esakal | कोरोनानंतर ‘आत्मनिर्भरते’ची प्रेरणा...
sakal

बोलून बातमी शोधा

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी प्रथेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना अर्थसंकल्पाची कल्पना दिली. त्यावेळी त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर व वरिष्ठ अधिकारी.

अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला. १८ डिसेंबर २०२० रोजी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) च्या कार्यक्रमात भाषण करताना आगामी अर्थसंकल्प हा शतकातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल असे प्रतिपादन केले होते.

कोरोनानंतर ‘आत्मनिर्भरते’ची प्रेरणा...

sakal_logo
By
सिद्धार्थ शिरोळे, साहिल देव saptrang@esakal.com

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला. १८ डिसेंबर २०२० रोजी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) च्या कार्यक्रमात भाषण करताना आगामी अर्थसंकल्प हा शतकातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल असे प्रतिपादन केले होते. सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक, संतुलित आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प असून त्यांनी खरोखरच जागतिक संकटातून उभारी घेत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं बळ दिलंय. असे करताना, त्यांनी सर्वसामान्य जनतेवर कोणताही अधिकचा बोजा पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली, आणि देशातील संसाधनांचा कल्पकतेने वापर करून शाश्वत संपत्ती निर्माण करण्याकडे भर दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील आर्थिक वर्ष हे अत्यंत खडतर होते. कोरोनाच्या आघातामुळे केवळ भारतातील नव्हे तर  जगातील व्यापार, उद्योग ठप्प पडले. अजूनही अमेरिका, युरोप, इंग्लंड यांसारख्या प्रगत देशांना कोरोनाच्या संक्रमणावर विजय मिळवता आलेला नाही. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग्य ती पावले उचलून वेळीच टाळेबंदी आणि इतर कठोर उपाययोजना केल्याने भारताने कोरोना साथीला रोखले असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. या दरम्यान विविध आर्थिक आणि थेट मदतीचे उपाय केले गेले. कोरोना काळात तब्बल २७ लाख कोटी रुपयांची मदत मोदी सरकारने केली. याच धोरणात्मक सुधारणांना पुढे नेत कालच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेला केंद्रस्थानी ठेवले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जान है तो जहान है’ असे मोदी यांनी वेळोवेळी सांगितले आहे. आरोग्य क्षेत्रावरील तरतूद तब्बल १३७ टक्क्यांनी वाढवून २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीयाचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून घेतलेली ही हनुमान उडी म्हणजे सुदृढ आणि सक्षम भारताची पायाभरणीच आहे. मागील एका वर्षात भारताने फक्त कोरोनाचाच सामना यशस्वीरीत्या केला नाही तर महामारीच्या सुरुवातीला रेमडेसीव्हीर आणि आता दोन लसीचा पुरवठा संपूर्ण जगाला करत जगाचा औषधनिर्माता अशी ओळख निर्माण केली. अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखी दोन किंवा त्याहून अधिक लसी तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आरोग्याची व्याप्ती वाढवताना स्वच्छता, शुद्ध हवा, पाणी आणि पोषण यादेखील मूलभूत आणि संलग्न बाबी आहेत हे या अर्थसंकल्पात अधोरेखित केले गेले. 

शहरे ही देशाच्या अर्थव्यवस्थेची इंजिने आहेत. शहरांमधील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था आधुनिक करताना पर्यावरण तसेच कार्यक्षमतेकडे विशेष लक्ष अर्थसंकल्पात दिले आहे. महाराष्ट्रातल्या नाशिक येथील निओ मेट्रोची दखल केंद्र सरकारने घेतली आणि त्याच धर्तीवर देशातील इतर शहरात मेट्रो प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला आहे. शहरांमधील अंतर्गत बस वाहतुकीला बळकटी देण्यासाठी करण्यात आलेली तब्बल १८ हजार कोटी रुपयांची तरतूद फक्त शहरी वाहतुकीसाठीच नव्हे तर उत्पादन क्षेत्रासाठीसुद्धा गेम चेंजर ठरणार आहे.

‘पीपीपी’तत्वावर खासगी क्षेत्राला संधी दिल्याने स्पर्धा निर्माण होऊन त्याचा परिणाम सेवा सुधारण्यात होईल. धोरण सातत्य आणि कर पद्धतीतील स्थैर्य हे उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी पूरक असते. या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जी अभूतपूर्व उसळी पाहायला मिळाली हे धोरणसातत्याचे आणि करप्रणालीतील स्थैर्याचेच द्योतक होते असे म्हणावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कररचनेत बदल होणार किंवा कोरोना सेस लागू करणार अशा वावड्या प्रसिद्धी माध्यमातून उठल्या परंतु कंपनी किंवा वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल अर्थ मंत्र्यांनी न करता मध्यमवर्गीय आणि उद्योजकांना मोठा दिलासा दिला. 

एप्रिल २०२० मध्ये मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी PLI ही प्रोत्साहन योजना राबवली होती. त्याला जगभरातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. ॲपल फोन तयार करणाऱ्या फॉक्सकॉन, विसट्रॉन आणि पेगाट्रॉन या तीनही कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी करार केले. अशाच प्रकारची PLI योजना इतर १३ क्षेत्रांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राला मोठे बळ मिळणार असून भविष्यातील वाहननिर्मिती, औषधनिर्मिती त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात उत्पादकता वाढून मोदी यांनी पाहिलेले ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण होईल. भांडवली खर्चात वाढ आणि त्याचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी करणार ही या अर्थसंकल्पामधील आणखी एक मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन मध्ये तब्बल ७४०० प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.    

कोरोनाच्या आघाताने  निर्माण झालेले आरोग्य आणि आर्थिक संकट, टाळेबंदीमुळे बंद पडलेले व्यापार आणि उद्योगधंदे तसेच जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि अनिश्चितता या सर्व पार्श्वभूमीवर करप्रणालीत कोणतेही बदल न करता अर्थसंकल्पाच्या तरतुदीत वाढ करणे हे अतिशय आव्हानात्मक काम होते. मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी हे फक्त पेललेच नाही तर संपूर्ण देशाला आत्मनिर्भरतेची आणि आत्मविश्वासाची एक नवी प्रेरणा या अर्थसंकल्पातून दिली आहे.

Edited By - Prashant Patil