उत्साहाचा अखंड झरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्साहाचा अखंड झरा!

उत्साहाचा अखंड झरा!

बाबासाहेबांच्या निधनाच्या बातमीने मला अत्यंत दुःख झाले आहे. अनेक दशकांची आमची मैत्री होती. माझी मोठी बहीण मीनाताईचे लग्न १९६३ मध्ये कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओत झाले. त्या लग्नात माझी आणि बाबासाहेबांची पहिली भेट झाली. आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. त्यांनी नवे काही लिहिले तर, ते मला वाचून दाखवायचे आणि त्यावर माझी प्रतिक्रिया काय आहे ते विचारायचे. छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, गड-किल्ले याबाबतीतील गोष्टी खूप सांगायचे. त्यानंतरच्या काही वर्षांत ते त्यांच्या कामात व्यग्र झाले आणि मी माझ्या. त्यामुळे आमच्या भेटी कमी झाल्या. पण त्यांनी मला खूप आनंद दिला, उत्साह दिला. ते खूप ज्ञानी होते.

माझी बरीच गाणी त्यांना आवडायची. त्यांचा स्वभाव मिश्कील होता. बाबासाहेब आणि गो. नी. दांडेकर यांची शरीरयष्टी सडपातळच होती. पण त्या दोघांनी सगळे गड पायी पालथे घातले आहेत. बाबासाहेब एकदा रायगडावर गेले असताना त्यांना एक शिवकालीन नाणं सापडले होते. आमच्या एका भेटीदरम्यान त्यांनी ते नाणं मला दिले आणि म्हणाले ‘हे नाणे तुझ्याजवळ ठेव.’ ते नाणे आजही मी जपून ठेवलेलं आहे.

एक दिवस गडावरून ते थेट माझ्या पेडर रोड येथील घरी आले. त्यांच्या पायांना जळवा लागल्या होत्या. त्यांना मी पाय बुडविण्यासाठी गरम पाणी करून दिले. त्यांनी जखमा स्वच्छ केल्या. तेव्हा मी त्यांना दम दिला की अशा वाटांवरून फिरू नका. त्यावर ते मला म्हणाले, ‘‘हेच माझं आयुष्य आहे, मी असेच जगणार.’’ अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. ते मला एकदा पुरंदरवर घेऊन गेले होते. माझ्याबरोबर माझी मुलगी वर्षा आणि मुलगा आनंद होता. तेव्हा प्रचंड धुकं तेव्हा होते. पाऊलभर चिखल होता. पण त्यांनी आमचा हात धरून गडावर फिरवले. मुगाची डाळ त्यांना फार प्रिय. ते घरी आल्यावर मुगाची डाळ, भाज्या करायचे.

माझ्या हातचे ते आवडीने खायचे. मी कधीही मुगाची डाळ केली की आमच्या घरी मला म्हणायचे की आज बाबासाहेब येणार आहेत वाटते....त्यांना एकदा कोणी तरी विचारले होते की आशा कशी आहे? तेव्हा ते म्हणाले की, ‘‘देवळात शंख असतो. त्या शंखात पाणी ठेवून त्यात मोगऱ्याचे फूल जसे टवटवीत दिसेल, तशी आशा आहे.’’

मी प्रभूकुंज हे नवे घर घेतले तेव्हा त्यांनी मला एक चांदीचे ताट, शंकराची पिंड आणि एक नंदी भेट म्हणून दिला. त्यांनी मला दिलेली ही भेट मी जपून ठेवली आहे. त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल झालेल्या समारंभासाठी त्यांनी मला आवर्जून आमंत्रण दिले होते. ती आमची झालेली शेवटची भेट. पण त्यांच्या अशा अनेक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.

loading image
go to top