शेंद्रा बदललं औद्योगिक वसाहतीमुळे !

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर सुमारे १७ किलोमीटर अंतरावरचं शेंद्रा हे छोटंसं खेडेगाव. इथे शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत विकसित होण्यास सुरुवात झाली अन्‌ गावचे औद्योगिक शहर होऊ लागले.
Shendra Industrial Estate
Shendra Industrial Estatesakal
Updated on

रणरणत्या उन्हाळ्याचे दिवस. अवतीभवती दिसणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळा. पिकांची काढणी झाल्यानं दिसणारी ओसाड शेतं. यात्रेच्या निमित्ताने गावात होणारी गर्दी. गावकुसाजवळ रानोमाळ मिळेल त्या सावलीत कंदुरीचा रस्सा ओरपणारी माणसं. लोकांचा गलका हे एक चित्र. तर दुसरीकडे गावात कमरेला गळ टोचून मांगीरबाबाच्या नावाचा जयघोष करत धावणारे भाविक अशी पूर्वीची ओळख असलेले, श्री क्षेत्र मांगीरबाबा देवस्थानमुळे राज्यभर नाव पोचलेले शेंद्रा (कमंगर) आज पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमुळे जगाच्या नकाशावर पोहोचले आहे, इथे विविध मोठे अनेक उद्योग सुरू झालेले असून आणखी नवीन उद्योग प्रस्तावित आहेत.

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर सुमारे १७ किलोमीटर अंतरावरचं शेंद्रा हे छोटंसं खेडेगाव. इथे शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत विकसित होण्यास सुरुवात झाली अन्‌ गावचे औद्योगिक शहर होऊ लागले. यानंतर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत इथल्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. आता शेंद्रा-बिडकीन पट्ट्यात देशातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी ‘ऑरिक’ उभी राहत आहे. याच गावाच्या परिसरात आता मोठाल्या इमारती, रो-हाउसेस, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभे राहिले आहेत. वेगाने शहरीकरण होणारा शेंद्रा परिसर आता छत्रपती संभाजीनगरचे उपनगर बनत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर-परिसर १९८० च्या दशकापासून औद्योगिक आणि विशेष करून ऑटोमोबाइल हब म्हणून नावारूपाला आला. १९९० च्या दशकात आशिया खंडातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर अशी ओळख या शहराने निर्माण केली. या काळात शहरालगत रेल्वे स्टेशन, चिकलठाणा, अहिल्यानगर रोडवर वाळूज आणि पैठण रोडवरील चितेगाव येथील औद्योगिक वसाहतींत मिळून जवळपास पाच हजारांवर उद्योग कार्यान्वित झाले. यानंतर वर्ष दोन हजारमध्ये शेंद्रा पंचतारांकित वसाहत विकसित होण्यास सुरुवात झाली.

अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांनी आपले कारखाने सुरू केले. या ठिकाणचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात शेंद्रा-बिडकीनचा समावेश केला. त्यानुसार औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थातच ऑरिक (शेंद्रा-बिडकीन) हे शहर आठ हजार चारशे हेक्‍टर जागेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होत आहे. २०१९ मध्ये सात सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील शेंद्रा येथील वसाहत आणि प्रशासकीय इमारत असलेल्या ''ऑरिक हॉल''चे लोकार्पण झाले. यानंतर शेंद्रा गावालगत असलेल्या जमिनीला सोन्याचा भाव आला.

