कल्पकता...वाढता वाढता वाढे ! (श्रीरंग गोखले)

कल्पकता...वाढता वाढता वाढे ! (श्रीरंग गोखले)

जसं नुसतं ज्ञान म्हणजे प्रतिभा नव्हे, तसं कल्पनांच्या नुसत्याच भराऱ्या म्हणजेही प्रतिभा नव्हे. प्रतिभा म्हणजे ज्ञान, कल्पनाशक्ती आणि चिकित्सक वृत्ती यांचा सुमेळ होय. प्रतिभा ही विशुद्ध आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारची असू शकते. विशुद्ध प्रतिभेत जाणीवपूर्वक प्रयत्न नसतात, तर उपयोजित प्रतिभेत उद्दिष्ट ठरवून त्यानुसार केलेले प्रयत्न असतात.

या लेखमालेचं मुख्य सूत्र कल्पकता व सर्जनशीलता आहे आणि त्यामागची प्रेरणा मला डिझाइन करायला मिळालेल्या वस्तूंची आहे.
या लेखात मी कल्पकतेविषयी काही विचार मांडणार आहे. नवनवीन वस्तू निर्माण करताना तर कल्पकता लागतेच; पण पुढंही गुणवत्ता टिकवताना, समस्या सोडवताना, ग्राहकाभिमुखता जपताना किंवा किमतीबाबतचं धोरण आखतानाही ती लागते.

सर्जनशील निर्मितिक्षमता सर्वच मनुष्यप्राण्यांमध्ये असते. कल्पक बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कल्पकशक्तीचा वापर करण्याची इच्छा, वेगळा विचार करण्याची आवड! आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी बालवयातली अशी सर्जनशील निर्मितिक्षमता ही कमी होत जाते. कारण, वेगवेगळे नियम, परंपरा, अपेक्षा, वागणुकीचे संकेत यांमधून समाजमान्य वर्तनाचाच स्वीकार माणसाला करावा लागत असतो, म्हणून बहुतेक जण अशी निर्मितिक्षमता बाजूला ठेवून सर्वमान्य वर्तनाचाच अवलंब करतात. नवनिर्मितीची देणगी दैवीच असते असं नाही, तर जाणिवेतलं वास्तव आणि जाणिवेत नसणाऱ्या सुप्त मनातल्या इच्छा यांच्या सुमेळातून ती निर्माण होते. कल्पनाशक्ती, कल्पकता ही मेंदूच्या उजव्या भागामुळं विकसित होते. हा भाग आपल्याला प्रयत्नानं सजग ठेवावा लागतो. मेंदूचा इतर काही भाग हा स्मरण, सवयी, निरीक्षण यांच्याशी निगडित असतो. अर्थात यावर नवनवं संशोधन सतत होत असतं आणि नवी माहिती मिळत असते. जिज्ञासा, प्रोत्साहन आणि काही तंत्रं शिकून कल्पनाशक्ती खचितच वाढवता येते.
प्रतिभा ही आणखी एक कल्पना आहे.

प्रतिभा = ज्ञान, कल्पनाशक्ती आणि चिकित्सक वृत्ती यांचा सुमेळ होय. जसं नुसतं ज्ञान म्हणजे प्रतिभा नव्हे, तसं नुसत्याच कल्पनांच्या भराऱ्या म्हणजेही प्रतिभा नव्हे. प्रतिभा ही विशुद्ध आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारची असू शकते. विशुद्ध प्रतिभेत जाणीवपूर्वक प्रयत्न नसतात, तर उपयोजित प्रतिभेत उद्दिष्ट ठरवून त्यानुसार केलेले प्रयत्न असतात.

न्यूटनला निसर्गनिरीक्षण करताना प्राप्त झालेलं फलित आणि एडिसननं जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न ही अनुक्रमे शुद्ध आणि उपयोजित प्रतिभेची उदाहरणं म्हणावी लागतील. माझ्या लेखनात चर्चा असेल ती बव्हंशी उपयोजित प्रतिभेची. यात प्रक्रिया आणि फलित दोहोंचा समावेश आहे. त्यात विचार करणं, समस्या सोडवणं, माहिती गोळा करणं, समस्येकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं, नवे आणि पर्यायी विचार मांडणं व त्यांचं विश्‍लेषण करण्याची शक्ती हे सगळं आलं.
‘कल्पनाशक्ती ही दैवी देणगी असते,’ या गैरसमजाबरोबरच यासंदर्भात इतरही काही गैरसमज आहेत.

