंग कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका केदार मंडल नामक प्राध्यापकाने देवी दुर्गेच्या संदर्भात अत्यंत अश्‍लाघ्य भाषा वापरून फेसबुकवर पोस्ट लिहिली. केवळ हिंदूंच्या भावना दुखवाव्यात याच हेतूने त्याने ही अश्‍लील पोस्ट लिहिली होती, हे जाहीर आहे. साहजिकच त्या पोस्टचे पडसाद सोशल मीडियावर सगळीकडे उमटले. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला, पण मीडियामध्ये मात्र या विषयावर म्हणावी तितकी चर्चा झाली नाही. एरवी सहिष्णुतेच्या बाजूने तावातावाने बोलणारे मीडियामधले सर्व बोलबच्चन केदार मंडलच्या या धडधडीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या लिखाणावर सोयीस्कर मौनव्रत बाळगून होते. यातल्याच काही महाभागांनी तर केदार मंडलवर काहीच कारवाई होऊ नये, ही भूमिका घेतली. म्हणजे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीच दिले आहे का, असा प्रश्न मला कधी कधी पडतो.

फ्रान्समध्ये शार्ली एब्दो या व्यंगसाप्ताहिकाने त्यांच्या अंकांमधून प्रेषितांचे व्यंगचित्र छापले, म्हणून त्यांच्या कार्यालयावर 7 जानेवारी रोजी फार मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात दहा पत्रकार ठार झाले. या हल्ल्याच्या प्रतिक्रिया जगभर उमटल्या, पण भारतातल्या काही स्वतःला पुरोगामी, सहिष्णू वगैरे म्हणवणाऱ्या पत्रकारांनी मात्र "हल्ला झाला हे वाईटच झाले. पण शार्ली एब्दोने जाणूनबुजून मुसलमानांच्या भावना दुखवायला नको होत्या' अशी सावध, कातडीबचाऊ भूमिका घेतली. किंबहुना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात अशी दुटप्पी, कातडीबचाऊ भूमिका घेणे यालाच भारतीय पत्रकारितेत आजकाल "लिबरॅलिजम' हे गोंडस नाव दिले गेले आहे. एका विशिष्ट धर्माच्या प्रेषितांविरुद्ध एक वाक्‍य बोलले म्हणून भाजप नेते कमलेश तिवारी ह्यांना तुरुंगात खितपत पडावे लागले, तेव्हा कुणा भारतीय पत्रकाराला त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आला नाही. पण चित्रकार एम एफ हुसेननी हिंदू देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढली तेव्हा मात्र हेच लोक हुसेन यांना तशी चित्रे काढायचा पूर्ण अधिकार भारतीय घटनेने दिला आहे, म्हणून जोरकस दवंडी पिटत होते. बशीरहाट या पश्‍चिम बंगालमधल्या एका शहरात एका अल्पवयीन मुलाला त्याने इस्लामविरुद्ध काहीतरी लिहिले म्हणून ममता बॅनर्जी सरकारने तुरुंगात टाकले. "त्या मुलाला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याचा शिरच्छेद करतो' अशा भयानक घोषणा देत तिथल्या मुसलमान जनतेने रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. हिंदूंच्या घरांना, सरकारी मालमत्तेला आगी लावल्या. मात्र यानंतरही पारंपारिक मीडियामधून या गुंडगिरीविरुद्ध कुणीही बोलले नाही. कमलेश तिवारी वा तो बशिरहाट मधला मुलगा, यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने कुठल्याही भाडोत्री पत्रकाराने घाऊक गळा काढला नाही. केदार मंडल वर जेव्हा त्याच्या आक्षेपार्ह, अश्‍लाघ्य लिखाणामुळे निलंबनाची कारवाई झाली तेव्हा मात्र, "तो बिचारा अपंग आहे, त्याने केली देवी दुर्गेवर टीका, तर काय झालं?' अशा स्वरूपाचे पुरोगामी उमाळे याच पत्रकारांनी काढायला सुरवात केली. आता राजन खान यांच्या कार्यालयावर हल्ला झाला तर हेच लोक पुन्हा मूग गिळून गप्प आहेत.

तथाकथित पुरोगामी विचारवंतांचे हे सोयीस्कर मौन अप्रत्यक्षपणे असहिष्णुतेला खतपाणी घालते. गेल्या महिन्यात गौरी लंकेश या डाव्या विचारांच्या पत्रकाराचा बंगळुरूमध्ये खून झाला. खून कुणी केला, याबद्दल पोलिसांनी तपास सुरूही केलेला नसताना "हा खून हिंस्त्र हिंदुत्ववाद्यांनीच केलेला आहे,' अशी ठाम भूमिका घेऊन हे तथाकथित पुरोगामी विचारवंत मोकळे झाले. पण आयुष्यभर सेवाभावाने काम करणाऱ्या केरळमधल्या एखाद्या तरुण संघ स्वयंसेवकाचा डावे, कम्युनिस्ट गुंड त्याच्या गरोदर बहीणीदेखत, त्याच्या आईच्या डोळ्यांसमोर निर्घृण खून करतात, तेव्हा मात्र त्या हत्येबाबत पुरावा असून देखील हेच तथाकथित पुरोगामी विचारवंत डोळ्यांवर कातडे ओढून मोकळे होतात. ही संधीसाधू, दुटप्पी भूमिका ज्या कातडीबचाऊ भ्याडपणामुळे येते त्या संबंधात मात्र कुणीच बोलत नाही.

