सेल रोटी, थेंकुक, फगशापा... (विष्णू मनोहर) 

सेल रोटी, थेंकुक, फगशापा... (विष्णू मनोहर) 

सिक्कीम. निसर्गाचं मुक्त हस्ते वरदान लाभलेलं राज्य. ईशान्येकडच्या या राज्याची खाद्यसंस्कृतीही अनोखी. तिथल्या खाद्यपदार्थांची नावंच पाहा ना! 
सेल रोटी, थेंकुक, फगशापा...यातल्याच काही पदार्थांविषयी आणि त्यांच्या पाककृतींविषयी... 


सिक्कीमच्या इतिहासाला मोठी परंपरा आहे. तो थेट तेराव्या शतकापर्यंत जातो. उत्तर सिक्कीममधील काब लुंगत्सोक लेपचा राजा थेकॉन्ग टेक आणि तिबेटी युवराज ख्ये बूमसा यांच्यात तयार झालेल्या कौटुंबिक संबंधांपर्यंत हे सूत्र जातं. यानंतर सन 1641 मध्ये तिबेटमधल्या लामा संतांनी पश्‍चिम सिक्कीममधल्या युकसान प्रांताचा दौरा केला आणि तिथं त्यांनी खे-हूमसा यांचा सहाव्या पिढीतला वंशज फंत्सोग लामग्याल यांचा सिक्कीमचा पहिला चोग्याल म्हणून राज्यभिषेक केला. अशा प्रकारे सिक्कीममध्ये नामग्याल राजवंशाचा उदय झाला. बदलत्या काळानुसार सिक्कीममध्ये लोकशाहीप्रणाली प्रस्थापित झाली आणि सन 1975 मध्ये तो भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक बनला. सिक्कीममध्ये सर्व धर्मांचे लोक आढळतात व त्यांच्या विचारांमध्येही वेगळेपण असतं. वेगवेगळे विचार असलेले हे लोक सलोख्याचं व सौहार्दाचं वातावरण टिकवून ठेवणारे आहेत. परिणामी, सिक्कीम हे भारतातलं सर्वात शांत राज्य समजलं जातं. 

सिक्कीम हा एक छोटा पर्वतीय प्रदेश आहे. त्याच्या उत्तर दिशेला तिबेटचं पठार, पूर्वेला तिबेटची चुम्बी घाटी आणि भूतान देश, पश्‍चिमेला नेपाळ, तर दक्षिण दिशेला दार्जिलिंग आहे. या राज्याचं एकूण क्षेत्रफळ सात हजार 96 चौरस किलोमीटर आहे. जगातलं तिसरं सर्वांत मोठं उंच शिखर कांचनजंगा हे याच राज्यात आहे. या शिखरामुळे सिक्कीमचं संरक्षण होतं म्हणून तिथले लोक या शिखराला देव मानतात. या राज्यातलं निसर्गसौंदर्य मनोहारी असतं हे सांगायला नकोच. 

सिक्कीम हे कृषिप्रधान राज्य आहे. लोकांचं दैनंदिन जीवन शेतीवरच अवलंबून असतं. मका, तांदूळ, गहू, बटाटा, मोठे वेलदोडे, आलं आणि संत्रे आदींचं उत्पादन इथं घेतलं जातं. मोठ्या वेलदोड्यांचं सर्वाधिक उत्पादन घेणारं हे राज्य आहे. 

सिक्कीममध्ये मुख्यत: भिटिया, लेपचा, आणि नेपाळी समुदायाचे लोक राहतात. संक्रांत, दुर्गापूजा, लक्ष्मीपूजन, दसई, सोनम लोसूंग, नामसूंग, मेन्दोग, हलो रुम फाट (तेन्दोंग पर्वताची पूजा), लोसर (तिबेटी नववर्ष) हे या राज्यातले प्रमुख सण आहेत. 

सिक्कीममधला प्रमुख बौद्ध मठ पेलिंग या ठिकाणी आहे. याव्यतिरिक्त पश्‍चिम सिक्कीममध्ये ताशिंदिंग मठ आहे. युकसोम हा इथला सर्वांत प्राचीन मठ मानला जातो. 

