जोड नसलेला उदारमतवाद

(अनुवाद - किशोर जामकर)
रविवार, 2 जुलै 2017

शेखर गुप्ता,ज्येष्ठ पत्रकार

शेखर गुप्ता,ज्येष्ठ पत्रकार
कॅनडाचे युवा पंतप्रधान आणि उदारमतवादाचे आशास्थान म्हणून ओळखले जाणारे जस्टीन ट्रुडू यांनी ‘जोड उदारमतवाद’ (हायफनेटेड लिबरल) हा शब्द अलीकडे लोकप्रिय केला आहे. गटातटांत विभागलेल्या, विशेषतः जीन चेत्रिन व पॉल मार्टिन यांच्या विचारांना मानणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी एका मर्यादित अर्थाने त्यांनी हा शब्द वापरला होता. या शब्दाशी खेळताना आपल्या देशात ‘जोड नसलेला उदारमतवाद’ (डिहायफनेटेड लिबरलिझम) कसा असेल याचा विचार मी करतोय. उदारमतवाद म्हणजे एखादी कल्पना, प्रश्‍न वा जनतेकडे खुल्या मनाने बघणे असेल, तर हा उदारमतवाद त्याच्या जोडीने येणाऱ्या निष्ठांसोबत टिकू शकेल काय?

प्रामुख्याने डावे आणि उजवे असे दोन ठळक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. निश्‍चित मते नसणाऱ्यांसाठी ‘मध्यममार्गी’ असाही पर्याय आहे. नेहरूंचा सौम्य उदारमतवाद, इंदिरा गांधी यांचा गुलाबी आणि दीनदयाळ उपाध्याय यांचा केशरी गुलाबी उदारमतवाद (होय, आज ही गोष्ट अस्तित्वात आहे) असे पर्याय उपलब्ध असू शकतात. याशिवायही इतर शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. डाव्यांपासून सुरवात केल्यास आदरणीय समाजशास्त्रज्ञ पार्थ चॅटर्जी आहेत, ज्यांना जनरल रावत यांच्यात जनरल डायरचा प्रतिध्वनी ऐकू येतो. ईशान्येकडील आदिवासी राज्ये तसेच काश्‍मीर भारताच्या वसाहती असल्याचे ठाम मत मांडत ते आपल्या उदारमतवादाची कठीण परीक्षाही पाहतात. आता उजव्यांकडे वळताना तरुण विजय यांच्या विचारांचा परामर्श घेऊ. दलितांच्या मंदिर प्रवेशाच्या हक्कासाठी लढताना विजय यांना दिल्ली गोल्फ क्‍लबच्या जागी ईशान्येकडील राज्यांसाठी सांस्कृतिक केंद्र हवे आहे. अर्थात, त्यांची विचारनिष्ठा असलेल्या गटामुळे ईशान्येकडील आदिवासींसाठी त्यांचे नैसर्गिक अन्न (गोमांस) आणि दलितांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेला चामड्याची पादत्राणे निर्मितीचा उद्योग धोक्‍यात आला आहे, याकडे क्षणभर दुर्लक्ष करूया. तुम्ही जंतर-मंतरवरील निदर्शनांना उपस्थित राहता अथवा नाही तसेच ‘नॉट इन माय नेम’ हा ‘हॅशटॅग’ वापरताय की नाही यावरूनही तुमच्या विचारांचा कल सध्या जाणून घेतला जाऊ शकतो. मी मात्र या दोन्ही परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण ठरतो.

