महाराष्ट्राची लाईफलाईन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रमाण शॉर्टफॉर्म उच्चार एसटी असला, तरी गावखेड्यात आजही ती एशटी अन्‌ लाल परी म्हणूनही ओळखली जाते.
MSRTC
MSRTCsakal

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रमाण शॉर्टफॉर्म उच्चार एसटी असला, तरी गावखेड्यात आजही ती एशटी अन्‌ लाल परी म्हणूनही ओळखली जाते. हीच लाल परी कित्येकांसाठी आठवणींचा खजिना आहे. कित्येकांसाठी लांबच्या प्रवासाची सोबती, तर कित्येकांसाठी खिशाला परवडणारी हक्काची वाहतूक सेवा. आपल्या या ‘एशटी’ला अलीकडेच ७५ वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्त...

मुंबईची लाईफलाईन जर का मुंबईची लोकल असेल, तर महाराष्ट्राची लाईफलाईन लालपरी आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एमएसआरटीसी असा लांबलचक शॉर्टफॉर्म असलेल्या आपल्या एसटीचं संपूर्ण नाव म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस.

लालपरी खरंतर सुरुवातीला लाल नव्हती. ती होती निळी. मग एसटीची निळीपरी.. लाल केव्हा झाली? निळी बस नेमकी सुरू केव्हा झाली? तेव्हा लाकडी बस नेमक्या होत्या कशा, याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनावर कोरलेल्या आहेत.

तो दिवस होता १ जून १९४८. बसचा रंग होता निळसर-चंदेरी. अवघ्या ३५ बेडफोर्ड बससह एसटी महामंडळाचा शुभारंभ झाला आणि पहिली एसटी धावली अहमदनगर-पुणे-अहमदनगर मार्गावर. या बसची बांधणी लाकडाची होती.

सीट्स काथ्याच्या आणि खिडकीला ताडपत्री असायच्या. त्या काळी या बसमध्ये ३० प्रवाशांच्या बसण्याची क्षमता होती. आता जरी बहुतांश एसटी बस डिझेलवर चालत असल्या, तरी तेव्हाच्या बसेस या पेट्रोलवर चालायच्या. नगर ते पुणे या प्रवासाच्या तिकिटाची किंमत होती अवघी आठ आणे.

एसटीचा जन्म मुंबईत झालाय. तोही सांताक्रूझमध्ये. एसटीच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली बस सन १९५० मध्ये साकारली गेली. लेलँड कंपनीच्या सांगाड्यावर एसटीच्या स्वतःच्या कार्यशाळेत पहिली बस बांधण्यात आली होती. या बसची बांधणी धातूमध्ये केली जात असे. बस तयार करण्यासाठी लागणारा सगळा कच्चा माल भारतातून वेगवेगळ्या राज्यातून मागवला जात होता.

हिंदुस्थान एअरक्राफ्ट, बंगळूर, एलन मेटल वर्क्स, हेदराबाद आणि सिम्पसन लिमिटेड आणि चेन्नई येथून सगळा कच्चा माल यायचा आणि त्यातून मग मुंबईच्या सांताक्रूझमध्ये बसच्या बांधणीला सुरुवात व्हायची.

या बसमध्ये तीनआसनी सीट्स होत्या आणि एका बाजूला खिडकीला समांतर आडवी आसन बैठक व्यवस्था होती. जी कदाचित तुम्ही बॉम्बे टू गोवा या अमिताभ बच्चनच्या सिनेमात पाहिली असेल.

आता बहुतेकांना शिवनेरी, शिवशाही आणि रातराणी या एसटीच्या बस माहीत झाल्यात; पण याच एसटीने आपल्या सुरुवातीच्या काळात नीलकमल आणि गिर्यारोहिणी या नावानेही बससेवा सुरू केली होती. या बस टू बाय टू होत्या. शिवाय या बसला व्हीआयपी टच यावा म्हणून खास पडदे, घड्याळही लावण्यात आलं होतं.

यानंतर तब्बल १० वर्षांनी कुणी विचारही केव्हा नव्हता, असा एक ठोस बदल एसटीत झाला. हे तेच वर्ष जेव्हापासून निळी-चंदेरी रंगाची एसटी लाल रंगाची झाली. लालपरीचा जन्म हा १९६० मध्ये झाल्यानंतर अजूनही हाच रंग एसटीची ओळख बनून आहे. विशेष म्हणजे टाटा मर्सडीज बेंझ या बस सांगाड्यावर अधिक रुंद बस बांधण्यात आली होती.

शिवाय आसनक्षमताही ३५ वरून ५० करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे १९६० मध्ये एसटीचा जो मेकओव्हर झाला तो तिच्या बांधणीला अधिक ताकदवर करणारा होता. कारण लाकडी आणि धातूपासून बनवण्यात येणाऱ्या बसऐवजी आता एसटी गंजरोधक ॲल्युमिनियमपासून साकारली जाऊ लागली होती. यानंतर १९६४ मध्ये एसटीची आरास बस अस्तित्वात आली.

