अनोखं ‘ट्यूनिंग’ रेडिओशी! (श्रीरंग गोखले)

श्रीरंग गोखले skg2743@gmail.com
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

एका डच डिझायनरनं मला कानमंत्र दिला होता व तो मी सदैव लक्षात ठेवला. त्यानं सांगितलं होतं ः  ‘कुठल्याही डिझायनरच्या लेखी कुठलंही उत्पादन क्षुल्लक नसतं. तसं ते असता कामा नये. कारण क्रिएटिव्हिटी किंवा कल्पकता/सर्जनशीलता ही काही उत्पादनावर अवलंबून नसते. नावीन्य शोधण्यात डिझायनरचा कस लागायला हवा. तिथं त्याची क्षमता दिसायला हवी.’

एका डच डिझायनरनं मला कानमंत्र दिला होता व तो मी सदैव लक्षात ठेवला. त्यानं सांगितलं होतं ः  ‘कुठल्याही डिझायनरच्या लेखी कुठलंही उत्पादन क्षुल्लक नसतं. तसं ते असता कामा नये. कारण क्रिएटिव्हिटी किंवा कल्पकता/सर्जनशीलता ही काही उत्पादनावर अवलंबून नसते. नावीन्य शोधण्यात डिझायनरचा कस लागायला हवा. तिथं त्याची क्षमता दिसायला हवी.’

रेडिओच्या कारखान्यात मी कामाला लागलो तरी सुरवातीला माझं मन तिथं रमेना. मी शिकलेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं विश्‍व आणि हे विश्‍व यांचा मेळ बसेना. हे काम खूप क्षुल्लक वाटायचं. कदाचित त्या वेळी डिझायनरनं घ्यायचं स्वातंत्र्य माझ्या लक्षात आलं नसेल किंवा ग्राहकोपयोगी उत्पादनात किमतीचं आव्हान हे डिझाइनमध्येच शक्‍य आहे, याची जाणीव झाली नसेल. हळूहळू क्रॅंकशाफ्ट, गिअर, बीम, टर्बाइन ही शिकलेली परिभाषा विसरून मी प्लॅस्टिक, मेकॅनिझम, स्विचेस, मोल्ड या परिभाषेत आणि विश्‍वात रमू लागलो. याचा पाया अर्थात माझ्या सुरवातीच्या दिवसांत आहे. बुश नावाचा एक डच डिझायनर आमच्याकडं पॅकेजिंगचं प्रशिक्षण द्यायला आला होता. त्या वेळी त्याच्याशी बोलताना मला न आवडलेल्या फुटकळ उत्पादनाबद्दल मी जरा तुच्छतेनं बोलायचो. त्या वेळी त्यानं मला एक मंत्र दिला होता ः ‘कुठल्याही डिझायनरच्या लेखी कुठलंही उत्पादन क्षुल्लक नसतं. तसं ते असता कामा नये. कारण क्रिएटिव्हिटी किंवा कल्पकता/सर्जनशीलता ही काही उत्पादनावर अवलंबून नसते. नावीन्य शोधण्यात डिझायनरचा कस लागायला हवा. तिथं त्याची क्षमता दिसायला हवी.’ त्या वेळी त्यानं त्याच्या डिझायनर-मित्राचं उदाहरण दिलं होतं. काडीपेटीत सुधारणा करून देण्याचं काम त्या मित्राकडं आलं होतं. ते आव्हानात्मक होतं. त्यानं त्याही वस्तूत उत्तम सुधारणा तर सुचवल्याच; पण काडीपेटीची किंमत कमी कशी करता येऊ शकेल, याविषयीची युक्तीही सांगितली.
या उदाहरणाचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला व तो कायम टिकला.
***

सन १९७० मध्ये मी फिलिप्समध्ये रुजू झालो तेव्हा मला प्रश्‍न पडायचा ः ‘एवढे रेडिओ कोण विकत घेत असतील?’ पण रेडिओ खपायचे हे तर दिसत होतं. सन २००५ मध्ये कंपनीतून निवृत्त होतानाही हाच विचार माझ्या मनात होता ः ‘कुठं आता हे रेडिओ खपणार?’’ पण अजूनही - सन २०१७ मध्येसुद्धा - रेडिओला मागणी आहे. आमच्या बहारीच्या काळात आम्ही वर्षाकाठी सहा-सात लाख रेडिओ-संच (सेट) तयार करायचो. आजही नाही म्हटलं तरी साडेतीन-चार लाख रेडिओ तयार केले जातातच! २५ वर्षांपूर्वी मी डिझाईन केलेल्या RL २२५ नावाच्या मॉडेलला आजही मागणी आहे. अगदी कमीत कमी फीचर्स; पण उपयुक्ततेत अग्रगण्य असलेला AL १६५ हा संचही असाच! या संचाचे मोल्ड पाच वेळा तरी पुनरावृत्त केले गेले असावेत. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत ऑडिओ डिव्हिजननं कंपनीला सर्वाधिक फायदा करून दिला होता, त्यातही जास्तीत जास्त योगदान होतं ते रेडिओचंच!