विविध प्रकरच्या लेबलांमुळे आपल्या खांद्यावरील वजन वाढते. हे लेबल जेवढे वजनी तेवढा हा भार पेलून खुल्या मनाने विचार करणे अवघड बनत जाते. तसा प्रयत्न करत असाल, तर मग तुम्ही सतत भूमिका का बदलता, तुम्ही भूमिकेवर ठाम का राहू शकत नाही, या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. गोमांसावरून होणाऱ्या हत्यांसाठी टीका केल्यानंतर अथवा एअर इंडियातील निर्गुंतवणुकीसाठी नरेंद्र मोदी यांची प्रसंशा केल्यानंतर असे प्रश्‍न डाव्यांकडून उपस्थित केले जाऊ शकतात. तसेच एका युवकाचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याच्या लष्करी अधिकाऱ्याच्या कृत्यावर टीका केल्यानंतर उजव्यांकडून अशाच प्रश्‍नांची सरबत्ती होईल. लष्कराचे समर्थन न करता तुम्ही भारतीय कसे असू शकता, हा प्रश्‍न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर रावत यांची डायर यांच्याशी केलेली तुलना अमान्य असल्याचे सांगताच अगदी ‘मध्यम’मार्गियांकडून संबंधितांच्या ज्ञानावर प्रश्‍न उपस्थित करणारे तुम्ही कोण, अशी विचारणा होऊ शकते.

या सर्व प्रश्‍नांवर साधी-सोपी उत्तरे आहेत. पहिले उत्तर, दोन असत्यांची जोडी म्हणजे सत्य नव्हे. तसेच डझनभर असत्य वचने एक सत्यवचन खोडून काढू शकत नाही. दुसरे असे, की देश आणि लष्कराचे समर्थन करणे म्हणजे कोणताही विचार न करता घटनात्मदृष्ट्या बेकायदा आणि लष्करदृष्ट्या अनैतिक कृत्याचे समर्थन करणे नव्हे. तिसरे, प्रतिष्ठेचा तथ्याशी काय संबंध? एखाद्याच्या ज्ञानाचा हवाला देऊन वादविवाद होऊ न देणे हे उदारतेचे लक्षण नव्हे. तुम्हाला तसे वाटत असेल, तर तुमच्या व्याख्येत चपखल बसेल, असा जोड शोधावा लागेल.

या मुद्यांवर जगभरात भरपूर लिखाण आणि चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांचा उदय, ब्रेक्‍झिट आणि ल पेन यांच्याबद्दलची भीती, हुजूर पक्षाचे बर्नी सॅंडर्स आणि मजूर पक्षाचे जेरेमी कॉर्बिन यांच्यात आणि मोदी-शहा यांचा भाजप कडव्या राष्ट्रवादाकडे वळणे यांच्यात समांतरपणा दिसू शकतो. या कडव्या राष्ट्रवादाचा सामना विरोधकांकडून अतिउदार विचाराने केला जात आहे. यामुळे ‘भारत तेरे तुकडे’ म्हणणाऱ्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांना एक बाजू देशद्रोही ठरवून कारागृहात डांबते, तर दुसऱ्या बाजूचे या विद्यार्थ्यांच्या लढ्यात त्यांच्यासोबत मैदानात उतरतात. याचा निकाल म्हणजे पहिल्या बाजूचा विजय. या लढ्यात पराभूत होतो तो उदार विचार करणारा भारतीय, जो घोषणा देणे हा वैचारिक असहमती दर्शविण्याएवढाच वैयक्तिक हक्काचा भाग आहे, असे मानतो. अशा प्रकारच्या स्वातंत्र्याला माझ्या गणराज्यात घटनेने सुरक्षा देण्यात आली आहे. या हक्कांचे वेळप्रसंगी बळाचा वापर करून संरक्षण करणे, ही घटनेने स्थापित राज्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळेच माओवाद्यांना घेरून मारण्याची वा बुऱ्हाण वाणीचा खात्मा करण्याच्या कृत्याची प्रसंशा केली जाते. तशी घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावण्याची वा निःशस्त्र युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्याच्या कृत्याची प्रशंसा होऊ शकत नाही.

