शिवरायांच्या गडांची मनसोक्त भटकंती

आशिष तागडे
रविवार, 22 एप्रिल 2018

मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्‍य असतं. गडकोटप्रेमींची ही उत्सुकता पूर्ण केली आहे रमेश नेवसे यांनी. एकूण 17 किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकरूपी मालिका नेवसे यांनी तयार केली आहे.

मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती घेण्यात विशेष औत्सुक्‍य असतं. गडकोटप्रेमींची ही उत्सुकता पूर्ण केली आहे रमेश नेवसे यांनी. एकूण 17 किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकरूपी मालिका नेवसे यांनी तयार केली आहे. यामध्ये त्या किल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे, तर त्याची बांधणी, त्या ठिकाणी झालेली युद्धं, त्यांची वैशिष्ट्यं, पर्यटन आदी गोष्टींचीही सविस्तर माहिती समाविष्ट आहे.

गडांचा राजा मानल्या जाणाऱ्या राजगडासह स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला असलेला रायगड; शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा, विशालगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा, कुलाबा, वसई, अजिंक्‍यतारा, सज्जनगड अशा किल्ल्यांवर मनसोक्त मुशाफिरी करण्याची संधी या पुस्तकाच्या रूपानं मिळते. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या सर्व किल्ल्यांची एकत्रित माहिती असणारं स्वतंत्र पुस्तकही या किल्ल्यांच्या मालिकेत आहे.

नेवसे मूळ मेकॅनिकल ड्रॉफ्ट्‌समन. खासगी कंपनीत नोकरी करत असताना त्यांना किल्ल्यावरच्या भटकंतीचा छंद जडला. ही भटकंती पूर्ण होत असतानाच त्यांना यावर लिखाण करण्याची इच्छा झाली. प्रत्येक किल्ल्याचा बारकाईनं अभ्यास करत त्यांनी गडाचं शब्दरूपी दर्शन वाचकांना घडवलं आहे. गडांची माहिती देत असताना त्यामध्ये आवश्‍यक ठिकाणी छायाचित्रांचाही समावेश त्यांनी केला आहे. नेवसे गडांची माहीत देऊन थांबले नाहीत. गडावर गेल्यावर काय काळजी घ्यायची यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. गडाच्या आसपासच्या गावात पाहण्यासाठी असलेल्या अन्य काही प्रेक्षणीय स्थळांचीही माहिती त्यांनी दिली आहे.

