सख्खे-सावत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brothers Relation
सख्खे-सावत्र

सख्खे-सावत्र

अण्णाजी गेल्यानंतर परिवाराला दुभंगण्यापासून वाचवण्याचे काम अण्णाजींच्या आईने केले; मात्र तरीही सख्खे आणि सावत्र अशा वादाच्या ठिणग्यांनी वाडा अस्वस्थ असायचा. कालांतराने अण्णाजींची आईही गेली आणि वेगळे झालेल्या आपल्याच भावंडांबद्दल दाखविलेली आस्थाही आपल्या घराण्याशी द्रोह आहे, असे आरोप केले जाऊ लागले... त्या वाड्यात आता बहुसंख्यकांचा अतिरेक सुरू झाला होता...

अण्णाजींचा परिवार आमच्या समोरच्याच वाड्यात राहायचा. कौलारू दुमजली वाडा. स्वातंत्र्याच्या आधी अण्णाजींनी बांधला होता म्हणतात. त्यांच्याकडे शेतीवाडी, मळा, दुभती जनावरं अशी समृद्धी होती. आताही त्याच्या श्रीमंत म्हणाव्यात अशा खुणा आहेत. अण्णाजींची मोठ्ठी तसबीर आहे दिवाणखान्यात. या वाड्यात अनेक आडव्यातिडव्या गोष्टी घडत आल्या आहेत. म्हणजे अण्णाजींचे एक अंगवस्त्र होते सोनाबाई नावाचे... अर्थात हे आम्हाला ऐकूनच माहिती. तिच्या सौंदर्याची अगणित आणि अद्भूत लावण्यमयी वर्णने आम्ही ऐकत आलो आहोत. सोनाबाईचा शेतातला वाडा अजूनही तसाच होता. अण्णाजींच्या बायकोने म्हणजे दक्षिणाबाईंनी सोनाबाईला स्वीकारले होते. दक्षिणाबाई तशा कमी वयातच गेल्या. त्यानंतर सोनाबाईच वाड्यात राहायला आली आणि तिनेच हा खटला सांभाळला, असेही लोक सांगतात. सोनाबाईला एक मुलगी आणि चार मुलं झाली. दक्षिणाबाईची सात मुलं आणि एक मुलगी...

आता अण्णाजींची ही सोनाबाई आणि दक्षिणाबाई यांची मुलं वाढत राहिली. एकत्र नांदू लागली. अर्थातच घरात बालविधवा असलेल्या आत्याबाई होत्या. त्या मग तशाच कर्मठ अन् अतृप्ततेने, असोशीने दाटलेल्या असल्याने कर्दावलेल्या होत्या. नेणिवेच्या मनात त्या साऱ्या जगावर सूड उगवल्यासारख्या वागायच्या. तिने मग सोनाबाईची मुलंही आपल्या घराण्याची नाहीत, बाटलेली आहेत, असंला विषारी पाझर घरात फुसफुसायला सुरुवात केली. अण्णाजी साठीतच गेले आणि मग आत्याबाईच्या या वर्गद्वेशाला मोकळीक मिळाली. मात्र अण्णाजींची आई होती. ती म्हणे १२० वर्षे जगली. तिने या सोनाबाईच्या संततीला परकेपणा वाटूच नये, यासाठी आटापिटा केला. सोनाबाईची जात वेगळी असली, धर्मही वेगळा असला, तरीही आता तिची संतती काही तिच्या एकटीची नाही, अण्णाजी म्हणजे माझ्या गंगाधरची आहे, असे म्हातारीचे म्हणणे होते.

आपल्या घराण्याचे रक्त... ही भावना आत्याबाईने पेरली आणि ती विषासारखी पसरत राहिली. अण्णाजींच्या काळात जी काय शेतीवाडी वाढली, काही लोकांनी शेतीवर कब्जा केला होता. त्यातून शेती आणि शेतातला वाडा सोडविण्याचा लढा या परिवाराला द्यावा लागला होता. तेव्हा अण्णाजींची आई म्हणजे आज्जीने अण्णाजींच्या लेकरांना समजावले होते, ‘‘आम्ही एकशेपाच आहोत!’’ आता मात्र आपल्याला दुय्यम वागणूक मिळते आहे, अशी भावना सोनाबाईचा मोठा मुलगा वसंतामध्ये बळावत गेली. अर्थातच त्याला आत्याने भडका दिला. आज्जीचा नियम होता की साऱ्या परिवाराने एकत्रच जेवायला बसायचे. साऱ्यांना सारखे वाढायचे. पंगतीप्रपंच नको... आत्याबाई नेमका तो करायची. वसंताला तो सापत्नभाव जाणवून द्यायची.

वसंता आणि त्याच्या भावांमध्ये यावर चर्चा व्हायची, तेव्हा सगळ्यात लहान भाऊ आणि एकमेव बहीण सामंजस्याने घ्यावे, असेच सांगायचे. आज्जीशी बोलू यावर, कारण आत्याबाई त्यांच्या विश्वासू नोकराद्वारे दुहीची भावना पेरत आहेत, असे त्या दोघांचे म्हणणे होते. अशाच ठिणग्या पडत राहिल्या आणि एक दिवस भडका उडाला. अगदी हाणामारीवर आली सोनाबाई आणि दक्षिणाबाईंची मुलं... वसंताचे म्हणणे होते की, मग आता आमचे वेगळे करून द्या. आज्जीला ते मान्य नव्हते; पण सगळेच इतके विकोपाला गेले होते की आज्जीचा नाईलाज झाला. अण्णाजींच्या मोठ्या मुलाने पुढाकार घेऊन ज्यांना वेगळे व्हायचे त्यांनी शेतातल्या वाड्यात राहायला जावे आणि गावखारीतली ती जमीन त्यांच्या नावाने करून देऊ, असा निर्णय घेतला. त्या एकसंध घराची फाळणी झालीच...

