लग्न होते; पण टिकत नाही!

पूर्वी घटस्फोट अगदी बोटावर मोजण्याइतके व्हायचे; पण आज ते प्रमाण वाढले आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतले जातात.
Marriage
Marriagesakal

- शोभना कसबेकर

पूर्वी घटस्फोट अगदी बोटावर मोजण्याइतके व्हायचे; पण आज ते प्रमाण वाढले आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतले जातात. खरे तर मुला-मुलींच्या समजूतदारपणानेच बरेच प्रश्न सुटणार असतात; पण यासाठी एकमेकांचे सहकार्य अपेक्षित आहे...

आजची तरुण पिढी लग्न करावं की करू नये, या प्रश्नावर घुटमळताना दिसतेय. मन चलबिचल होतंय. पालकांच्या चेहऱ्यावरची चिंता दिसतेय, तर दुसरीकडे लग्नानंतर पदरात पडणाऱ्या जोडीदाराशी जुळवून घेणं जमेल का, याची त्यांच्या मनाला धास्ती वाटतेय.

खरं पाहिलं तर हा काही लग्न न करण्याचा ट्रेण्ड नाही, ना तरुणांची बंडखोर वृत्ती. त्यांनाही लग्न हवं आहे. हक्काचा पार्टनर हवा आहे; पण भीतीपोटी हे आव्हान स्वीकारायला ते राजी नाहीत. आज खुशी आणि लग्न यांची सांगड घालणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. करिअरच्या जबाबदारीमुळे लग्नाचा प्रश्न दुय्यम वाटतोय ही सत्यस्थिती आहे. लग्न म्हणजे प्रचंड तडजोड आहे. असफल होणाऱ्या लग्नापेक्षा लग्न न करता राहणं शहाणपणाचं वाटतंय.

लग्न करणं सोपं आहे; पण ते निभावून नेण्याची ताकद आपल्यात आहे का, याचा अंदाज घ्यायला वेळ हवा आहे; पण हे पालकांना कळत नाही, रुचत नाही. लग्नातून जीवनाला स्थैर्य आणि दोघांची प्रगती अपेक्षित आहे. यासाठी दोघांमध्ये समंजसपणा हवा, संवाद हवेत. करिअरच्या व्यापातून हे साधण्यासाठी वेळ हवा आहे. स्वतःवर प्रेम करण्याची गरज आज दिवसेंदिवस वाढत चाललीय.

आज लग्नात ग्लॅमरचं वलय आलंय. हा एक कॅलक्युलेटेड व्यवहार काही ठिकाणी मानला जातोय, जिथं भावनांचा चुराडा होतो. दिखाऊपणा दिसत राहतो. खरं तर मानसिक आधार, लैंगिक सुख या बाबी महत्त्वाच्या आहेत; पण याचा फारसा विचार केला जात नाही. लग्न संस्मरणीय बनविण्यासाठी फार्म हाऊसेस, लक्झरी हॉटेल्स निवडली जातात. आर्थिक संपत्ती बघून एखाद्याची प्रतिष्ठा मोजली जाते.

केवळ ग्लॅमरपोटी तुम्ही लग्न करायला तयार होत असाल, तर ही धोक्याची घंटा आहे. लग्न टिकण्याची शाश्वती नाही, असं समजायला हरकत नाही. खूप वेळा व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी लग्नाचा तोडगा स्वीकारला जातो, तर कधी शारीरिक विकृती लपवण्यासाठी. ही फसवेगिरी आहे. एकदा का दोघांनी एकमेकांवरचा विश्वास गमावला की संसाराचे धागे तुटलेच समजा. जिथं पालकांना मुलांबद्दल हमी देता येत नाही, तिथं लग्न टिकणारच कसं?

तरुणांच्या मनातील लग्नाची भीती घालवायची आहे. लग्नाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना विचारांचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. ते निर्णय घ्यायला समर्थ आहेत. स्वतः निर्णय घेतल्याने त्यांचं आत्मिक बळ वाढणार आहे. विवाह न करता, कौटुंबिक जीवनाची जबाबदारी न घेता तरुण-तरुणींनी एकत्र रहाण्याची, पाश्र्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्याची प्रथा आपण बघतोय, हे तरुणांच्या चलबिचलतेमुळे झालं आहे.

या विचारसरणीमुळे नैतिकतेला तडे जातीलच; पण याचं कारण आज बदललेल्या मुला-मुलींच्या विचारांना समाजाची मान्यता नाही. पूर्वी घटस्फोट व्हायचे; पण अगदी बोटावर मोजण्याइतके; पण आज तसं नाही. परस्पर संमतीने घटस्फोट घेतले जातात. पूर्वीसारख्या होणाऱ्या सामाजिक टीकेला त्यांना तोंड द्यावं लागत नाही, हे विशेष.

यासाठीच लग्नाला अनिवार्य गोष्ट बनवू नका, तर ऐच्छिक होऊ द्या. कुटुंब संस्थेचा पाया आज मजबूत आहे आणि उद्याही राहील. यासाठी अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. मुलामुलींच्या समजूतदारपणानेच लग्नाचे बरेच प्रश्न सुटणार आहेत; पण यासाठी पालकांकडून सहकार्य अपेक्षित आहे, ते यशस्वी लग्नं होत राहण्यासाठी.

shobhana.kasbekar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com