चित्रपट महोत्सव 'उरकून' घेतला... 

श्रीराम ग. पचिंद्रे 
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आणि नामांकन झालेले चित्रपट, मराठी -हिंदीतील गाजलेले चित्रपट पाहून रसिकांना समाधान वाटलं हे खरं. जुन्या जमान्यातील चित्रपटाच्या श्रेणीत मनोजकुमारचे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचे चाहते आणि जुन्या चित्रपटाच्या प्रेमींना त्यांचा आनंद मिळाला. उणीवा कितीही असूदेत, पण चित्रपट महोत्सवाच्या काळात पणजी शहराला एकप्रकारचं उधाण आलेलं असतं, हे उधाण याही वर्षी गोव्यानं अनुभवलं एवढं मात्र खरं!

गोव्यातील दरवर्षीचा कायमचा प्रवासी झालेला भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा साजरा झाला असं म्हणायला आवडलं असतं; पण त्या ऐवजी संयोजकांनी तो उरकून घेतला असं म्हणायची वेळ आलेली आहे.

गोवा मनोरंजन संस्था ही "इफ्फी'ची आयोजक असते. कोणतीच गोष्ट यंदा नियोजनबद्ध रीतीनं राबवली गेली नाही. या वर्षी प्रतिनिधींच्या प्रवेशाच्या अटी कडक केल्या होत्या. नियम वाढवले होते; जेणेकरून जास्त प्रतिनिधींना यायला मिळू नये, अशीच व्यवस्था केली होती की काय अशी शंका येते. पण नियम कडक केले म्हणून त्यात काही शिस्त होती म्हणावे, तर तसंही नव्हतं. 2014च्या महोत्सवात प्रतिनिधी शुल्क 300 रुपये होते. गेल्या वर्षापासून ते 1000 रुपये केलेले आहे. हे शुल्क तिपटीहून अधिक केल्यामुळं रसिकांच्या उत्साहावर विरजण पडलं. त्यामुळं प्रतिनिधींची संख्या रोडावली. चित्रपट सृष्टीतला एवढा मोठा आणि लोकप्रिय महोत्सव असूनही शुल्क अवास्तव वाढवल्यामुळं आणि नेहमीचा दहा दिवस चालणारा महोत्सव दोन दिवस कमी करून आठ दिवस केल्यानं रसिकांचा उत्साह आधीच काहीसा कमी झाला. अडीच हजाराहून प्रतिनिधी आपलं ओळखपत्र न्यायला शेवटपर्यंत आलेच नाहीत. तेवढे रसिक कमी झाले. 

माध्यमाच्या प्रतिनिधींवर महोत्सवाची भिस्त असते. कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपट महोत्सव भरवला जातो, तो रसिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसिद्धी माध्यमांचं योगदान महत्त्वाचं असतं. असं असूनही माध्यमाच्या अनेक संपादक आणि प्रतिनिधींना महोत्सव सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवशी ओळखपत्रं मिळाली. गोव्याला इफ्फी भरवण्याचा मान कायमस्वरूपी मिळालेला आहे आणि तो आता कुणी हिरावून घेणार नाही अशा समजुतीतून तर हे घडलं असावं का? 

2014 च्या चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारखे दिग्गज कलावंत, चित्रपट सृष्टीचे महानायक असलेले तारे उपस्थित राहिले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भाषणात भारतीय चित्रपटसृष्टीच्या समग्र इतिहासाचा आढावा घेतला होता. पण यंदा निर्माते रमेश सिप्पी आणि गायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम वगळता कोणीही चित्रतारा उद्‌घाटन सोहळ्याकडे फिरकला नाही. अजय देवगण हा फिल्म बझारला उपस्थित राहिला पण सोहळ्याकडे फिरकलाही नाही, कारण रीतसर निमंत्रण देण्यात आले नव्हते. मानधनाची बोलणी फिस्कटली अशीही चर्चा आहे. 

फिल्म अँड टेलिव्हीजन टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तर स्पष्टच सांगितलं, "मी इफ्फीला आलेलो नाही. मला कुणीही निमंत्रण दिलेलं नाही. मी एफटीटीआयच्या शब्दाला मान देऊन आलेलो आहे. माझा इफ्फीशी संबंध नाही.' सोहळ्याला प्रेक्षकांचीही उपस्थिती अल्पच होती. समारोप समारंभालाही प्रेक्षकांच्या 80 टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. याउलट महावीर उद्यान आणि बांदोडकर मार्गालगत आयोजित केलेल्या गाण्याच्या आणि मनोरंजनाच्या इतर विनाशुल्क कार्यक्रमांना, उद्यानातील चित्रप्रदर्शनाला अलोट गर्दी होती. 

दरवर्षी आझाद मैदान, कांपाल मैदान या मोकळ्या मैदानात सर्व प्रेक्षकांसाठी मुक्तपणे विनाशुल्क चित्रपट प्रदर्शित केले जातात. हे लोकप्रिय हिंदी -मराठी- कोकणी चित्रपट असतात. यावर्षी जॉगर्स पार्क अणि आझाद मैदानावर पहिले तीन दिवस एकही चित्रपट दाखवला गेला नाही. खरंतर हे चित्रपट दाखवण्यासाठी टीएलजी या कंपनीला 62 लाखांचे कंत्राट दिलेले होते. ही कंपनी विद्युत जनित्राची आहे, तिला चित्रपट प्रदर्शनाचे तंत्रज्ञानच माहिती नाही. मिरामार येथे काही चित्रपट दाखवले जाणार होते. पण "मिरामारला वाऱ्याचा त्रास होतो" असं मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर म्हणाले. पण, मिरामार हा समुद्र किनारा आहे आणि तिथं वारा असतोच हे आधी माहीत नव्हतं का? असा प्रश्‍न पडतो. खुल्या मैदानावरील चित्रपटांचा बोजवारा उडाल्याने सर्वसामान्य प्रेक्षक नाराज झाले. 

बांदोडकर मार्गाच्या लगत असलेल्या पदपथावर विविध खाद्यपेयांची दुकानं थाटलेली होती. या दुकानदारांनी लावलेल्या दरावर कोणाचेही नियंत्रण नव्हतं. तोंडाला येईल तो भाव सांगून देशी- विदेशी पर्यटकांकडून पैसे वसूल केले जात होते. या महाग पदार्थांबद्दलही लोकांची नाराजी होती. गोव्यात हजारहून अधिक महिला बचतगट काम करतात. या बचतगटांना हे काम दिलं असतं तर रास्त भावात चांगल्या गोमंतकीय पदार्थांचा आस्वाद लोकांना मिळाला असता अशीच भावना व्यक्त होत होती. 
प्रत्यक्ष चित्रपटगृहात दाखवले गेलेले चित्रपट अर्थातच नेहमीप्रमाणे दर्जेदार होते. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आणि नामांकन झालेले चित्रपट, मराठी -हिंदीतील गाजलेले चित्रपट पाहून रसिकांना समाधान वाटलं हे खरं. जुन्या जमान्यातील चित्रपटाच्या श्रेणीत मनोजकुमारचे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचे चाहते आणि जुन्या चित्रपटाच्या प्रेमींना त्यांचा आनंद मिळाला. उणीवा कितीही असूदेत, पण चित्रपट महोत्सवाच्या काळात पणजी शहराला एकप्रकारचं उधाण आलेलं असतं, हे उधाण याही वर्षी गोव्यानं अनुभवलं एवढं मात्र खरं!

Web Title: Shriram Pachindra write about International film festival