तरीही सोनाबाईच्या चार मुलांपैकी सगळ्यात लहान शरद आणि मुलगी जाई यांनी आज्जीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यावरही आत्याबाईंनी वाद खेळविलाच; पण अखेर आज्जीपुढे कुणाचेच चालले नाही. आज्जीला सोनाबाईच्या या दोन लेकरांचा समंजसपणा भावला. एक दिवस साऱ्यांनाच ते कळेल अन् अण्णाजीचा परिवार एकत्र येईल, असे आज्जीला वाटत राहिले.

आत्याबाईचे मात्र पूर्ण समाधान झालेले नव्हते. आज्जी ही तिची माय असूनही थेरडी जरा जास्तच सहिष्णू आहे, असे ती जाहीर बोलून दाखवायची. ‘‘त्यांना त्यांचा वाटा दिला ना? मग त्या सोनाबाईच्या मुलांनी आता इकडे राहण्याचे काही कारण नाही... एकतर त्यांचा पूर्ण खर्च आपण करायचा अन् पुन्हा ते कधीतरी इकडेही हक्क सांगणार... म्हणजे बोजाच आपल्यावर!’’ अशी दक्षिणाबाईच्या मुलांची भावना करून देण्यात आत्याबाईला बऱ्यापैकी यश आलेले.

अर्थात त्यांच्यातही दोन मते होती. आज्जी करते ते बरोबर आहे, असे मानणारीही मंडळी होती. त्यात दक्षिणाबाईचा मोठा शरद होता, हे महत्त्वाचे. दक्षिणाबाईच्या सातपैकी चार मुलांचे मत आज्जीच्या बाजूचे होते. मागे राहिलेल्या, आपल्या सोबत राहिलेल्या या दोघांना परकेपणा वाटू नये, आयसोलेशन वाट्याला येऊ नये, याची काळजी आज्जी घ्यायची अन् मोठा शरदही ते पाळायचा...

आज्जी एकशेविसाव्या वर्षी गेली. म्हणजे अण्णाजीनंतर जवळपास तीस वर्षांनी... तोवर सोनाबाईच्या या आपल्या भावंडांसोबत न जाता इकडेच आज्जीसोबत थांबण्याचा निर्णय घेतलेल्या मुलांची विशेष काळजी घेतली जात होती. आज्जीने त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना खास सवलती दिल्या होत्या. सोनाबाई यांच्यासोबत राहिलेल्या मुलांविषयीची ही विशेष आस्था आत्याच्या विचारांचे असलेल्या दक्षिणाबाईंच्या मुलांना खटकत होती. दोघेच आहे, संख्येने कमी आहेत अन् तुम्ही जास्त आहात म्हणून त्यांना संरक्षण, बरोबरीची वागणूक म्हणून आज्जी त्यांचे लांगुलचालन करते, हे आत्याचे मत दक्षिणाबाईंच्या मुलांना कडवे बनवत गेले... आज्जी गेल्यावर मोठ्या शरदने काही दिवस ते सांभाळले. सोनाबाईच्या मागे राहिलेल्या दोघांचीही अन् त्यांच्या परिवाराची विशेष काळजी घेतली जात होती. शरद थकला, म्हातारा झाला अन् मग आत्याच्या कडव्या विचारांच्या असलेल्या मधल्या माधवच्या हातात घराची सूत्रे गेली... सोनाबाईंची खास खोली जी स्मृती म्हणून राखली होती ती भाड्याने देण्यात आली. सोनाबाईंची समाधी त्या विस्तारलेल्या वाड्याच्या आवारातच होती. ती काही बांधकाम करण्याच्या नावाखाली हटविण्यात आली. सोनाबाईचे कुलदैवत भैरवी माता होती. तिचा उत्सव व्हायचा दरवर्षी या वाड्यात. तो बंद करण्यात आला. आपल्या परिवाराचे कुलदैवत बालाजी आहे, त्याचेच काय ते होईल, असे ठरविण्यात आले. रहायचे असेल इकडे तर आमच्या चालीरीती पाळा, आमच्या मताने रहा, असे आता उघडपणे सांगण्यात आले सोनाबाईंच्या त्या मुलांना...

शेतातल्या वाड्यात वेगळे झालेल्या आपल्याच भावंडांबद्दल दाखविलेली आस्थाही आपल्या घराण्याशी द्रोह आहे, असे आरोप केले जाऊ लागले... ही दोघं मागे राहिली तर एकदिवस सारेच एक होतील, हे आज्जीचे विचार धुळीस मिळाले होते. त्या वाड्यात आता बहुसंख्यकांचा अतिरेक सुरू झाला होता!

(कुण्या सुजाण वाचकाला ही कथा देश-कालाची वास्तव कहाणी वाटली तर तो निव्वळ योगायोग आहे, असे मी म्हणणार नाही.)

pethkar.shyamrao@gmail.com

Web Title: Shyam Pethkar Writes Brothers Dispute Relation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top