१) चित्रकार, शिल्पकार, गायक, कवी हेच फक्त कल्पक असतात, असा एक गैरसमज असतो. मात्र, हे अजिबातच पूर्ण सत्य नाही.या मंडळींची कल्पनाशक्ती वेगळ्या पातळीवरची असते हे खरं; पण एखादा सामान्य नोकरदार किंवा शेतकरी हाही त्याच्या क्षेत्रात तितकाच कल्पक असू शकतो.

२) ‘कल्पनाशक्ती ही व्यवस्थापनाचीच मक्तेदारी असते,’ हाही एक मोठाच गैरसमज होय. कामगारांकडंही तितकीच कल्पनाशक्ती असते. डिझायनर म्हणून मी सुरवातीला हस्तिदंती मनोऱ्यात वावरत असे; पण नंतर जुळणीकामगारांकडून काही वेळा इतक्‍या सुंदर कल्पना येत, की त्यांच्या ठाई असलेल्या कल्पनाशक्तीची खात्रीच पटे. एक उदाहरण देतो. रेडिओचे संच जिथं तपासले जात, त्या ठिकाणी हेडफोन सॉकेटचं कार्य तपासलं जात नसावं अशी शंका एकदा आम्हाला आली. कारण, त्या टेबलावर तपासणीसाठी आवश्‍यक असलेले हेडफोनच नव्हते. कामगार तर ‘व्यवस्थित तपासतो’ असं म्हणत होता. हेडफोनची सतत काढ-घाल नको म्हणून हेडफोन प्लगची वायर एका उताण्या स्पीकरला त्यानं जोडून ठेवली होती. त्यावर बडीशेपेचे दोन-चार दाणे टाकलेले असत. तपासणीच्या वेळी आवाज वाढवला, की हे दाणे थरथरत व तपासणी पूर्ण होई! आता या कल्पकतेवर काय बोलणार! भन्नाटच होती ती कल्पकता...संचाचं डिझाइन करताना त्याची जुळणी कशी होईल, याची आम्ही कल्पना केलेली असे; पण कामगारांकडून काही वेळा आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळायची.

३) खूप माहिती असणाऱ्या माणसाबद्दलही असाच एक (गैर)समज असतो. खूप माहिती असली तरी त्याची कल्पनाशक्ती तोकडी असू शकते. माहितीचं ज्ञानात रूपांतर हे साधना, आकलनशक्ती व विश्‍लेषणक्षमता यातून होतं. हे व्यक्तिसापेक्ष असतं.
४) चुका करणं याबद्दलही असेच प्रवाद आहेत. खरंतर माणूस शिकत असतो ते चुकतमाकतच. चुका करणाऱ्याला तुम्ही सतत टोकत राहिलात, तर नवीन काही करण्याची उमेद तो घालवून बसेल. तीच चूक परत परत न करणं एवढं आपण बजावू शकतो; पण ‘चूक चालणारच नाही,’ या धमकीनं कल्पकता मारली जाते.
५) कल्पकतेची तंत्रं वापरून किंवा शिकून कल्पकता वाढवता येते काय, या प्रश्‍नाचं उत्तर खचितच होय असं आहे; पण ज्ञानाची आस आणि जिज्ञासू मन हवंच. एक लक्षात ठेवायला हवं ः  A fool with a tool is still a fool.

कल्पनाशक्तीला सजग ठेवणारी काही तंत्रं असतात. त्यांच्या वापरानं व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. त्यातल्या ब्रेनस्टॉर्मिंग किंवा विचारमंथन या तंत्राला अग्रक्रम द्यावा लागेल. हे तंत्र आम्ही कंपनीत खूप वापरलं. माणसाकडं मेंदू असतो...आणि कल्पना करा, की माणसानं समूहानं मिळून एखाद्या समस्येवर चर्चा केली, तर  सगळ्यांचा मिळून केवढा मोठा मेंदू यावर काम करत असेल! ‘इस्त्रो’सारख्या संस्थेची ‘एकत्रित प्रतिभा’ केवढी मोठी असेल!