मुद्दा हा आहे की अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल ह्या देशात नेहमी हिंदूंविरुद्धच का वापरली जाते? बहुसंख्य हिंदू गोमांस खात नाहीत, तरी त्यांच्या नाकावर टिच्चून केरळमध्ये भर वस्तीत कॉंग्रेस पक्षाचे लोक कुठल्याही परवानगीशिवाय गाय कापतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि चेन्नई आयआयटीमध्ये "बीफ फेस्टिवल्स' आयोजित केली जातात. नवरात्र जवळ आले की महिषासूरच कसा खरा "हिरो' होता या संदर्भात लेख लिहिले जातात. श्रीराम कसे अन्यायी होते आणि रावण कसा चांगला होता, यावर करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये चर्चासत्रे घेतली जातात. याविरुद्ध सर्वसामान्य हिंदूंनी आवाज उठवलाच, तर त्यांच्यावरच असहिष्णू आणि प्रतिगामी वगैरे शिक्के मारले जातात.

पण इतर धर्मांच्या, विशेषतः इस्लामच्या विरोधात काहीही लिहिले तर त्याचे परिणाम हिंसेत होतात आणि तरीही त्याविरुद्ध पारंपारिक माध्यमे ब्र काढत नाहीत. केरळमध्ये प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्या हाताचा पंजा काही मुसलमान धर्माधांनी छाटून टाकला. एका प्रश्नपत्रिकेत प्रेषितांविषयी वादग्रस्त प्रश्न विचारल्याबद्दल इस्लामी धर्माधांनी जोसेफ यांच्यावर हा हल्ला केला. पी एफ आय ह्या इस्लामी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या संघटनेची दहशत केरळमध्ये इतकी आहे की टी.जे.जोसेफ ह्यांच्या पाठीशी ना सरकार उभे राहिले, ना चर्च. या प्रकारानंतर निराश होऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. एका संपूर्ण कुटुंबाची अशी वाताहत होऊनदेखील देशातला लिबरल मीडिया जोसेफ यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मागे महाराष्ट्रात एका वृत्तपत्राने आयसिसला पैसे कुठून येतात, हे दाखवण्यासाठी नुसतं "पिगी बॅंक' हे रेखाचित्र वापरलं होतं तर इस्लामी कट्टर संघटनांनी या वृत्तपत्राच्या औरंगाबाद कार्यालयावर मोर्चा आणला आणि संपादकांनी सपशेल शरणागती पत्करून माफी मागितली. तेव्हा या वृत्तपत्राने माफी मागणं चूक आहे, असं म्हणण्याचं धाडस स्वतःला "पुरोगामी विचारवंत' म्हणवणाऱ्या किती लोकांनी दाखवलं? कोलकत्त्याच्या टेरेसांना मिळालेल्या तथाकथित संतपदाच्या विरोधात अग्रलेख लिहीण्याचे धाडस दाखवणाऱ्या मराठी वृत्तपत्रावर छापलेला अग्रेलख "मागे घेण्याची' नामुष्की ओढवली. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनाही माफी मागावी लागली. पण त्यांच्या बाजूने त्यांच्याच व्यवसायातले किती लोक बोलले?

इतर धर्मांच्या विरोधात भारतात शक्‍यतो कुणी काही बोलतच नाही. चुकून कुणी बोलायचं धाडस दाखवलं तर हुल्लडबाजी करून त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यायला भाग पाडलं जातं. पण तेव्हा ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी भूमिका घेताना लोक अपवादानेच दिसतात. पण हिंदू धर्माच्या विरोधात मात्र कुणीही काहीही बोललं तरी ते सर्वसामान्य लोकांनी निमूट खपवून घ्यायचं आणि वर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गायचे, असा काहीसा विचित्र, दुटप्पी खेळ भारतात चालू आहे. कारण मूळ मुद्दा असा आहे की हे तथाकथित पुरोगामी विचारवंत स्वतःची चामडी बचावेल, इथपर्यंतचेच माफक अभिव्यक्ती स्वातंत्र्य पेलू शकतात. खऱ्या सहिष्णुतेला जी प्रखर बुद्धिवादाची पार्श्वभूमी लागते ती ह्यांच्यापैकी कोणाही जवळ नाही, आहे तो निव्वळ संधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची सहिष्णूता!
 

Web Title: shefali vaidya writes about tolerance and halala