रायगड हा पिकनिक स्पॉट नाही, मराठी माणसाचं श्रद्धास्थान आहे. कमीत कमी एक रात्र तरी मुक्काम केल्याशिवाय रायगडाचं महात्म्य लक्षात येत नसल्याचं सांगत त्यांनी गडावर जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची हे ते अधोरेखित करतात. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित झाले, त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगांना रायगड साक्षी आहे. त्यामुळं सर्वांसाठी रायगड हे पवित्र तीर्थस्थान असल्यानं काही कर्तव्यं पाळलीच पाहिजेत, हे नेवसे यांनी सांगितलं आहे.
शिवनेरी किल्ला आपल्यापाशी त्याचं मनोगत व्यक्त करत असल्याचा भास "शिवनेरी'संदर्भातलं पुस्तक वाचताना येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या "शिवनेरी'ची वेगळ्या पद्धतीनं ओळख नेवसे यांनी गडप्रेमींना करून दिली आहे. या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला पोवाडा वाचायला मिळतो. वाचकांच्या दृष्टीनं ही अनोखी भेट मानावी लागेल. अन्य पुस्तकांपेक्षा याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्यात "शिवनेरी कालपट' देण्यात आला आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळख असलेल्या राजगडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यातले बारकावे "किल्ले राजगड'मध्ये टिपण्यात आले आहेत. राजगड हे मराठी माणसाचं वैभव आहे. देखणा, बुलंद बालेकिल्ला असलेला आणि तीन माची असलेला हा जगातला एकमेवाद्वितीय किल्ला. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड होता. या गडावरची तटबंदी, बुरुज यांची बांधकामं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गडाची माहिती वाचताना अंगावर शहारे येतात. पुस्तकात गडावरचे सर्व बारकावे लेखकानं टिपले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावरच्या पुस्तकात गडावरची सदरेची जागा, बांधकामाचं वैशिष्ट्य यांची माहिती आहे. एवढंच नव्हे, तर याच परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या घाटरस्त्यांचं वर्णन वाचनीय आहे. पारघाट हा सर्वसामान्यांना लक्षात येत नाही, त्याचीही माहिती आणि महत्त्व विशद करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या शिवकालीन वाटांची (रस्त्यांची) माहिती त्या वेळच्या परिस्थितीची जाणीव करून देते.
सिंहगडावरच्या संग्रामासह पुरंदर, विशालगड, पन्हाळा, तोरणा, अजिंक्‍यतारा आणि सज्जनगडाचा इतिहास लेखक रंजक पद्धतीनं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये सागरी दुर्गांनाही अनन्यसाधारण महत्त्व होतं. ते लक्षात घेऊन सिंधुदुर्ग, जंजिरा, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्गाची भटकंती लेखकानं चांगल्या पद्धतीनं मांडली आहे. किल्ले, दुर्ग याच्या इतिहासाबरोबर माहीत नसलेल्या; परंतु शिवकालीन महत्त्वाच्या वाटांची दिलेली माहिती दुर्गभ्रमंती करणाऱ्यांना दिशादर्शक आहे.
एकाच वेळी इतक्‍या किल्ल्यांची माहिती फिरून संकलित करणं सोपं नाही. कारण बहुतांश किल्ल्यांबद्दल आजवर अनेक वेळा पुस्तकं आली आहेत. तरीही नेवसे यांचा हा वेगळा प्रयत्न कौतुकास्पद आहे. राजगड, रायगड आणि अन्य सर्वच गड मराठी माणसाची स्फूर्तिस्थानं आहेत. पुढच्या पिढीला या वास्तू पाहता येण्यासाठी आताच्या पिढीनं काळजी घेण्याचा सल्ला देण्यास नेवसे विसरले नाहीत आणि तो सल्ला योग्यही आहे. पर्यटन म्हणून आपण ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जात असलो, तरी आपल्या प्रेरणास्थानांची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. "मला काय त्याचं' ही वृत्ती सोडावी लागेल. कोणत्याही गडावर जाण्यापूर्वी एक लक्षात ठेवावे की, शिवरायांचे गड सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. गडावरचा एक-एक चिरा लाखमोलाचा आहे. गडावरच्या इंच इंच भूभागावर शिवरायांच्या पावलांचा ठसा उमटलेला आहे. स्वराज्यनिर्मितीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अनेक वीरांनी बलिदान केलं आहे, याची जाणीव गड पाहताना ठेवावी, अशी रास्त अपेक्षा नेवसे यांनी व्यक्त केली आहे आणि त्याला पूरक विविध कानमंत्रही दिले आहेत.

पुस्तकांची नावं (कंसात अनुक्रमे पृष्ठसंख्या आणि रुपयांमध्ये मूल्य) :
गडांचा राजा : राजगड (128/130), राजांचा गड : रायगड (280/300), किल्ले शिवनेरी (102/120), किल्ले विजयदुर्ग (136/150), किल्ले जंजिरा (144/140), नरवीर तानाजींचा सिंहगड (110/120), किल्ले प्रतापगड (118/130), किल्ले वसई (128/130), किल्ले पुरंदर (112/130), किल्ले सातारा (128/130), समर्थांचा सज्जनगड (80/100), किल्ले कुलाबा (128/130), किल्ले सुवर्णदुर्ग (80/90), किल्ले सिंधुदुर्ग (80/100), किल्ले तोरणा (86/90), किल्ले विशाळगड (128/130), किल्ले पन्हाळा (112/120), पुणे जिल्ह्यातील किल्ले (176/200)
लेखक : रमेश नेवसे
प्रकाशक : राजमुद्रा प्रकाशन, पुणे (9067165352)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivaji maharaj fort book review in saptarang