‘विचारमंथन’ म्हणजे एखादी समस्या किंवा कल्पना घेऊन एखादा समूह त्यावर खुलेपणानं चर्चा करतो व येणाऱ्या सगळ्या कल्पना नोंदवून त्यावर अभ्यास करतो. या तंत्राची काही मार्गदर्शक तत्त्वं आहेत. पाच ते २० लोकांचा एक गट घ्यावा लागतो व एक नेता किंवा गटप्रमुख असतो. हा नेता अनुभवी व प्रशिक्षित असावा लागतो. मुख्य म्हणजे वातावरण अगदी खुलं व खेळीमेळीचं पाहिजे. कुणाचाही दबाव नसावा व पूर्वग्रह नसावेत. नेता ही समस्या शब्दांच्या माध्यमातून मांडतो. चर्चा करून समस्येची नीट मांडणी केली जाते. समस्येचं सगळ्यांना आकलन झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक जण ठराविक क्रमानं किंवा उत्स्फूर्तपणे त्यावर त्याला सुचणारे उपाय सांगतो. हे उपाय फळ्यावर किंवा मोठ्या कागदावर सगळ्यांना दिसतील असे लिहिले जातात. यावेळी या उपायांवर कुणीही प्रतिक्रिया किंवा अभिप्राय द्यायचे नसतात. नेता स्वतःही त्यात आपल्या कल्पनांची भर घालतो. गट काही वेळा सैलावतो, संथ होतो तेव्हा हा नेता हजरजबाबीपणे, खेळीमेळीनं बोलून सगळ्यांना पुन्हा बोलायला उद्युक्त करतो. यात मजा अशी की दुसऱ्याच्या कल्पना ऐकून इतरांनाही नवीन कल्पना सुचतात. म्हणता म्हणता मोठ्या संख्येनं कल्पना ‘जमा’ होतात. वेळेचा तसा नियम नसतो; पण कल्पना सुचण्याचं प्रमाम कमी कमी होत गेलं, की एका टप्प्यावर हे विचारमंथन थांबवण्यात येतं. मध्ये कधीतरी विश्रांती घेऊन यातल्या कुठल्या कल्पना व्यवहार्य आहेत, कुठल्या त्याज्य किंवा कुठल्यांचा अभ्यास करायची गरज आहे, हे ठरवलं जातं व यादीला अंतिम स्वरूप दिलं जातं. वेळेच्या चौकटीची जोड देऊन यातून एक कृतियोजना तयार होते.

कुठल्याही कल्पनाविलासाचं फलित कृतीच रूपांतरित होणारं नसेल, तर ते निरर्थक असतं. सदस्यांची सरमिसळ असेल तर कल्पनांना अधिक वाव मिळतो. आमचा एक रेकॉर्डर बंद होऊन त्याचं त्यापुढचं सुधारित मॉडेल करण्याचा प्रश्‍न होता. त्यात आम्ही हे विचारमंथनाचं तत्त्व खूप वेळा वापरलं. एक उदाहरण देतो. वस्तू एकमेकांना जोडणं (fixing) यासाठी किती पर्याय आहेत, याची यादी चालली होती. सर्वसाधारण प्रचलित वस्तूंचा विचार होता. त्यात स्क्रू करणं, रिव्हेट करणं, सोल्डर वेल्ड करणं, उष्णतेनं प्लास्टिक वितळवून, नुसतं कोल्ड प्रेसिंग, गाठ बांधून, वेलक्रोद्वारा, झिप, स्टेपल, बटण, चिटकवणं, प्लास्टिक क्‍लिक फिक्‍सिंग, दोन भागांत तिसरा सॅंडविच करणं असे अनेकानेक पर्याय पुढे आलं. या मंथनाची फलनिष्पत्ती म्हणजे पूर्वीचे ३१ स्क्रू जाऊन नवीन संचामध्ये केवळ चार स्क्रू राहिले! याच कल्पनेतून एका रेडिओत आम्ही ‘सॅंडविच’ पद्धतीनं स्पीकर बसवला होता. स्पीकर फ्रंटवर ठेवून, बॅक कॅबिनेट फ्रंटला स्क्रू करताना त्यावर एक प्लास्टिकचा छोटा पिलर आणून स्पीकरच्या मॅग्नेटवर अलगद टेकवला होता. अर्थात अनेक चाचण्या करून. तीन स्क्रू, तीन ब्रॅकेट व वेळही वाचला!

विचारमंथन ही खूप ताकदीची प्रणाली आहे. बचतगट, भिशी मंडळं, कट्टा अशा ठिकाणी करमणुकीसाठी व गप्पांसाठी लोक जमतात. कधीतरी एखादी समस्या घेऊन विचारमंथन करून पाहा! मजा येईल... उद्योजकांच्या एका गटानं, दर बैठकीच्या वेळी एका सदस्यानं त्याला भेडसावणारी समस्या सांगायची व इतरांनी १५ मिनिटांत विचारमंथन करून त्यावर उपाय सांगायचे, असा उपक्रम राबवला होता. सगळ्यांना तो खूप फायदेशीर ठरला होता.

