esakal | लोकगीतातील शिंदेशाही : गणपती माझा नाचत आला
sakal

बोलून बातमी शोधा

लोकगीतातील शिंदेशाही :  गणपती माझा नाचत आला

लोकगीतातील शिंदेशाही : गणपती माझा नाचत आला

sakal_logo
By
आनंद शिंदे

लोकगीते, उडती गाणी, कोळीगीते सर्व काही सुरू होते आणि ‘व्हीनस’ने माझ्या आवाजात ‘गणेशचतुर्थी’ची गाणी करायचं ठरवलं. त्यामध्ये माझे वडील महागायक प्रल्हाद शिंदेही इतर गीते गाणार होते. माझ्या वाट्याला आलेलं गाणं इतकं प्रसिद्ध झालं की, नंतर ते त्या कॅसेटचं शीर्षक झालं. ते गाणं होतं, ‘ताश्याचा आवाज तारारारा झाला, गणपती माझा नाचत आला...’

मुंबईमध्ये मिल कामगारांचे होत असलेले संप, बंद पडत चाललेल्या मिल, हाहाकार माजलेल्या त्या चाळी आणि त्यात आलेली गणेशचतुर्थी. अशा परिस्थितीत विघ्नहर्त्या गणरायाला साकडे घालून गणेशोत्सव साजरा केला जायचा. कामगारांची व्यथा मांडणारे आणि आपल्या हलाखीच्या दिवसांतही गणरायाची जशी जमेल तशी सेवा करत चाळीत हे गणेशभक्तीचे आर्त स्वर निनादत होते.

‘नाव काढू नको तांदुळाचे,

केले मोदक लाल गव्हाचे

हाल ओळख साऱ्या घराचे,

दिस येतील का रे सुखाचे

सेवा जाणुनी गोड मानुनी,

द्यावा आशीर्वाद आता ॥

बाप्पा मोरया रे...

चरणी ठेवितो माथा ॥

आली कशी पहा आज वेळ,

कसा बसावा खर्चाचा मेळ

प्रसादाला दूध आणि केळ,

साऱ्या प्रसादाची केली भेळ

गुण गाईन आणि राहीन,

द्यावा आशीर्वाद बाप्पा ॥’

हे गीत माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी गायले, जे आजही रसिकमनावर गारूड घालत आहे. तसाच काळ माझ्याही नशिबी आला.

लोकगीतं, उडती गाणी, कोळीगीतं सर्व काही सुरू होते आणि व्हीनस कॅसेट कंपनीने माझ्या आवाजात ‘गणेशचतुर्थी’ची गाणी करायचं ठरवलं. त्या कॅसेटमध्ये माझ्यासोबत माझे वडील महागायक प्रल्हाद शिंदेही इतर गीतं गाणार होते. मला जराही अंदाज नव्हता की, माझे यातले एक गीत माझ्या नावाला वेगळी कलाटणी देईल. कारण ‘आता तरी देवा मला पावशील काय’पासून गणरायाची असंख्य एक से एक हिट गाणी त्या काळी माझे वडील एकामागून एक देतच होते. पहिल्यांदा मला संधी मिळाली की, त्यांच्यासोबत एकाच कॅसेटमध्ये चार गाणी गाण्याची. त्यातही माझ्या वाट्याला आलेलं गाणं इतकं प्रसिद्ध झालं की, नंतर ते त्या कॅसेटचं शीर्षक झालं. नव्याने ती कॅसेट रिलीज झाली. ते गाणं होतं, ‘ताश्याचा आवाज तारारारा झाला, गणपती माझा नाचत आला’ गणेशाची मिरवणूक आजही या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही.

पहिल्यांदा वडिलांना माझ्या गाण्याची फर्माईश ऐन कार्यक्रमात प्रेक्षकांकडून आली, तेव्हा ते गर्वाने सांगायचे, ‘‘आज मी माझ्या मुलाच्या आवाजातलं भक्तिगीत गातोय!’’ तेव्हा माझा ऊर भरून यायचा आणि वेगळाच अभिमानास्पद आनंद वाटायचा. कैक वेळेला ते, ‘‘आनंदने नाव राखलं माझं’’, असे माझ्या आईजवळ कौतुक करत सांगायचे. आईही मोठ्या आनंदाने त्यांनी केलेली प्रशंसा माझ्यापर्यंत पोहचवत.

एकामागोमाग कैक गणपतीगीते दरवर्षी येत गेली आणि एक दिवस टी सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्यासाठी ‘आय एम हॅपी गणपती बापा’ हे गीत गायलं, तेही सुपरहिट झालं. गुलशन कुमार यांनी मला बोलावलं. या गाण्याला मिळालेल्या अफाट यशावर खुश होऊन, त्यांच्या हातातला मोबाईल मला भेट म्हणून दिला. तो मोबाईल म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला मोबाईल! त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी मी आजवर २५० च्यावर गणपतीची गाणी गायलीत. गणपती अल्बम २०० च्या वर गायली आहेत.

बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार इलाय राजा सर यांच्या संगीतातील ‘हॅलो जयहिंद’ची निर्माती व अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या आग्रहाखातर चित्रपटातील गणपती मिरवणुकीतील गीत मी गायलं. राष्ट्रीय पुरस्कारविजेते युवा संगीतकार शैलेंद्र बर्वे यांचे ‘जय घोष चाले तुझा मोरया’ हेही गीत मीच गायलं. गणेश गली, लालबागचा राजा, सिद्धिविनायक ते अष्टविनायक अशा सर्व गणेश मंदिरांत मी आजवर गायलो आहे. अनेकदा तर ताशाचा आवाज तारारारा झाला, हे गीत लागोपाठ दहा वेळेस वन्स मोर करत करत गायलं. गायक म्हणून जे जमलं ते मी १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आणि रसिक मायबापांनीही मला तितकंच प्रेम देत माझ्या सर्व गाण्यांवर सण, उरूस, जत्रा, मिरवणुका गाजवल्या. रसिकजनांतच मला माझा देव दिसतो आणि त्यांची सेवा मी अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

loading image
go to top