बाबासाहेब तुम्ही शब्द पाळलात, पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबासाहेब तुम्ही शब्द पाळलात, पण

बाबासाहेब तुम्ही शब्द पाळलात, पण

‘‘दिलेला शब्द आणि दिलेली वेळ ज्याला पाळता येत नाही, त्याच्यासारखा दुसरा भ्रष्टाचार नाही, या जगात राहण्याचा अधिकारच त्याला नाही,’’ असं स्वत:सह आयुष्यभरात अगदी घड्याळालाही बजावणारे, त्याप्रमाणे वागणारे बाबासाहेब मात्र आता काळवेळेच्या बंधनांच्या पलिकडं गेले आहेत. त्यांच्यावरील ‘बेलभंडारा’ हा चरित्रग्रंथ मी लिहिला. त्यावेळी प्रास्ताविकात बाबासाहेबांना मी मुजरा करून म्हणालो होतो, ‘‘बाबासाहेब, या सर्वांच्या साक्षीनं आज तुम्ही तुमच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या लक्षावधी शिवभक्तांना एक शब्द द्यावा की, तुमच्या वयाची शंभरी तुम्ही पूर्ण करणार!’’ बाबासाहेबांनी आपल्या मनोगतात खरोखरीच शब्द दिला, ‘‘होय, मी शंभर वर्ष जगणार. पण परमेश्वरानं मला किमान सव्वाशे वर्षांचं आयुष्य द्यावं, अजूनही शिवचरित्र मला ब्रह्मांडापल्याड न्यायचं आहे. त्यासाठी!’’

बाबासाहेब, तुम्ही आम्हा सर्वांना दिलेला शब्द खरोखरीच जिवापाड पाळलात. खरंच वेळ नाही हो पाळलीत! शंभरीतले तुमचे संकल्प, तुमची भाषणं, तुमचं घरी गप्पा मारणं, इतिहास संशोधनाच्या नव्या योजना, तरुण पिढीतल्या मुला-मुलींच्या संशोधनविषयक प्रकल्पांना सक्रिय पाठिंबा हे सगळं आम्ही रोज अनुभवत होतो. आम्ही प्रत्येकानं आपापल्या आयुष्याचा काही काळ तुम्हाला मनोमनी अर्पण केलेलाच होता.

अगदी रुग्णालयात दाखल झालेल्या दुसऱ्या दिवशी अंधुकसं बोलून, बोटाने सहाचा आकडा दाखवून ‘आणखी सहा महिने तरी मला हवेत!’ असं सांगत आपण तीन नोव्हेंबरला घरी भेटायचं ठरलं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत असं पुन्हा पुन्हा तीन बोटांनी दाखवत ही अखेरची लढाईही तुम्ही नेहमीच्या आत्मविश्वासानं लढत होतात. परंतु बाबासाहेब, एकाच वेळी शरीराच्या प्रतिकारक्षमतेची चहुबाजूंनी परीक्षा घेणारी ही लढाई आपण तानाजी, बाजी, मुरारबाजींच्या त्वेषाने लढूनही काही काळानंतर तुमच्याही हाती राहिली नाही. शिवचरित्रासाठी क्षण न्‌ क्षण कष्टलेला शंभरीतला कृश झालेला; परंतु तसाच तेजस्वी आणि आठवणींच्या साऱ्या अक्षांश रेखांशांना धरून ठेवणारा तुमचा देह आता तुमच्या ठायी असलेल्या सहनशक्तीची अखेरची परीक्षा घेत असताना आम्ही पाहिला.

‘हा कोरोना आला नसता आणि आपण पूर्वीसारखेच भेटलो-बोललो असतो ना, गावोगावी गेलो असतो ना तर आणखी पाच वर्षे तरी मला सहजपणे काढता आली असती.’ असं म्हणत खूप कामं अजून करायचीत या एका वाक्यासह तुमच्या डोळ्यात चमकणारा तो आशावाद खूप प्रेरक होता. महापुरुषांना आपल्या अंगीकृत राष्ट्रकार्यासाठी एक जन्म कधीच पुरा पडणारा नसतो. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते, बाबासाहेब परत या.

loading image
go to top