आपण कुठं नेतोय ‘महा’राष्ट्र?

पारंपरिक उत्सवाच्या नावाखाली ढोल-ताशांचा दणदणाट आणि पोवाड्यांच्या नावाखाली साउंडचा कानठळ्या बसवणारा दणदणाट आता सर्वत्र होऊ लागला आहे.
dj sound
dj soundsakal

शिवजयंती नुकतीच तिथीप्रमाणं होऊन गेली. जुन्या लोकांना हे आठवत असेल, की दरवेळी शिवजयंतीच्या अगोदरपासूनच उत्साही कार्यकर्त्यांची लगबग सुरू व्हायची, ती म्हणजे पताका लावण्यासाठी, महाराजांची मूर्ती सुशोभित करून त्याच्या डेकोरेशनसाठी, निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी, व्याख्यानांसाठी, प्रदर्शनांसाठी आणि सर्वांत महत्त्वाचे कोण-कोण ज्योत घेऊन जवळच्या किल्ल्यावर जाणार आहे यासाठी.

मात्र जसजसं नेत्यांचं राजकारण बदलतंय, ते पाहून मंडळाचा कार्यकर्तादेखील बदलतोय की काय कुणास ठाऊक? कारण आताच्या शिवजयंती उत्सवामध्ये अनेक मंडळांनी डी. जे. साउंडचा दणदणाट, लायटिंगचा झगमगाट, कार्यकर्त्यांचा थयथयाट आणि फटाक्यांची यथेच्छ आतषबाजी यांची मनसोक्त उधळण केली.

बहुधा निवडणूक तोंडावर असल्यानं त्यांना कोणी दाता भेटला असावा. हे सर्व पाहून वाईट वाटले. सर्वांत महत्त्वाचं मंडळा-मंडळांमध्ये या गोष्टींची चढाओढ सुरू असलेली पाहून तर अतीव दुःख झाले. जी गोष्ट गणेशोत्सवामध्ये झाली आहे, त्याची सुरुवात हळूहळू आता इतरही सण-समारंभांमध्ये, जयंती-पुण्यतिथींच्या कार्यक्रमात होऊ घातलेली आहे.

पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या मोठ्या शहरांमध्येच नाहीतर आता गावोगावी हे प्रस्थ वाढू लागलं आहे. पारंपरिक उत्सवाच्या नावाखाली ढोल-ताशांचा दणदणाट आणि पोवाड्यांच्या नावाखाली साउंडचा कानठळ्या बसवणारा दणदणाट आता सर्वत्र होऊ लागला आहे. हा आवाज मानसिक ताणासोबतच तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरतो. हे सर्वश्रुत असूनही कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.

पोलिस, मनपा प्रशासन, मंडळातील ज्येष्ठ मंडळी, जागरूक नागरिक आणि सर्वांत महत्त्वाचं या वृत्तींना नकळत पाठीशी घालणारे नेते-मंडळी यांनी वेळीच याकडं लक्ष देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

मंडळातील काही द्रष्टे लोक याला विरोध करतात. तरुण पिढी मात्र डी.जे. लावण्यासाठी कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. या प्रकारांमुळे अनेक मंडळांत फूट पडत चालली आहे. उलट डी.जे. लावल्यामुळे मंडळामध्ये गर्दी होईल, आपले सर्वत्र नाव होईल (?) असे ऐकविले जाते.

आता काही मंडळांनी साउंड लावले, त्यावर गाणीही लावली. काहींनी ठेका धरला तर काहींनी नाही. आता बाहेरची मुले येऊन नाचून गेली तर त्याला मंडळाचा काय दोष, असंही ऐकवलं जातं. नाचणं आलं, तिथं दारू पिणं आलं. दारू आली तिथं भांडणं, मारामाऱ्याही मागोमाग आल्याच.

आता काही उत्साही तरुणांना वाटेल, हे काका काहीही वाढवतायेत. पण यंदाच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत मुलांमध्ये वाद होऊन स. प. महाविद्यालय येथे एकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. हे कशाचे द्योतक आहे. वेळीच सर्वांनी मिळून याला अटकाव आणला नाही, तर पुढं अजून काही महापुरुषांच्या जयंतीच्या वेळा येतच आहेत.

समाजात दृढ होत चाललेल्या या कुप्रथेला बदलवयाचे असेल, तर वैयक्तिक, सामाजिक व संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ज्या महापुरुषांचे उत्सव आपण साजरे करीत आहोत, त्यांना असा साउंडचा दणदणाट, जल्लोष, निरर्थक खर्च अपेक्षित होता का? याची वृत्तपत्र, सोशल मीडिया, फिल्मच्या माध्यमातून जनजागृती करणे. समाजात मान असणाऱ्या विद्वान मंडळींनी यासाठी पुढाकार घेणे.

साउंडमुळे काय-काय आणि कशा प्रकारे वैयक्तिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. याची उत्साही कार्यकर्त्यांना जाणीव करून देणे.

मंडळातील ज्येष्ठ आणि द्रष्ट्या कार्यकर्त्यांनी आपले मंडळ, शहर आणि देश भविष्यातील संकटापासून वाचविण्यासाठी साउंडला कडाडून विरोध केला पाहिजे.

लाइटिंग, साउंड, मिरवणूक यावरील भरमसाठ खर्चापेक्षा विधायक कार्यक्रमाचे आयोजन करणे. विविध क्रीडा स्पर्धा, लहान मुलांच्या विविध स्पर्धा-शिबिरे, युवकांची प्रशिक्षण शिबिरे, रोजगार शिबिरे, आरोग्य शिबिरे, व्याख्याने इत्यादींचे आयोजन करणे.

आता ‘या देशातील एकमेव राष्ट्र - महाराष्ट्र’ असा गौरव करणाऱ्या या राज्यातील तमाम विद्वान, अभिजन वर्गास आणि सुजाण नागरिकांस हडबडून जागं होण्याची वेळ आलेली आहे. आताच या भस्मासुर वृत्तीस गाडलं नाही तर तो अक्राळविक्राळ रूप धारण करेल आणि मग त्याला आवरणं अजूनच कठीण होईल. महाराष्ट्र ‘महान’ आहे असं नुसतं म्हणून चालणार नाही तर तो ‘महान’ राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com