भास की सत्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास की सत्य?

विज्ञान की अध्यात्म, हा प्रश्न आपल्याला साऱ्याच काळात पडत आलेला आहे. अध्यात्म हे आस्तिकांचे विज्ञान असते आणि विज्ञान हे नास्तिकांचे अध्यात्म.

भास की सत्य?

विज्ञान की अध्यात्म, हा प्रश्न आपल्याला साऱ्याच काळात पडत आलेला आहे. अध्यात्म हे आस्तिकांचे विज्ञान असते आणि विज्ञान हे नास्तिकांचे अध्यात्म. त्या अर्थाने दोघेही आस्तिकच. ‘कोऽहम्’ या सनातन प्रश्नाचे उत्तर अध्यात्मच शोधत असते असे नाही तर विज्ञानही ‘मी कोण आहे?’ याचा शोध घेत असते. अध्यात्म आणि विज्ञानातही अखेर ‘मी’चे विसर्जन केल्याशिवाय पूर्ण ज्ञानी होता येत नाही, अशीच मान्यता आहे. अध्यात्म सांगते की, जग हे भ्रामक आहे. जे दिसतं ते सत्य नाही अन् म्हणून सत्याचा शोध घ्यायला हवा...

तो खूप पुढच्या काळातला; पण काळाच्या मागे आला. त्याला त्याच्याच अस्तित्वाचे मूळ शोधायचे होते. त्याचे मूळ रूप हरविले आहे, असे त्याचे म्हणणे होते. मला बरे वाटले, भविष्यातल्या पिढीचा तो तरुण इतका अध्यात्मिक विचार करतो अन् ‘कोऽहम्?’च्या शोधात इतका मागे येतो, याचा आनंद फार काळ टिकला नाही.

त्याच्याशी चर्चा करताना, त्याला पडलेला प्रश्न अध्यात्मिक वाटत होता; पण नव्हता. त्याचा शोध ‘स्व’चा होता, मात्र ‘कोऽहम्?’ असा त्याचा प्रश्न नव्हता. त्याला स्वत:चे मूळ अस्तित्व हवे होते. त्याला धक्का बसला होता की ज्याला तो स्वत:चे ठोस अस्तित्व समजत होता ते भासमान निघाले...

तो माझ्या म्हणजे वर्तमानाच्या साधारण पाचेक दशके तरी नंतरचा असावा. त्याच्या जन्मापासून तो आभासी जगातच वावरत होता. म्हणजे त्याचा जन्म झाला तो दवाखान्यात. बरे हा दवाखाना म्हणजे आताच्यासारखी स्वतंत्र इमारत वगैरे असे काहीच नाही. तशा इमारतीच नाहीत त्याच्या काळात. भूखंड नव्हे तर एक ‘स्पेस’ (अवकाश) त्याच्या वडिलांनी खरेदी केले होते. आभासी दवाखाना उभा केला आणि डॉक्टरांच्या आभासी प्रतिमेने जन्मदात्रीचे बाळंतपण केले. त्याच्या जीवशास्त्रीय आईला त्याच्या जन्माची वार्ता कळली, तेव्हा तिची होलाग्रामिक इमेज प्रकट झाली. तिने त्याचे खूप लाड केले. त्याच्या जन्मदात्रीचे आभार मानले. तिचे या कामाचे मानधन केव्हाच तिच्या अकाऊंटला जमा झालेले होते...