ईशान्येकडच्या या राज्यात जवळपास वर्षभर देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मार्च ते ऑक्‍टोबर या काळात पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. सिक्कीमला गेलात तर तिथल्या "स्ट्रीट फूड'चा व पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. सेल रोटी हा इथला पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ मूळचा नेपाळमधला. पारंपरिक नेपाळी डिशचा प्रकार आपल्याला तिथं चाखायला मिळेल. गोल आकाराचा आणि चवीला गोड असा हा पदार्थ नेहमीच्या पोळीपेक्षा वेगळा असतो. काहीशी फुललेली आणि कुरकुरीत अशी ही पोळी असते. 

इथल्या मुख्य सणांच्या दिवशी सेल रोटी घरोघरी तयार केली जाते. इथल्या छोट्या-मोठ्या हॉटेलांमध्येही ती मिळते. 

थेंकुक हे सूप हा इथल्या "स्ट्रीट फूड'चा एक लोकप्रिय प्रकार. तो हॉटेलांमध्येही उपलब्ध असतो. हा मूळचा तिबेटी खाद्यप्रकार असला तरी तो सिक्कीमध्ये खूप लोकप्रिय आहे. नूडल्स, भाज्या, गहू, मटण, चिकन यांचा वापर करून ते तयार केलं जातं. चवीत बदलासाठी मिरचीही वापरली जाते. अवश्‍य चाखून पाहावा असा हा प्रकार होय. 

थेंकुकप्रमाणेच दुसरं एक सूप म्हणजे "छुरपी सूप.' या पारंपरिक खाद्यप्रकारात कॉटन पनीरचा वापर केला जातो. पर्यटकांमध्ये हे सूप खूप लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्ससाठी वेगवेगळ्या भाज्यांचा वापर यात करतात. 

फगशापा हासुद्धा इथं चवीनं खाल्ला जाणारा आणखी एक खाद्यप्रकार. हा पदार्थ मांसाहारी आहे. पोर्कचा हा मसालेदार पदार्थ मुळा व मिरची यांसह शिजवून केला जातो. इथल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी उपलब्ध असणारा हा प्रकार आहे. भात अथवा पोळी यांबरोबर तो खाल्ला जातो. यात तेलाचा वापर जवळपास नसतोच असं म्हटलं तरी चाले. "प्रोटिनयुक्त डिश' म्हणूनच याच्याकडं पाहिलं जातं. 

थुक्‍पा हा इथला नूडल्स सूपचा प्रकार आहे. हा पदार्थ ठिकठिकाणी मिळतो. पर्यटकांमध्ये थुक्‍पासुद्धा खूप लोकप्रिय आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत ते उपलब्ध असतं. त्या त्या ऋतूंत उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा वापर यात केला जातो. 

1. सेल रोटी 
साहित्य :- तांदूळ : 1 वाटी , तूप : अर्धी वाटी, पिठी साखर : अर्धी वाटी, वेलदोडेपूड : 1 चमचा, मीठ : चवीनुसार, तळण्यासाठी तेल. 
कृती :- तांदूळ आदल्या दिवशी भिजत ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळाचं सगळं पाणी काढून टाकावं आणि तो मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावा. नंतर तांदळाच्या मिश्रणात तूप, वेलदोडेपूड, पिठी साखर, मीठ घालून मिश्रण चांगलं मळून घ्यावं. मिश्रणाचे छोटे छोटे मोळे करून त्यांच्या पोळ्या लाटाव्यात. मंद आचेवर एका भांड्यात तेल गरम करून त्यात तयार पोळ्या व्यवस्थित तळून घ्याव्यात. 

