
- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com
उपनिषदांची नावं, वेदशाखा, प्रणेते ऋषी यांची माहिती गेल्या वेळच्या लेखाच्या शेवटी आपण पाहिली. आता या लेखात उपनिषदांचा रचनाकाल आणि स्वरूप यांविषयी थोडक्यात पाहू या.
याज्ञवल्क्य, उद्दालक, आरुणी, कौपितकी, पिप्पलाद, महिदास, ऐतरेय, मैत्री हे उपनिषदांचे प्रमुख प्रणेते ऋषी दिसतात. त्यातही याज्ञवल्क्य हे प्रमुख, श्रेष्ठ म्हणायला हरकत नाही.
उपनिषदांचा रचनाकाल : ही तेरा उपनिषदं इसवीसनपूर्व १२०० ते इसवीसनपूर्व ६०० या काळात लिहिली गेली असली तरी त्यांच्या रचनेचे पाच कालखंड मानले गेले आहेत.
हे कालखंड पुढीलप्रमाणे -
कालखंड - उपनिषदे
प्रथम : बृहदारण्यक, छांदोग्य
द्वितीय : ईश, केन,
तृतीय : ऐतरेय, तैत्तिरीय, कौषीतकी,
चतुर्थ : कठ, मुंडक, श्वेताश्वतर,
पंचम : प्रश्न, मैत्री, मांडुक्य.
भाषा
पूर्वीच्या काळी शिष्यानं गुरूच्या पायाशी बसून ज्ञान मिळवायचं असायचं, त्यामुळे गुरूकुलात गुरुजींनी सांगायचं व शिष्यांनी ऐकायचं ही झाली सामान्य पद्धत...पण उपनिषदांमध्ये जरा निराळी पद्धत वापरली गेली आहे. इथं शिष्यानं प्रश्न विचारायचे व गुरुजींनी उत्तर द्यायचं ही पद्धत उपयोजिलेली आहे. प्रश्नोपनिषदांत तर सहा आचार्य - हो, आचार्य- नुकतीच मुंज झालेले बटू नव्हेत, विद्वान आचार्य - हे आपल्याला न सुटलेले प्रश्न घेऊन उत्तर मिळवण्यासाठी, भगवान पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन नम्रतेनं गेले.
पिप्पलादांनी त्यांना एक वर्ष आपल्या आश्रमात ठेवून घेतलं व मगच त्यांना प्रश्न विचारायची परवानगी दिली व नंतर प्रश्नांची उत्तरं दिली. उत्तर मिळवायचं तर कष्ट उपसण्याची तयारी असायची तेव्हा. इतर काही ठिकाणी मात्र प्रश्न गृहीत धरून उत्तरं दिलेली आहेत.
उपनिषदे म्हणजे गुरू-शिष्यांमधील संवाद होत. प्रवचनामध्ये जसा एकच विषय निरनिराळे दृष्टान्त, उदाहरणं देऊन समजावून दिला जातो, तसं उपनिषदं आपला प्रतिपाद्य विषय नानाविध उदाहरणं देऊन समजावून सांगतात. उत्तर देताना शिष्यांचा अधिकार लक्षात घेतला जातो. एखाद्या सिद्धान्तग्रंथात तो ज्याप्रमाणे वाद-विवादात्मक तत्त्वचर्चेच्या रूपात मांडला जातो तसा तो उपनिषदांमध्ये आढळून येत नाही (अपवाद फक्त बृहदारण्यकोपनिषदाचा). इथं प्रासादिक, छोटी छोटी वाक्यं जास्त.
बऱ्याच वेळा क्रियापदं गाळलेली. भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे तर, बोलीभाषेला जवळची. पूर्वकालीन प्रमाणग्रंथांतील (उदाहरणार्थ : ऋग्वेद) उदाहरणं उपनिषदांत दिली गेली आहेत. नवीन विषय अथवा प्रकरण सुरू झालं आहे हे सांगण्यासाठी शीर्षकं देण्यात आलेली आहेत. भाषा ग्रांथिक स्वरूपाची नव्हे तर बोलीभाषेला जवळची.
