दिवस तेव्हाच्या कलकत्त्याचे... (श्रीरंग गोखले)

श्रीरंग गोखले skg2743@gmail.com
रविवार, 22 जानेवारी 2017

‘रवींद्र संगीत’ रोज सकाळी रेडिओवर लागायचं. ते वेगळं असायचं; पण मला मात्र ते एकसुरी व करुण वाटायचं! तिथलं एक वैशिष्ट्य जाणवलं व ते म्हणजे खूपशा बंगाली कुटुंबांमध्ये स्त्रियांनी शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रथा त्या वेळी होती. एखादी तरी स्त्री तंबोरा घेऊन क्‍लासला जाण्यासाठी बस स्टॉपवर दिसायची.

‘रवींद्र संगीत’ रोज सकाळी रेडिओवर लागायचं. ते वेगळं असायचं; पण मला मात्र ते एकसुरी व करुण वाटायचं! तिथलं एक वैशिष्ट्य जाणवलं व ते म्हणजे खूपशा बंगाली कुटुंबांमध्ये स्त्रियांनी शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रथा त्या वेळी होती. एखादी तरी स्त्री तंबोरा घेऊन क्‍लासला जाण्यासाठी बस स्टॉपवर दिसायची.

कॉलेजनंतर मला पहिला जॉब मिळाला तो पुणं सोडून कलकत्त्यात (आताचं नाव ः कोलकता). कलकत्त्याला जाणं ही माझ्यासाठी एक इष्टापत्तीच ठरली. या लेखमालेचा केंद्रबिंदू हा ‘तांत्रिक डिझाइन-निर्मितीमागची सर्जनशीलता’ असाच आहे आणि राहील; पण या सर्जनशीलतेच्या प्रवासाची सुरवात ज्या कलकत्त्यातून झाली, तिथल्या माझ्या वास्तव्याच्या काही आठवणींना उजाळा देणं अनुचित ठरणार नाही. माझ्या पुढच्या वाटचालीची सुंदर पायाभरणी झाली ती कलकत्त्यातच. तोपर्यंत आयुष्य ‘पुणे एके पुणे’ असंच होतं आणि इतर प्रवासही फारसा केलेला नव्हता. त्यामुळं सुरवातीला जावं की नाही, असा प्रश्‍न मनात आला होता. तसा विचार मनात येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्या वेळचं नक्षलवादी चळवळीचं अशांत वातावरण हे होतं.
देशाटन झालं, पंडितमैत्री झाली आणि अगदी सभेत संचार केला नाही तरी, एका व्यवसायाशी निगडित झाल्यानं वेगळाच सभाधीटपणा आला. त्यामुळं चतुराईही आली असावी! आयुष्यात एक दोन वर्षंतरी होस्टेल लाइफ अनुभवायला हवं, असं म्हणतात. कलकत्त्याच्या वास्तव्यात ‘महाराष्ट्रनिवास’मध्ये काढलेलं दीड वर्ष हे त्यासारखंच होतं आणि त्याचा व्यक्तिमत्त्व सुधारायला मोठाच फायदा झाला.

आमचा कारखाना ‘कॉन्व्हेंट रोड, एंटाली’ या भागात म्हणजे अगदी शहर भागात होता. ती तीनमजली जुनी इमारत होती. इंटिरिअर उत्तम असले तरी आजूबाजूची वस्ती व इमारत काही छाप पाडणारी नव्हती. सकाळी ८B ही बस पकडून १५ पैशांचं तिकीट काढून पुढं थोडं चालून कारखान्यात सव्वाआठला पोचावं लागे. येताना मात्र प्रचंड गर्दीमुळं बस मिळणं शक्‍य नसे. मग ट्रामनं यावं लागे. ट्रामपासून राहायचं ठिकाण एक-दीड तास अंतरावर. चालणं अपरिहार्य. सहा महिन्यांनंतर कंपनीतल्या काही लोकांनी मिळून एक भाड्याची बस ठरवली होती. अगदीच कामचलाऊ अशी ती बस होती. मात्र, चालण्याचा त्रास वाचला आणि बसमध्ये जी गप्पांची मैफल रंगे, तिचा आनंद मिळू लागला. पुढं पिंपरीला आल्यावर निळ्या रंगाच्या नव्या १० बसचा ताफा जेव्हा दिमतीला होता, तेव्हा कधीतरी या जुन्या बसचा फोटो बघून गंमत वाटत असे.

