

आयुष्यात निळ्या काळ्या ढगांबरोबर पांढरे ढगही अनुभवलेत. चिंचेचं झाड आयुष्यभर सोबत नाही करत कारण चिंचा खाण्याचं एक वय असतं. ते निघून गेलं की चिंचेच झाडही मनातलं हळूहळू धूसर होत जातं. पण मनात घर करून असलेला तो बकुळ आजही सदैव आनंदाच्या क्षणी गंधित करतो. पण निराशेच्या क्षणी मात्र मला तो पावसाच्या झडीतला बकुळ भासतो.
गावात मारोतीच्या पारावर एक भलं मोठ्ठं चिंचेच झाड होतं. तिथं मारोतीच्या मंदिरातला पुजारी आम्हाला झोके टांगून देत होता. मग आमचा मुक्काम सुट्टीच्या दिवशी त्या झोक्यावरच असे. अधे- मधे भूक लागली तर घरी जाऊन यायचं आणि नाहीच तर चिंचेचा पाला खायचा. लागतो खूप छान चिंचेचा पाला आंबटगोड. उन्हाळ्यात जर चिंचेच्या झाडाला लदबद लदबद चिंचा आल्या तर मजाच मजा. पण मग त्या वर्षी आंबे कमी यायचे. कच्चे आंबे खाण्याची वेगळी मजा असायची आणि चिंचा खाण्याची वेगळी मजा असायची. उन्हाळा संपला की मग पावसाळा सुरू होई. त्या काळी आठ आठ दिवसाची झडी लागत असे. इतकी की शाळेतसुद्धा जाऊ शकत नव्हतो. खायचं - प्यायचं अन् दुलईत जाऊन झोपायचं.
मला पाऊस आवडतोच पण झडी लागली की मला आवडायची नाही. श्रावण महिन्यात तर विचारूच नका. नागपंचमीला पाऊस सुरू झाला की आई म्हणायची नागोबाचा फणा ओला करायला पाऊस आला , पोळ्याला पाऊस आला की म्हणायची बैलांचे शिंग ओला करायला पाऊस आला. प्रत्येक सणाला जशी त्याची उपस्थिती प्रार्थनीयचं होती. मला मोठं नवल वाटे की या पावसाला हे सणवार कळतात तरी कसे ? कोण बरं सांगत असेल? मला पावसातल्या झडीचा खूप राग यायचा. एकतर झुल्यावर झोके घ्यायला मिळायचे नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बकुळीची फुलं पार धुळीस मिळत. माझं आवडतं फुलं पण मला ते या झडीच्या दिवसात मिळायचेच नाही.
एका वर्षी चांगली पंधरा दिवसाची झडी लागली. गावात कोणी कोणाला दिसेना. पाऊस सुरू झाला त्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसात बकुळ पूर्ण कोसळला होता. पंधरा दिवस त्याला झडीमुळे पाहताही आलं नाही. मनात खूप दाटून यायचं धावत जाऊन बकुळ पाहून यावा. त्याला शेवटचं डोळा भर पाहावं. पण काही पर्यायचं नव्हता. त्या वर्षी खूप नुकसान झालं होतं. गावातली गुरं-ढोरं मेली, कुणीतरी भिंत खचून मेलं. पण मग पुढे मोठे झाल्यावर शिक्षण संपल आणि लग्नानंतर हळूहळू सगळाच विसर पडत गेला आणि आयुष्याचा दोर कधी जोरात तर कधी हळू झोके द्यायला लागला.
श्रावणात घन निळा बरसला हे गाणं लागलं की मला माझ्या मनातला बकुळ प्रकर्षाने आठवतो. या वर्षी श्रावणात मात्र खूप पाऊस आला आणि मी लावलेलं बकुळीचं रोपटं मातीत छान रूजलं. त्यामुळे माझ्या मनातलाही बकुळ छान फुललाय आणि तनामनाला गंधित करतोय. खऱ्या बकुळफुलाच्या प्रतिक्षेने...
वर्षा थोटे उमरेड, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.