

Shravan Month Memories
esakal
प्रणव सखदेव
कुसुमाग्रजांच्या शब्दांना पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा स्वरसाज ल्यालेलं गीत मोबाइलमधून झरू लागलं...
हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला...
बऱ्याच वर्षांनी अचानकच, का ते माहीत नाही, पण सकाळी घराबाहेर पडताना हे गाणं आठवलं होतं. दुचाकीवरून जाता जाता नकळत ते गुणगुणू लागलो आणि मीटिंग्ज, भेटीगाठी करताना मनात समांतरपणे त्याची धून मेंदूत निनादत राहिली. म्हणून संध्याकाळी घरी परतल्यावर थोडं निवांत झाल्यावर ते गाणं लावलं आणि कितीतरी आठवणी मनात गोळा झाल्या...
शाळेत असताना श्रावण महिना मला जाम आवडायचा. त्याला तीन मुख्य कारणं होती.
अगदी पहिलं कारण म्हणजे श्रावणी सोमवारी शाळा लवकर सुटायची. घरी लवकर जायला मिळायचं. आई-बाबांचा दिवसभर उपास असल्याने रात्रीचं जेवणही लवकर व्हायचं. म्हणजे एरवी आम्ही रात्री साठेआठ-नऊच्या दरम्यान जेवत असू तर सोमवारी सहा-साडेसहालाच जेवायचो. आणि खास असायचं ते जेवण. केळीच्या पानावर. आई हिरवीगार केळीच्या पानांचे तुकडे मला धुवायला सांगून कापडाने स्वच्छ पुसून घ्यायला सांगायची. त्यातला पानाच्या वरचा – त्रिकोणी टोक असलेला तुकडा नेहमी मला हवा असायचा. छान दिसायचा तो, बोटीसारखा. मग बाबा ती पानं जेवताना नीट राहावीत, वर येऊ नयेत म्हणून, ती पानं जमिनीवर ठेवायचे आणि मधल्या देठाला हाताने जरा जोर लावून दाबायचे. त्यामुळे चर्र असा आवाज व्हायचा आणि पान जरा खाली बसायचं. रवाळ, पाणी असलेला देठ दबला जायचा. मी तो कित्येकदा सोलूनही पाहायचो, तेव्हा मला तो विसविशीत शिवलेल्या कापडासारखा वाटायचा. त्यातले धागे काढून मी त्यापासून काहीबाही आकार तयार करायचो.