सन १९७० हे ‘व्हॉल्व्ह रेडिओ’चं शेवटचं वर्ष. त्यानंतर आले ते ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर वापरून टेबल-सेट बनवले गेले. आमचं लाकडी कॅबिनेट असलेलं ‘व्हाल्व्ह मॉडेल मेस्ट्रो’ हे खूप लोकप्रिय होते. त्या तुलनेत ट्रान्झिस्टर टेबल मॉडेल लोकांच्या पचनी पडायला वेळ लागला. १९७० पासून पुढं १०-१२ वर्षं ‘रेडिओ’त आमचीच मक्तेदारी होती. आम्ही जे काही करू, ते विकलं जायचं. त्यानंतरची पुढची १०-१२ वर्षं म्हणजे टेपरेकॉर्डर व रेडिओ-रेकॉर्डरचा काळ. त्यामुळं रेडिओ दुय्यम स्थानावर गेला. पुढं पॉवर हाउस व मिनीमुळं आवाजाला महत्त्व आलं. १९९६-९७ नंतर एफएम स्टेशनमुळं रेडिओला पुन्हा संजीवनी मिळाली.

रेडिओ सर्किट तेच असलं तरी त्यात वैविध्य आणण्यात आमची कल्पकता पणाला लागायची. पॉकेटसेट, छोटा पोर्टेबल सेट, मोठा पोर्टेबल संच, टेबल रेडिओ, कार रेडिओ, क्‍लॉक रेडिओ, फ्री पॉवर रेडिओ, वर्ल्ड रिसिव्हर अशी खूप वैविध्यपूर्ण मॉडेल आम्ही तयार केली.
***