तो हे जे काय सांगत होता, ते समजून घ्यायला ताण पडत होता. होलोग्रामिक इमेज आता आली आहे; पण त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या भविष्यातल्या त्या काळाची ही इमेज आतापेक्षा कितीतरी वास्तव वाटावी, अशीच होती आणि त्याच्या काळात केवळ माणसूच नाही, तर वास्तू आणि वस्तूंचीही अशी भासमान सत्य प्रतिमा तयार करता येत होती. तो मग त्याच्या आई-वडिलांच्या अवकाशात राहायला आला, जन्मदात्रीजवळ काही महिने काढल्यावर. त्याचे शिक्षण सुरू झाले. शहरातील नामांकित शाळेत त्याने प्रवेश घेतला. मग त्याच्या वडिलांना त्यांच्या या अवकाश निवासस्थानी त्याच्या वर्गातील त्याची स्पेस अ‍ॅसेस करण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचा कोडवर्ड/पासवर्ड त्यांना देण्यात आला. त्यांनी मग त्याला त्यांच्या सदूर ठिकाणाहूनच त्याची शाळा व वर्गखोली अ‍ॅक्टिव्ह कशी करायची, हे शिकवून दिले. शाळेची वेळ झाली की तो त्याची वर्गखोली पासवर्ड टाकून अ‍ॅक्टिव्ह करायचा. तासागणिक बदलणाऱ्या त्या त्या विषयाच्या शिक्षकांच्या इमेजेस प्रकट व्हायच्या. होलोग्रामिक इमेजसच; पण त्यांना आतासारख्या प्रोजेक्टरची गरज नसायची, त्यांचे सदूर संकेतस्थळाहून एअर प्रोजेक्शन व्हायचे. शाळेच्या मधल्या सुट्टीत तो त्याच्यासाठी देण्यात आलेल्या त्याच्या वास्तूतील त्या स्पेसमध्ये खेळाचे मैदान निर्माण करायचा. अर्थात ही इमेजच असायची. मित्रांचीही इमेज आणि ते मग खेळायचे.

तो जसजसा मोठा होत गेला, तसे हे तंत्र आणखीच विकसित होत गेले. आभासी प्रतिमांचा गोतावळाही वाढत गेला. त्याला हवे असलेले तो ऑनलाईन मागवायचा अन् जे काय मागविले त्याचे आकारमान, वजन आणि रूप यानुसार ते त्याच्या स्पेसमधील तांत्रिक कप्प्यात येऊन पडायचे. मागविलेली वस्तू येऊन पडली कप्प्यात की बझर व्हायचा... डिलिव्हरी बॉयचा प्रश्नच नाही. त्याच्याच त्या अवकाशात त्याचे आई आणि बाबाही वावरायचे. कधी कधी ते जेवायला एकत्र यायचे प्रत्यक्ष. नाही तर रात्रीचे जेवण ते असतील तिथूनच होलोग्रामिक इमेजेसने एकत्र येत करायचे.

तो एका मुलीच्या प्रेमात पडला. ते असेच भेटले होते कॉलेजला. म्हणजे त्याने त्याच्या प्रीपेड अवकाशात निर्माण केलेल्या अस्तित्वातील कॉलेजच्या सत्यप्रत इमेजमध्ये. तिचे स्नेहसंमेलनातले गाणे त्याला खूप आवडले. तेव्हापासून त्यांच्या सत्यप्रतींच्या रूपातील भेटीत त्यांची मैत्री आणि प्रेम फुलू लागले. तो एकदा त्याच्या त्या आंतरजालीय लहरींच्या माध्यमातून आफ्रिकेच्या जंगलाची सफारी करीत असताना त्याच्या वाट्याला शिकारीसाठी आलेले हरीण प्रेग्नंट आहे, हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने त्यावर गोळी चालविली नाही. हे पाहून तिथेच असलेल्या तिने त्याच्यावरचे आपले प्रेम जाहीर करून टाकले. अर्थात हे प्रकटीकरण आभासी प्रतिमांचेच होते...

हे असेच सुरू राहिले खूप दिवस अन् त्याला वाटले की आपण आपल्या आईला हे सांगायला हवे. तुला सून पाहिली म्हणून. कारण आता त्याला नोकरीही लागली होती. एका नामांकित कंपनीत चांगल्या पॅकेजची.

त्याने बोलावल्यावर आई आली. त्याला आईची खूप आठवण येत होती. आईच्या कपड्यांना येणारा एक असा गंध त्याला वेडावत होता. आईने कवेत घेऊन आपले लाड करावेत, असे त्याला वाटत होते. तो आईच्या जवळ गेला. त्याला लक्षात आले की ती आई नाही, तिची अवकाश प्रतिमाच आहे. बरे त्या प्रतिमेला या वेळी मुलाला काही सांगायचे आहे महत्त्वाचे ते कणवेने ऐकून घेणे, इतकेच फीड केलेले. मुलाच्या भावना आणि गहिवर समजून त्याला मायेच्या ओलाव्याने जवळ घेणे वगैरे फिडिंग झालेले नव्हते. आईने त्याचे ऐकले. ‘‘मुलगी चांगली असेल, तर भेट एकदा तिला प्रत्यक्ष. कारण आभासी प्रतिमा वेगळी आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती वेगळी असते. आभासी-होलोग्रामिक इमेजमध्ये आपल्यात नसलेल्या गोष्टी, गुण, भाषा, ज्ञान फीड करून पाठविता येते. त्यामुळे मूळ व्यक्तीला भेटूनच निर्णय घ्यावेत, असा सल्ला त्याच्या आईच्या या प्रोजेक्टेट इमेजने दिला. जेवलास का, वगैरे आपुलकीचे शब्द ती मातृप्रतिमा बोलली आणि मग अंतर्धान पावली...