उद्योगनगरी

पूर्वी शेंद्राबन आणि शेंद्रा कमंगर अशी गट ग्रामपंचायत होती. लोकसंख्या फक्त दीड ते दोन हजारांच्या जवळपास होती. यानंतर १९८७ मध्ये शेंद्रा कमंगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या दोन हजार ९८७ आहे. मात्र, औद्योगिक विकासामुळे येथील लोकसंख्या आता दहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जुन्या गावात पाचशेच्या आसपास घरे आहेत. गावाच्या मध्यभागी आहे मांगीरबाबांचे मंदिर. हे मंदिर राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

पूर्वी मांगीरबाबा यात्रेत नवस फेडण्यासाठी अनेक जण पाठीत गळ टोचून घेत. मात्र येथे झालेला विकास, ग्रामस्थांचा पुढाकार, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे गळ टोचण्याची प्रथा दोन वर्षांपासून बंद झाली आहे. या वसाहतीत आजघडीला स्कोडा, ऑडी, फोक्सवॅगन, लिभेर, स्टरलाइट, वोखार्ड, एच ऑन, पर्किन्स, मॉन्जिनीज, सिमेन्स यांसारख्या बड्या कंपन्यांचे कारखाने येथे आहेत. महावितरणचे मोठे पॉवर हाउस आहेत.

चाळीस टक्के जमिनींवर घरे

शेंद्रा कमंगर गावातील एकूण जमिनीच्या तीस टक्के जमिनी एमआयडीसीत घेतल्या गेल्या. चाळीस टक्के जमिनीवर रो-हाउस, रहिवासी सोसायट्या, घरे, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स तर तीस टक्के जमिनीवर शेती होती. १९९८ च्या जवळपास शेंद्रा परिसरातील तीन हजार एकरपेक्षा जास्त जमिनी एमआयडीसीसाठी घेण्यात आल्या. यानंतर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत जवळपास आठ हजार एकर जमीन संपादित झाली.

शेंद्रा कमंगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत १०४ लहान-मोठ्या कंपन्या आहेत. ऑरिक सिटीमुळे जमिनीला सोन्याचा भाव आहे. याच जमिनीवर आता कारखान्यांसह बंगले, घरे, टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. गावात २४ तास वीज आहे. तर एमआयडीसीडीचे पाणी येणार असल्याने परिसरही झपाट्याने विकसित होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर ते शेंद्रा या १०-११ किलोमीटरच्या अंतरात हॉटेल, शाळा आणि नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. मांगीरबाबा देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्करराव कचकुरे पाटील म्हणाले, पूर्वी आमचे संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून होते. शेती करायला परवडत नाही.

आमच्या भागात एमआयडीसी आली आणि जमिनीचे भाव वाढले. जमिनीला चांगला भाव मिळाला आहे, आता इथले बहुतांश लोक प्लॉटिंग करत आहेत, एमआयडीसी आल्याने चांगलेच झाले आहे. स्कोडा कंपनीने पहिली ते आठवीपर्यंतची दोन मजली शाळा बांधून दिली आहे. इथल्या लोकांना रोजगार मिळाला आहे आणि गावाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचा आम्हाला आनंद आहे.

गावचे नशीब उजळले

औद्योगिक विकासामुळे गावाने कात टाकली आहे आणि ते आता शहरी धाटणीचे झाले आहे. मातीच्या विटा, भेंड्यांची घरे जाऊन आरसीसीची घरे होत आहेत. मात्र हे करताना गावचे गावपणही टिकवून ठेवले आहे. परिसरात लहान-मोठे उद्योग असल्याने वसाहत वाढली आहे. प्रत्येक महिन्यात नवीन कारखान्याचे काम सुरू होत असल्याचे चित्र आहे, असे शेंद्रा कमंगरचे माजी उपसरपंच तथा मांगीरबाबा देवस्थान समितीचे सचिव सुरेश नाईकवाडे यांनी सांगितले.

ते सांगतात, गावातील जमिनी औद्योगिकीकरणासाठी संपादित झाल्या. त्याचा मोबदला देखील आम्हाला चांगला मिळाला. ज्या जमिनीचे भाव हजारात होते त्याला आज करोडोचा भाव आहे. घरे, रो-हाउस, सोसायट्या चौफेर उभे राहिले. माजी मंत्री, राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यामुळे आमच्या इथे पंचतारांकित एमआयडीसी झाली आणि आमच्या गावाचा कायापालट झाला नव्हे तर नशीबच उजळले म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com