

Chh. Shivaji Maharaj History
esakal
अनुकूल संधी आणि परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय प्रत्यक्ष लढाई करावयाची नाही असे तंत्र असणाऱ्या मराठ्यांनी मुघलांची दमछाक केली. त्यांच्या युद्धनीतीचा उद्देश होता—वारंवारच्या द्रुतगती हालचालींनी शत्रूच्या छावण्यांत संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण करून खच्चीकरण करणे. त्यामुळे अशा वेळी जेव्हा मराठ्यांना प्रत्यक्ष संरक्षण असलेल्या सैन्यांचा सामना करावा लागे, तेव्हा ते लढाई सोडून तत्काळ माघार घेत. या निष्फळ पाठलागामुळे थकलेल्या आणि निराश मुघलांनी, मराठ्यांच्या माघारीला स्वतःचा विजय मानून समाधान मानले.
१६७५च्या सुरुवातीपूर्वीच शिवाजी महाराजांनी दंडा-राजपुरीसमोर समुद्रात ‘कांसा’ नावाच्या बेटावर नवा जलदुर्ग उभारला, जो पुढे ‘पद्मदुर्ग’ म्हणून ओळखला गेला. जंजिराच्या वायव्य दिशेस चार किलोमीटर आणि मुख्य भूमीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा जलदुर्ग दंडा-राजपुरीवरील नियंत्रणासाठी बांधण्यात आला होता. १९ जानेवारी, १६७५ रोजी जिवाजी विनायक यास पाठविलेल्या पत्रात महाराजांनी याचा उद्देश स्पष्ट केला आहे.