विचारमंथन हा उपाय समस्या सोडवण्यासाठी चांगला असला, तरी नवनिर्मितीच्या वेळी किंवा एखाद्या वस्तूमध्ये नवीन वैशिष्ट्याची भर घालताना हे तंत्र उपयोगी पडेलच असं नाही. त्या वेळी अभ्यास व मनन याचाच उपयोग होईल. हॉलंडनं त्यांच्या सीडी लोडरसाठी आम्हाला एक ‘डिझाइन प्रोजक्‍ट’ दिलं होतं. त्यात सीडी ठेवण्यासाठी एक ट्रे बाहेर यायचा, त्यात सीडी ठेवावी लागे. ही रचना खूप महागाची होई म्हणून त्यांनी एक स्वस्त कल्पना, ‘स्विंग लोडर’ अशी सुचवली होती. यात एका बाजूच्या बिजागरीसदृश रचनेनं ब्रॅकेट पुढं येई. चंद्रशेखर रांजेकर या माझ्या डिझायनरनं यात एक फार कल्पक रचना केली होती.

विचारमंथन ही समूहानं किंवा गटानं करण्याची प्रणाली असली, तरी तिचं वेगळं रूप हे ‘सूचनापेटी’ म्हणजे ‘सजेशन स्कीम’ याद्वारेही करता येई. छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या कारखानदारांपर्यंत ही प्रणाली कुणालाही राबवता येते. तुमच्या उत्पादनात किंवा व्यवसायनिगडित प्रक्रियेमध्ये कुणीही कामगार कार्यक्षमता वाढवणारी किंवा पैसा वाचवणारी सूचना लिखित स्वरूपात करू शकतो. यात पारदर्शकता, प्रोत्साहनपर बक्षिसं वगैरे ठेवून खूप चांगले परिणाम साधता येतात.
उजवा मेंदू जितका वापरला जाईल, तितका तो कार्यक्षम राहतो. मात्र, त्यासाठी जिज्ञासा व कुतूहलवृत्ती जागृत ठेवली पाहिजे. शक्‍य असेल तितकी माहिती गोळा करत राहिलं पाहिजे. माहितीचं रूपांतर ज्ञानात करताना आपोआप प्रतिभेचा वापर होतो. पुस्तकात ज्ञान असतंच; पण आपल्या विषयाची नियतकालिकं वाचून, प्रदर्शनांना भेटी देऊन व वृत्तपत्रांचं डोळस वाचन करून हे ज्ञान अद्ययावत ठेवता येतं. कोडी, शब्दकोडी, सुडोकू सोडवल्यानं उजवा मेंदू तल्लख राहतो. अचानक सुचणाऱ्या कल्पना विरून जाऊ नयेत म्हणून छोटी वही जवळ बाळगून तीत त्या टिपून ठेवण्याची सवय कधीही चांगली. ही सवय मला आवडते. वाचनाची गंमत अशी, की मनोरंजनासाठी केलेलं वाचन आपल्या मनःचक्षूंपुढं त्या घटनेचं चित्र निर्माण करतं. ते आपलं स्वतःचं असतं. एक ‘हॅरी पॉटर’ चार लोकांनी वाचला, तर प्रत्येकाच्या डोळ्यांपुढं वेगळं चित्र निर्माण होईल. काही वर्षांपूर्वी मी प्रथम हे पुस्तक वाचलं, तेव्हा ते विश्व माझ्या डोळ्यांपुढं उभं राहिलेलं मला आठवतं. नंतर त्याचा सिनेमा आला. मात्र, मी तो सिनेमा फार काळ पाहू नाही शकलो! कारण, ‘माझा’ हॅरी पॉटर तो नव्हताच!

स्वप्नरंजन आणि कल्पनारम्यता ही आणखी एक सवय मेंदूला सक्षम बनवत असते. आपलं भविष्याचं चित्र, पुढची जबाबदारी, एखादी आवडती घटना याबद्दलचं चित्र आपण मनःचक्षूंपुढं रंगवू शकतो. मेंदूला चालना कोणत्या गोष्टींमुळं मिळते, हे आपलं आपणच सतत शोधत राहिलं पाहिजे. वाचन, रेडिओ ऐकणं, कोडी सोडवणं, लेखन, कुतूहल, कल्पनारम्यता या गोष्टी अंगीकारून आपल्यातली कल्पकता विकसित करता येऊ शकते. Creativity is learning to make mistakes. Design is to decide which ones to keep. ‘चुका हा कल्पनाशक्तीचा अपरिहार्य भाग आहे, त्यातल्या कुठल्या (चुका) उपयुक्त ते डिझाइन ठरवतं.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com