उदारमतवादाच्या पर्वाचा अखेर झाला असल्याचे भाष्य करणारे बरेचसे लिखाण अलीकडच्या काळात प्रकाशित झाले आहे. फरीद झकेरीया (द राइझ ऑफ इललिबरल डेमोक्रसी, फॉरेन अफेअर्स) यांना हा बदल आधीच दिसला. दुसरे नाव आपल्या परिचयाचे आहे. ‘द फायनान्शियल टाइम्स’चे भारतातील माजी प्रतिनिधी एडवर्ड ल्युस (द रिट्रिट ऑफ वेस्टर्न लिबरलिझम) यांनी उदारमतवादाच्या पर्वाच्या अखेराची कारणे कोणती आहेत, याचे विश्‍लेषण केले आहे. यासाठी त्यांनी शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या किमान दोन डझन देशांची उदाहरणे दिली आहेत. सध्या तुर्कस्तानची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे डग्लस रस्कॉफ (प्रेझेंट शॉक ः व्हेन एव्हरिथिंग हॅपन्स नाऊ) यांच्या मते यासाठी आपला उतावीळपणा आणि कुठल्याही गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू न शकण्याच्या प्रवृत्तीत आहे. आपण एक प्रकारच्या घुसळण्यात सापडलो असून निवडण्याची तसेच प्रश्‍न करण्याची क्षमता गमावून बसलो आहोत. अशा परिस्थितीत आपण सोयीची भूमिका घेत विरुद्ध भूमिका घेणाऱ्यांशी लढतो आहोत. परिणामी खंदक लढाईत होते, त्याप्रमाणे मध्यभागी बरीच मोठी जागा खुली सुटली आहे. ही मोकळी जागा किती उपयोगी ठरू शकते, हे एम्यॅन्युल मॅक्रॉन यांच्या मोठ्या विजयाने दाखवून दिले आहे. मॅक्रॉन यांचा विजय, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घसरण, अँजेला मर्केल यांनी आपले स्थान बळकट करणे तसेच ब्रेक्‍झिटवरून सुरू झालेली हळहळ बघता मैदानाचा मध्य आळशीपणे सोडून दिलेला आहे, असे जाणवते. मॅक्रॉन यांच्या उदयामुळे शब्दकोशात कट्टर मध्यममार्गी (रॅडिकल सेंटर), शक्तीशाली मध्य अशा शब्दांची भर पडली आहे. भारतीय बुद्धिवादी परंपरेने पाश्‍चिमात्त्यांचे अनुकरण करत असल्याने या साऱ्या प्रकाराची चर्चा येथेही सुरू होऊ शकते. 

ज्ञान हे नेहमीच अपरिचित ठिकाणी मिळते. जसे ते ‘अनबॉक्‍स जिंदगी’ ही ‘स्नॅपडिल’ची ‘टॅग लाइन’ सुचणाऱ्या लेखकाच्या डोक्‍यात जाणवते. या ‘टॅगलाइन’प्रमाणे भारतीय उदारमतवाद्यांनी चौकटीच्या बाहेर पडण्याची गरज आहे. समाज तसेच अर्थव्यवस्थेसाठी एक नवा उदार दृष्टिकोन रुजविण्यासाठी हे गरजेचे आहे. या उदारमतवादात घटनेचे पावित्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा कायम राहील. दहशतवादी आणि माओवादी कारवायांसाठी कोणतेही ‘मूळ कारण’ या उदारतेला मान्य राहणार नाही. ही उदारता अस्तित्वात आल्यास तुम्हाला कोणताही मुद्दा पटवून देण्यासाठी ना जंतर-मंतरवर जावे लागेल ना ‘हॅशटॅग’ चळवळ चालवावी लागेल. या चिन्हविरहित उदारतेसाठी ‘मिशन स्टेटमेंट’ म्हणून मी सुचवेन ः डावे म्हणतात मी उजव्या विचारांचा आहे. उजवे म्हणतात मी डावा आहे. म्हणूनच माझी दोहोबाजूंनी हेटाळणी होतेय.

Web Title: shekhar gupta article