त्या वेळच्या कलकत्त्यानं माझ्या मनात कायमचं घर केलं. पुण्यासारखं स्वच्छ नाही किंवा मुंबईसारखं श्रीमंतही नाही; पण कलकत्त्याला स्वतःचं एक वैशिष्ट्य होतं. मेट्रो सिटी असून, वातावरण जास्त नैसर्गिक होतं. हिरवाई होती. संगीत, चित्रकला, नाटकं यांना एक बंगाली बाज होता. भाषा तर अपूर्व शुंदर! मला पहिला दणका भाषेनंच दिला. कारखाना सोडून इतर ठिकाणी बरंच वावरावं लागायचं. त्या वेळी हिंदी-इंग्लिश काही चालत नसे. फॅक्‍टरीतसुद्धा वर्कर लेव्हलशी बोलताना बंगालीच! दोन-तीन आठवड्यांनी ‘मराठी-बंगाली शिक्षक’ हे पुस्तक पुण्याहून मागवून घेतलं. भाषा शिकायची मला आवड आहे. आमच्या वाड्यात शेजारी मद्रासी राहत, त्या अम्मांनी बोली तमीळ शिकवलं होतं. कॉलेजात जर्मन होतंच. हळूहळू एका बंगाली व्यक्तीशी मैत्री करून काही वाक्‍यं शिकून घेतली; पण ‘हाय-हॅलो’च्या पुढं संभाषण जमत नसे. बंगाली भाषेचं मराठीशी वाटतं तेवढं साम्य नाही. त्या भाषेत चाय ‘खावो’ असतं; ‘पीवो’ नाही. एखादी गोष्ट ‘भीषण’ असते म्हणजे ‘सुंदर’ असते! तिकडं ‘चेष्टा’ म्हणजे ‘प्रयत्न’; ‘टिंगल’ नव्हे. अशी अनेक उदाहरणं...दुसरा अडचणीचा भाग म्हणजे लिपी. लिपी क्‍लिष्ट आहे, म्हणजे संधी व जोडाक्षरं विपुल आणि ती लिपीत कोड्यासारखी. नाहीतर वर्तमानपत्रं व दुकानांच्या पाट्या वाचून ही भाषा शिकण्याची एक तऱ्हा त्यामुळं आपोआपच वर्ज्य. शेवटी एका बंगाली बाईंचा बोलीभाषेचा दोन महिने क्‍लास लावला. कारखान्यात तोपर्यंत लोक उत्साहानं शिकवत होतेच. एखादा बिगरबंगाली माणूस आपली भाषा शिकतोय म्हटल्यावर बंगाली माणसांना उत्साह येतो. त्यानंतर मात्र मी बंगालीत बऱ्यापैकी संवाद साधू शकलो. भाषेच्या सरावासाठी वृत्तपत्रं वाचणं हळूहळू जमू लागलं. पाट्या वाचायला मजा यायची. चरणश्री हे चपलांचं दुकान! दोन-चार बंगाली सिनेमेही पाहिले. ‘भुवनशोम’ आणि ‘प्रतिद्वंद्वी’ हे आठवतात. पुस्तक प्रदर्शनंही पाहिली. बंगाली माणसाचं वाचनवेड काही औरच...या विस्तीर्ण मैदानावर भरणाऱ्या या प्रदर्शनांना नुसती ओसंडून गर्दी! तेव्हाच्या कलकत्त्याचं आणखी वैशिष्ट्यं म्हणजे स्वस्त मिळणारं डाब (शहाळं). २५ पैशाला एक! मिठाई तर इतकी खाल्ली की सांगता सोय नाही. रसगुल्ला, संदेशचे प्रकार, मिष्टी दोही इत्यादी. हे मिष्टी दोही म्हणजे श्रीखंडापेक्षाही वेगळ्याच चवीचं. खमंग अन्‌ गोड (झोप आणणारा) असा हा पदार्थ कारखान्यातही मिळत असे. नाक्‍यानाक्‍यावर या