ब्रह्मसूत्रे
व्यासकृत ‘ब्रह्मसूत्रे’ ही उपनिषदांतील शब्दांचे अर्थ सुस्पष्ट करण्यासाठी लिहिली गेली आहेत; पण गंमत म्हणजे, ब्रह्मसूत्रांचा अर्थ सांगण्यासाठी पुढं अनेक पंडितानी ग्रंथ लिहिले. उपनिषदांवर अनेक विद्वानांनी भाष्यग्रंथ लिहिले आहेत. अर्थात्, प्रमुख म्हणजे आद्य शंकराचार्य.
वेद
वेदांचं विभाजन पुढीलप्रमाणे करता येईल.
१) संहिता किंवा मंत्र : यात वैदिक देवी-देवतांचे स्तुतिमंत्र आहेत.
२) ब्रह्मन् : यात सारे मंत्र, कर्मकांड आणि यज्ञादींच्या अर्थांच्या व्याख्या आहेत.
३) आरण्यक : यात कर्मकांड, मंत्रांची व्याख्या, यज्ञाच्या रूपककथा अशा तत्त्वज्ञानपर व्याख्या आहेत.
४) उपनिषदं : यांत वेदांचे अंतिम आणि उपसंहारात्मक भाग किंवा वास्तविक तत्त्वज्ञानसार आहे.
उपनिषदं हे हिंदू धर्माचे महत्त्वपूर्ण श्रुती-धर्मग्रंथ आहेत. हे ग्रंथ म्हणजे वैदिक वाङ्मयाचा अविभाज्य भाग होय. यात परमेश्वर, परमात्मा-ब्रह्म आणि आत्मा, त्यांचे स्वभाव आणि या सगळ्याचं तत्त्वज्ञानपर आणि ज्ञानपूर्वक वर्णन केलं गेलं आहे. उपनिषदं हीच भारतीय तत्त्वज्ञानाचा मूल स्रोत आहेत, मग ते वेदान्त असो वा सांख्य किंवा जैन धर्म असो व बौद्ध धर्म.
उपनिषदांनाच वेदान्त (वेदांचा अंतिम भाग) संबोधण्यात आलेलं आहे. उपनिषदं ही भारतीय संस्कृतीचा प्राचीनतम आणि अनुपम ठेवा आहे. उपनिषदं हे वेदांचे केवळ तत्त्वज्ञानपर भाग आहेत; परंतु ते अंतिम भाग असल्यानं वेदांचं सार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. आत्मज्ञान, योग, ध्यान, तत्त्वज्ञान आदी वेदांच्या निहित सिद्धान्तांना तथा त्यांच्यावर केल्या गेलेल्या शास्त्रार्थाच्या संग्रहाला उपनिषद असं म्हणतात.
शास्त्रार्थ म्हणजे खरं स्वरूप समजण्यासाठी अथवा समजावून सांगण्यासाठी केलेले प्रश्न किंवा तर्क. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी उपनिषदं समजून घेणं आवश्यक आहे. उपनिषदांमध्ये विशुद्ध रीतीनं आध्यात्मिक चिंतनाला प्राधान्य दिलं गेलं आहे, सर्व कर्मांचा दृढ अनुराग शिथिल करण्याचं सूचन त्यांमध्ये आहे.
मुख्य उपनिषदं १३ आहेत. ती कोणत्या ना कोणत्या वेदांशी जोडली गेलेली आहेत. उपनिषद = समीप उपवेशन = जवळ बसणं. जवळ कशासाठी बसायचं, कुणाजवळ बसायचं तर ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी शिष्यानं गुरूच्या जवळ बसायचं.
उपनिषद हा शब्द ‘उप’, ‘नि’ उपसर्ग तथा ‘सद्’ या धातूपासून निष्पन्न झाला आहे. ‘सद्’ या धातूचे तीन अर्थ आहेत :
१) ‘विवरण’ म्हणजे नाश होणं.
२) ‘गती’ म्हणजे मिळणं अथवा जाणणं.
आणि
३) ‘अवसादन’ म्हणजे शिथिल होणं.
याचा अर्थ असा आहे की, ज्या विद्येनं परब्रह्म अर्थात् ईश्वरसामीप्य प्राप्त होतं, ईश्वराशी तादात्म्य स्थापित होतं, अशा विद्येला ‘उपनिषद’ असं म्हटल जातं.
(लेखक हे अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.