या बसमध्ये घड्याळ, पडदे यांच्यासोबत पंखे आणि रेडिओ स्पीकरही होते. टू बाय टू आसनक्षमता असलेल्या एसटीच्या आरामबसचं भाडंही दीडपट जास्त होतं. या बसचा रंग पांढरा आणि निळा होता. सामान्य एसटी बसपेक्षा आरामबस दिसायलाही अधिक आकर्षक होत्या. आता कुठेच नसली, तरी १९६७ मध्ये पहिल्यांदा एसटीने डबलडेकर बसही बनवली होती.

एसटी बसला सुरुवातीच्या काळात दार मागच्या बाजूलाच होतं; पण नंतर ते पुढे आलं. १९७० मध्ये लेलँड कंपनीच्या व्हायकिंगच्या सांगाड्यावर साध्या एसटी बसचं डिझाईन साकारलं गेलं. या डिझाईनमध्ये एसटी बसचा दरवाजा हा पुढच्या बाजूला देण्यात आलेला होता. शिवाय बसचं इंजिन हे चाकाच्या पुढे होते. ही अशी इंजिन चाकाच्या पुढे असणारी पहिलीच एसटी होती.

एशियाड हा बराच काळ गाजलेला आणि अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला एसटी बसचा एक खास प्रकार. १९८२ मध्ये दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या. तेव्हा खेळाडूंची ने-आण करण्यासाठी एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत २०० आराम बस बनवल्या होत्या.

स्पर्धा संपल्यानंतर याच बस एसटीने विकत घेतल्या आणि नंतर दादर-पुणे मार्गावर या बस एशियाड बसच्या ब्रॅन्डखाली चालवण्यात आल्या होत्या.

वेळेप्रमाणे नंतर एसटीच्या रचनेत बदल केले; पण एसटीचा लाल रंग आजही ग्रामीण महाराष्ट्राशी नातं सांगतो. गाव तिथे एसटी किंवा रस्ता तिथे एसटी या टॅगलाईनखाली एसटीने संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला जोडून ठेवलंय.

डिसेंबर २००२ मध्ये दादर पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने एसी बस सुरू केल्या. त्यानंतर शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या सेवा सुरू झाल्या. पुढे २०१७ मध्ये शिवशाही बसही सुरू झाली.

योगायोग म्हणजे पहिली एसटी बस ज्या दिवशी धावली होती, त्याच दिवशी बरोबर ७४ वर्षांची इलेक्ट्रिक एसटी बस धावली होती. या बसला शिवाई असं नाव देण्यात आलं. एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवासासाठी ओळखला जातो. आजही एसटी बसचे ड्रायव्हर यांच्याबाबत कमालीच्या कुतूहलाने पाहिलं जातं.

दीड वर्षांपूर्वी अभूतपूर्व संपामुळे महाराष्ट्राही हीच लाईफलाईन ठप्प झाली होती. हजारो कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. ९० हजारपेक्षा जास्त कर्मचारी... त्यांचे पगार.. आणि या सगळ्यांनी एकत्र येत पुकारलेला संप महाराष्ट्राने अनुभवला होता. एसटीचा संप मिटला आणि त्यानंतर सगळ्यांनी निःश्वास सोडला होता. गावखेड्यात आजही शाळेत जायला विद्यार्थ्यांना एसटीशिवाय हक्काचा दुसरा पर्याय नाही.

आता तर सरकारने वृद्धांसाठी आणि महिलांसाठी विशेष योजना सुरू केली. त्यामुळे एसटी बसचे प्रवासी आणखी वाढतील, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. या सगळ्यात अपघात झाल्यानंतर टराटरा फाटणाऱ्या एसटीचे पत्रे, अख्खं जग डिजिटल होत असताना जिथं नेटवर्क नाही तिथे एसटीला जिवंत ठेवण्याचं आव्हान आणि सातत्याने तोट्यात राहिलेल्या एसटीला फायद्यात आणण्याचं चँलेज अजूनही कायम आहे.

एसटी आता आपली ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. ७५ वर्षांत तिच्यात बरेच बदल झाले. आताच्या जगात जिथं खासगीकरणामुळे चांगल्या सेवासुविधा मिळत आहेत, त्या स्पर्धेत एसटीला स्वतःला टिकवण्याचं आणि वाढवण्याचं आव्हान उभं आहे. सरकारी असली, तर प्रायव्हेटपेक्षा जास्त चांगली सेवा, सुसज्ज डेपो, स्वच्छ आणि नीटनेटक्या बस या गोष्टींवरही आता महामंडळाला लक्ष द्यावं लागणार आहे.

एसटीच्या ७५व्या बर्थडेनंतर तिच्या जुन्या झालेल्या गाड्या, गलिच्छ झालेले बाथरुम्स, ड्रायव्हर कंडक्टरला मुक्कामासाठी असलेल्या जागा यातही सुधार व्हावा, अशी अपेक्षा एसटीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस करतोय. त्यावर तोडगा काढल्याशिवाय एसटीला चांगले दिवस येण्याची शक्यता फार नाही, असं खेदानं म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com