कॅबिनेट डिझाईन हा रेडिओचा मुख्य भाग होता. मी प्रॉडक्‍ट डिझायनर म्हणजे आतली तांत्रिक जुळणी करणारा होतो, तर आमच्या टीममध्ये माझा सहकारी हा इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिझायनर म्हणजे मुख्यतः प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाइन करायचा. प्रकल्पाची सुरवात ही इंडस्ट्रिअल डिझायनरकडून व्हायची. आम्ही दिलेल्या ‘मसाल्या’वरून तो उत्पादनाचं बाह्य रूप तयार करायचा. तो खरंतर कलाकारच असायचा, त्याचं डिझाइन म्हणजे एक चित्रच असे. फॅशन किंवा लोकांचा सद्यःस्थितीतला कल जाणून हे इंडस्ट्रिअल डिझायनर देखणं बाह्य रूप करून द्यायचे. घराचं बाह्यरूप बनवणाऱ्या वास्तुविशारदासारखे. बॅटरी कम्पार्टमेंट, स्पीकर, प्रिंट सर्किट बोर्ड, असेम्ब्ली, ड्राइव्ह सिस्टिम असे रेडिओचे ठळक भाग असायचे. रेडिओचा व्यवसाय फायदेशीर होत गेला, यामागची कारणं म्हणजे लोकांची आवड, आकाशवाणीचा उत्साह ही तर होतीच; परंतु नावीन्य आणण्याचे आमचे प्रयत्न हेही एक कारण होतं. सतत नवीन सुधारणा करत राहणं, बॅटरी कमीत कमी खर्च होणं, कमी सेल लागणं, मोठा व सुस्पष्ट आणि लांबवरचा आवाज, संचाचं देखणेपण, बॅटरीबरोबर आत मेन्सवर चालेल अशी सोय, किंमत कमी करणं अशा अनेक सुधारणा आम्ही करत राहिलो. रेडिओच्या बाबतीत लोकांची मानसिकता जपत राहणं हे काही वेळा मुश्‍किल ठरे. सुरवातीला सिलोन, बीबीसी, लांबची स्टेशन शॉर्टवेव्हवर ऐकणं लोकांना आवडे. मुंबईत बसून मध्यम ध्वनिलहरींवर (मीडियम वेव्ह) ‘कलकत्ता’ लागायला हवं असायचं. यात पंचाईत अशी होती की आम्ही संच जितका सेन्सिटिव्ह बनवू तितकी त्यात खरखर यायची. मायक्रोफोनी ही आमच्या रेडिओची अशी समस्या होती. स्थिर पितळी पट्ट्यात फिरणाऱ्या पट्ट्या आत-बाहेर फिरवून गॅंग कंडेन्सरचा कपॅसिटन्स बदलावा लागे. संचाचा आवाज वाढवल्यावर स्पीकरची कंपनं प्लॅस्टिक-कॅबिनेटमधून या गॅंग कंडेन्सरला पोचत व ‘गुंईं’ असा त्रासदायक आवाज येई, एखाद्या व्याख्यानात भाषण ऐकताना प्रमाणाबाहेर आवाज वाढवला की माईकमधून जसा ‘गुंईं’ आवाज येतो तसा. खरं म्हणजे, या गॅंगची रचना सदोष होती; पण आयात करणं शक्‍य नसल्यानं या ना त्या रचना करून आम्ही तोच गॅंग वापरायचो. हा गॅंग लोणी इथल्या आमच्याच कारखान्यात तयार होत असे. मायक्रोफोनी घालवायला आम्ही काय काय केलं नाही! कधी गॅंगखाली रबर घाला, स्पीकर रबरी रिंगवर बसवा वगैरे. गॅंगला जोडलेला ड्रम फिरवून स्टेशन ट्यूनिंग व्हायचं. हा ड्रम फ्रंट पॅनेलवर फिरे; पण या ड्रममुळं कंपनं गॅंगवर जाऊ नयेत म्हणून प्रिंट बोर्ड बसवताना हा ड्रम अलगद उचलणारी अनोखी फोर्क सिस्टिम मी डिझाईन केली होती. एकदा ‘गोल फिरणारा ड्रम हेच मोठं ट्यूनिंग नॉब’ असं डिझाईन होतं. त्यात काही केल्या मायक्रोफोनी जाईना. हात लावला की कंपनं थांबत. बटणाला (नॉब) स्पर्श करणारी अशी एक फिरणारी रिंग डिझाईन करावी लागली! यात भरीत भर म्हणून ट्रान्समेन्स संच आले, म्हणजे मेन्सवर चालणारे. यात आत ट्रान्सफॉर्मर बसवलेला असे. त्याचा ‘हम’ रेडिओ पकडे, त्याची नीट व्यवस्था करावी लागायची. लांबची स्टेशनं पकडायला फेराईट रॉड व टेलिस्कोपिक एरियल असे. माझे ज्येष्ठ सहकारी के. टी. प्रतिनिधी यांनी आत एक तांब्याची तार एरियल म्हणून वापरायची अफलातून कल्पना शोधली. रेडिओ आणि के. टी. प्रतिनिधी यांचं अतूट नातं मी विसरूच शकणार नाही, इतके कष्ट त्यांनी रेडिओ डिझाईनसाठी घेतले आहेत. त्यांनी कितीतरी शोध लावले, कितीतरी लोकांना शिकवलं. अर्थात सुभाष सराफ, दीपक पाटील, सुहास देशपांडे, विश्‍वास दाते, राणा भट्टाचार्य, मिलिंद नेने यांचंही योगदान होतंच.