खाद्यपदार्थांची दुकानं असत. ‘के. सी. दास’ आणि ‘गंगूराम’ ही दुकानं प्रसिद्ध. कलकत्त्याचं ट्राम हे आणखी एक वैशिष्ट्य. १३ पैशांच्या तिकिटात कुठून कुठं जाता येत असे. ताडाचा गूळ- याला खजूरेर गुड म्हणतात - फक्त इथं मिळे. बंगाली माणसांना पटोल म्हणजे पडवळ/परवर फार प्रिय. जेवणात मासे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच! माछ खाबो! सुरवातीला मी कारखान्यात शाकाहारच घ्यायचो. त्यांना पर्याय म्हणून दही-साखर मिळायची. दोन-तीन महिन्यांनंतर मासे खाण्याचं धाडस केलं आणि ती आवड नंतर कायम राहिली. शेवटी पिंपरीला परतताना काही मित्रांनी मुद्दाम घरी बोलावून दिलेली मत्स्याहाराची मेजवानी व ‘माथाएर करी’ अजून आठवते. बंगालीत रांगोळीला ‘अल्पना’ असं छान नाव आहे. ‘मुक्तहस्त’ प्रकारातली ही रांगोळी खूप छान दिसते. बंगाली संगीतही वेगळंच आहे. ‘रवींद्र संगीत’ रोज सकाळी रेडिओवर लागायचे. ते वेगळं असायचं; पण मला मात्र ते एकसुरी व करुण वाटायचं! तिथलं एक वैशिष्ट्य जाणवलं व ते म्हणजे खूपशा बंगाली कुटुंबांमध्ये त्या वेळी स्त्रियांनी शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रथा होती. एखादी तरी स्त्री तंबोरा घेऊन क्‍लासला जाण्यासाठी बसस्टॉपवर दिसायची. एक गोष्ट फार खटकायची व ती म्हणजे चौरंगी वगैरे भाग सोडला, तर बाकी ठिकाणी सायंकाळी, रात्री अतिशय कमी प्रकाश असलेले बल्ब असत. सायंकाळी उजेडाच्या अशा छटा खूप गूढ भासायच्या. ट्यूबलाइटचा वापर कमीच असे. तिकडचे बहुतेक दवाखाने होमिओपॅथचे. ॲलोपथी वगैरे कमीच. कलात्मक वस्तू ही कलकत्त्याची खासियत. ज्यूट व बांबूच्या अनेक सुंदर वस्तू मिळायच्या. त्या काळी शबनम बॅगची फॅशन होती. मी कित्येक डझन शबनम बॅगा तिकडून इकडं पाठवल्या होत्या. तीच गोष्ट साड्यांची. ताणून केलेल्या धाग्याची टेंगाईल कॉटन कलकत्ता साड्या फार सुंदर सुंदर ‘कॉम्बिनेशन’मध्ये मिळायच्या. तिथला ‘हावडा ब्रिज’ हे एक आश्‍चर्य आहे, हे सांगायला नकोच. हावडा स्टेशन प्रचंड अशा हुगळी नदीपलीकडं होतं आणि ती ओलांडण्यासाठीचा हा पूलही तेवढाच प्रचंड की पाहणाऱ्यानं थक्क होऊन जावं. ऐन दुर्गापूजेच्या दिवसांत मी कलकत्त्यात नव्हतो. पहिले १० दिवस भलत्याच धामधुमीत पूजा होत असते. मूर्ती अतिदेखण्या असतात. मी आठवण म्हणून देवीचा एक मुखवटा आणला होता. त्या मुखवट्याचे भाव इतके प्रसन्न होते, की अजूनही तो मुखवटा माझ्या आठवणीत जसाच्या तसा आहे.