मग त्याने तिला बोलावले. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळत आणि जागी ती आली. त्याने तिच्यासाठी तिला आवडणाऱ्या रस्तराँची एक स्पेस, सर्व सूचना देत ती दोन तासांसाठी बुक केली. पूर्ण एकांत, ती आणि आपणच या कल्पनेने त्याला रोमँटिक वाटले. तिची आज प्रत्यक्ष भेट होणार होती. आपण तिला जवळ घेणार. तिच्या वास्तव अस्तित्वाचा ऊबदार स्पर्श आणि श्वासांचे तापलेपण आपण अनुभवणार आहोत, हे कल्पनेनेच त्याच्या धमण्यातील रक्त सळसळू लागले होते. तो थोडा नर्व्हसही झाला होता, कारण बऱ्याच दिवसांनी नव्हे, तर वर्षांनी तो कुठल्या जिवंत व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणार होता. तिचा हात हातात घेणार होता अन् स्पर्शाची सत्यानुभूती त्याला होणार होती.

ती आली. ते बोलत बसले. त्याने तिला फुले दिली. ती लाजली. त्याने तिला जवळ ओढले, ओठांवर ओठ टेकविणार तर त्याच्या लक्षात आले की, ती वास्तवात नाही, ही तिची आभासी प्रतिमा प्रोजक्ट करण्यात आली आहे... असे का करावे तिने? त्याने तिच्या वास्तवाला, मूळ प्रतिमेला विचारण्याचा प्रयत्न केला. तिच्या खऱ्या अस्तित्वाची रेंजच नव्हती. पल्सेस पोहोचतच नव्हत्या तिच्यापर्यंत. मग त्याच्या डिव्हाईसमध्ये सूचना आली, ‘आप जिस मूल अस्तित्व से जुडना चाहते है वह अभी नेटवर्क क्षेत्र के बाहर है...’

त्याने खूप प्रयत्न केला. अखेरीस ‘यह मूल अस्तित्व अभी अस्तित्व में नही है, कोड कृपया जांच लें’, अशी सूचना आली.

तो खचला. आभासी प्रतिमांच्या जाळ्यात अनेकांचे मूळ अस्तित्व हरविले होते. आताशा आपल्याशी बोलणारी, भेटणारी कुठलीही व्यक्ती मूळ नसतेच. सारेच कसे आभासी झाले आहेत. आपली आईदेखील. व्यक्ती, घटना, स्थळं... सगळंच आभासी. या जगात कुणीच मूळ नाही, याचा त्याला जबर धक्का बसला. तो कोलमडलाच. स्वत:ला सावरत तो खुर्चीवर बसला. किमान ही खुर्ची तरी ठोस अस्तित्व आहे, याचे समाधान त्याला आनंद देऊन गेले. त्याने मग खाली ठेवलेला पाण्याचा जग उचलण्यासाठी हात तिकडे केला. त्याचा हात खुर्चीच्या हातातून आरपार गेला... बापरे! म्हणजे मीही? मीदेखील आभासी प्रतिमाच आहे! माझे मूळ अस्तित्व कुठे आहे? मुळात ते होते की नाही? की मी जन्म घेतला हा माझ्या माय-बापाला झालेला भास? की त्यांनी माझी आभासी प्रतिमाच निर्माण केली? आभास आहे याचा अर्थ मूळ असलेच पाहिजे ना? कुठेय माझे मूळ अस्तित्व? तो शोध घेत भूतकाळात माझ्यापर्यंत येऊन पोहोचला... मी काय सांगणार त्याला? माझे जे होते ते तरी वास्तव अस्तित्व होते का? ठोस काय?

pethkar.shyamrao@gmail.com

Web Title: Shyam Pethkar Writes Truth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top