उत्पादन कुठलंही असो, त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते आणि बाजारात त्याचा होणारा खप लगेच कळतो, याचं आम्हाला खूप अप्रूप असे. माझा लो-टेकबाबतचा न्यूनगंडही हे काम करताना दूर झाला. वर फोर्कचं उदाहरण दिलं आहेच. असाच आणखी एक शोध माझ्याकडून लागला. रेडिओ तसा लो-टेक होताच; पण त्याची ट्यूनिंग सिस्टिम फारच जुनी-पुराणी होती. ती मला नेहमी खटकत असे. ड्रमवर एक धागा गुंडाळून तो ट्यूनिंग-नॉबभोवती फिरवून धाग्यावर पॉईंटर लावला जात असे व तो डायलेस्केलच्या मागं फिरे. बटण गोल फिरे व बाईंटर लिनिअर एका ओळीत. शेवटी काय, गोल फिरणाऱ्या बटणापासून एका सरळ ओळीत फिरणाऱ्या हालचालीची गरज होती. हे दुसऱ्या तत्त्वानं करता येईल का, याचा विचार मी करू लागलो. रॅक आणि पिनियन, क्रॅंकशाफ्ट आणि पिस्टन अशा ठिकाणी अशी रचना केलेली असते. अनेक पुस्तकं मी वाचली. प्रोटोटाइप, मॉडेल बनवली. काही मेकॅनिझमची रशियन पुस्तकं फार उपयोगी पडली. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मला या क्‍लिष्ट व जुनाट प्रणालीऐवजी एक छोटं प्लॅस्टिकचं लीव्हर असलेलं बार मेकॅनिझम करण्यात यश आलं. प्लॅस्टिकचा फायदा असा की, यात क्‍लिक जॉइंट घेता येतो. पातळ मटेरिअल ठेवून बिजागरीसारखी रचना करता येते. या ‘कॉर्डलेस’ रचनेचं पेटंट घेतलं गेलं. सुटे भाग कमी झाले, परिश्रम कमी झाले, मायक्रोफोनची कटकट मिटली. तंत्रज्ञान व कल्पकतेचा वापर केला, की कुठल्याही प्रॉडक्‍टमध्ये सुधारणा करता येतात, हे सिद्ध झालं.

माझं शेवटचं कामही असंच अभिमानास्पद ठरलं. बॅटरी अजिबात न लागणारा व हातानं चार्ज करता येणारा फ्री पॉवर रेडिओ आम्ही तयार केला. टेपरेकॉर्डरची मोटर हॅंडलनं फिरवून तीच जनरेटर म्हणून काम करते. त्यावर रिचार्जेबल सेल होतात. आमचंच लोकप्रिय मॉडेल AL १६८ याची बॅक कॅबिनेट फक्त बदलून आम्ही हे नवं मॉडेल तयार केलं. बॅटरीचा पर्यावरणीय दुष्परिणाम थांबवणारं हे संशोधन असून, ते उत्पादन शुल्कातून वगळावं, अशी आमची सूचना सरकारकडून मान्य झाली नाही. त्यामुळं या सेटची किंमत ग्राहकाच्या आवाक्‍याबाहेर गेली व तो जास्त चालू शकला नाही. रेडिओ पुढं गृहीत धरला गेला, तरी त्याच्यात काम करणं मनोरंजक होतं. १९९५ नंतर FM चे दिवस आले. खरंतर आश्‍चर्य वाटेल; पण १९७३-७४ मध्येच के. टी. प्रतिनिधी यांनी AM-FM रेडिओ डिझाईन केला होता; पण प्रसारण मात्र सुरू झालं ते २० वर्षांनंतर. नंतर चिनी डिझाईनचे छोटे छोटे सेट- अगदी रेल्वेत, एशियाडमध्ये मिळायला लागले. आम्हीही FM  - मॉडेल काढली; पण त्या स्वस्त सेग्मेंटला आम्ही हात लावू शकलो नाही! FM चा आवाज इतका सुस्पष्ट असे, की शॉर्टवेव्ह मागंच पडलं ! टीव्हीचा ऑडिओ FM वर येईल, असं आम्ही शोधलं होतं. पुणे FM स्टेशन इतकं पॉवरफुल नव्हतं, त्यामुळं आजूबाजूच्या शहरांतून ‘Not receiving FM’ अशा तक्रारी यायला लागल्या. शेवटी आम्ही एक पद्धत विकसित केली. आमचे सेट आम्ही बारामतीला नेऊन तपासायचो. तिथं पुणं नीट आलं, की इतर ठिकाणाहून तक्रारी येत नसत. एकदा तर एक अफलातून बातमी वृत्तपत्रात आली होती. पुण्याला एक गृहस्थ दंतवैद्याकडून दातात चांदी भरून आले होते. त्यांना दुसऱ्या दिवसापासून पुणे FM चे कार्यक्रम ऐकू यायला लागले होते. अर्थात याविषयीच्या सत्यासत्यतेची शहानिशा आम्ही केली नाही.

असे रेडिओचे सोनेरी दिवस मला जगता आले. फिलिप्स आणि रेडिओ यांचं नातं इतकं अतूट आहे, की गावाकडं लग्नात ‘फिलिप्स’चीच भेट लोक मागायचे. मागणाऱ्याला रेडिओ असं म्हणायचं असावं, असं दुकानदारही समजून घ्यायचा!

Web Title: shrirang gokhale's article in saptarang