वैयक्तिक दृष्टीनं ‘महाराष्ट्र निवास’मधलं वास्तव्य मला फार फायद्याचं ठरलं. त्यामुळं मला समाजात चांगल्यापैकी मिसळता आलं. तिथला निवास म्हणजे केवळ लॉजिंग-बोर्डिंगच नव्हतं, तर एक क्‍लब होता. सायंकाळी व सुटीच्या दिवशी जवळपासचे अनेक मराठी लोक एकत्र येत. सांस्कृतिक कार्यक्रम व सण साजरे होत. ग्रंथालय होतं. सुधीर धुरंधर, धनंजय देव, परशुराम डेअरीचे जोशी, बांबर्डेकर, गोडबोले अशा अनेकांच्या ओळखी झाल्या. या ग्रुपनं गणेशोत्सवात बसवलेल्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकात मी एक छोटीशी भूमिकाही केली होती. नाटक बसतं कसं, याचा एक वस्तुपाठच या निमित्तानं मिळाला. तिथलं होस्टेल लाइफ अप्रतिमच होतं.

प्रकाश करंदीकर, विजय करंबेळकर, कुलकर्णी, काबाडी, मोहिले, पटवर्धन असे कितीतरी छान मित्र मिळाले. एकदा एका रस्त्यातल्या जादूगाराला रुममध्ये बोलावून आम्ही सगळ्या क्‍लृप्त्या शिकून घेतल्या होत्या! त्या काळी स्वस्ताई एवढी होती, की ७०० रुपये पगारही खूप वाटायचा! दोन्ही वेळचं जेवण, राहणं, गरम पाणी, न्याहारी-चहा यांचं महिन्याचं बिल २०० रुपये व्हायचं. ‘पहिल्या पगारात सोनं घ्यायचं’ असं वडिलांनी सांगितलं होतं. त्यानुसार उरलेल्या पैशातून २० ग्रॅम सोनं तेव्हा खरेदी केल्याचं आठवतं.

आमच्या तुकडीत कारखान्यात एकूण दहा पदवीधर प्रशिक्षणासाठी भरती झाले होते. सर्व जण अस्खलित इंग्लिश बोलणारे. रोज टाय वापरणारे. फॅक्‍टरीत कारखान्यात टाय हा ड्रेस-कोड होता; पण मी नेहमी वापरत नसे. त्या लोकांमध्ये वावरताना थोडा न्यूनगंड यायचा; पण त्यातला सुब्रतो सेनगुप्ता हा माझा सगळ्यात जवळचा मित्र झाला. तो मला बंगाली शिकवत असे. तो ‘प्रॉडक्‍शन’ला असल्यानं तिथल्या ओळखी करून देई. ‘फॅक्‍टरी आर्गनायझेशन’ सुरवातीला नीट कळत नसतं. पहिली ओळख झाल्यानं कारखान्याचा पर्सोनल मॅनेजर हाच मुख्य वाटत असतो. आमचे व्यवस्थापक एस. वेंकटारामन होते. एकदम राजा माणूस! दोन महिन्यांनी मला त्यांनी केबिनमध्ये बोलावलं. माझे वडील पत्रकार असल्याचं त्यांना कौतुक होतं. त्यांनी विचारलं ः ‘‘घरच्यांना पत्रं पाठवतोस की नाही?’’

‘‘पाठवतो; पण नियमितपणे नाही,’’ असं उत्तर दिल्यावर ते माझ्यावर रागावले.
म्हणाले, ‘‘सध्याची कलकत्त्याची स्थिती अशी आहे की, आई-वडिलांना काळजी वाटेल. तेव्हा त्यांना ख्यालीखुशालीचं पत्र नियमितपणे पाठवत जा.’ डी. एल. जैन हे कारखान्यात ‘ऑपरेशन्स चीफ’ होते. बाकी पटनाइक, वेंकटरत्नम इत्यादी व्यवस्थापक आठवतात.
असा आठवणीतला कलकत्ता परत जगावासा वाटतो!

Web Title: shrirang gokhale's article in saptarang