2. स्टफ क्रॅब (खेकडा) 
साहित्य :- खेकड्यांतलं मांस : पाव किलो, तेल : 5 चमचे , मोहरी : 1 चमचा, बडीशेप : 1 चमचा , कांदे चिरलेले : दोन चमचे, आलं किसलेलं : दोन चमचे, तिखट : चार चमचे, चिरलेला मध्यम टोमॅटो : 1, कढीलिंबाची पानं : 8-10, पातीचा कांदे : तीन, मिरीचे दाणे : दोन चमचे, अर्ध्या लिबांचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर : चार चमचे, मीठ. 
कृती :- कवचं काढून मग खेकड्यांतलं मांस काढून घ्यावं. कवचं स्वच्छ धुऊन ठेवावीत. फोडणीसाठी कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी आणि बडीशेप परतून घ्यावी. त्यात चिरलेले कांदे घालून गुलाबी रंगावर परतावेत. त्यात आलं आणि तिखट घालून मिनिटभर परतावं. टोमॅटो घालावा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत साधारणत: पाच मिनिटं परतावं. त्यात कढीलिंबाची पानं, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि कुटलेले मिरे घालून मिनिटभर परतल्यावर गॅस मंद करावा आणि कढईत खेकड्यांचं मांस व लिंबाचा रस घालावा. सर्वात शेवटी मीठ हवं असल्यास घालावं. या मिश्रणात थोडी कोथिंबीरही घालावी आणि हे मिश्रण खेकड्यांच्या धुतलेल्या कवचांमध्ये घालून वाढावं. वाढताना उरलेली कोथिंबीर घालावी. 

3. व्हेज नूडल्स सूप 
साहित्य :- नूडल्सचा चुरा : 1 वाटी, चिरलेला लसूण : 1 चमचा, फ्लॉवर : अर्धी वाटी, स्वीटकॉर्न : अर्धी वाटी, गाजर : अर्धी वाटी, काळी मिरपूड : 1 चमचा, मीठ : चवीनुसार, लिंबाचा रस : अर्धा चमचा, व्हिनेगर : 1 चमचा, कांद्याची पात : पाव वाटी. 
कृती :- वाटी नूडल्सचा चुरा धुऊन घ्यावा. नंतर अर्धा लिटर पाण्यात हे नूडल्स उकळून घ्यावेत. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण, फ्लॉवर, गाजर, स्वीटकॉर्नचे दाणे, काळी मिरपूड, मीठ, अर्ध्या लिबांचा रस किंवा व्हिनेगर घालून हे सगळं उकळून घ्यावं. बारीक चिरलेली कांद्याची पात घालून खायला द्यावं. 

खिमा नूडल्स सूप 
साहित्य :- चिकनचा खिमा : पाव वाटी, तेल : 2 चमचे, मीठ : चवीनुसार, मीरपूड : 1 चमचा, मश्रूम : 1 वाटी, गाजर :1 वाटी, फ्लॉवर : 1 वाटी, अजिनोमोटो : 1 चमचा, चिकन स्टॉक : 4-5 वाट्या, कॉर्नफ्लॉवर : 2 चमचे, अंडं :1, उकडलेले नूडल्स : अर्धी वाटी, कोथिंबीर : 2 चमचे. 
कृती :- भांड्यात तेल गरम करून त्यात चिकनचा खिमा परतून घ्यावा. नंतर मीठ व मिरपूड घालून शिजवावा. नंतर त्यावर बारीक चिरलेलं मश्रूम, गाजर, फ्लॉवर घालून हे मिश्रण एकसारखं परतत राहावं. अधूनमधून मीठ, मिरपूड व अजिनोमोटो घालून 4-5 वाट्या चिकनचा स्टॉक घालावा. मिश्रणाला उकळी येताच आवश्‍यकतेनुसार कॉर्नफ्लोवर घालून सूप दाट करावं. फेटलेल्या अंड्याची बारीक धार सोडून ते "सेट' करावं. अंड्याचं मिश्रण "सेट' झालं की त्यात उकडलेले नूडल्स, कोथिंबीर घालून खायला द्यावं. 

बोनलेस मटण नूडल्स 
साहित्य :- बोनलेस मटण : 200 ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा : 100 ग्रॅम, बारीक चिरलेलं आलं-लसूण : एकेक चमचा, नारळाचं दूध : अर्धा कप, लाल मिरच्यांचं वाटण : 1 चमचा, राईस नूडल्स : 100 ग्रॅम, तेल 50 : ग्रॅम, मीठ : चवीनुसार, मिरपूड : अर्धा चमचा. 
कृती :- मटणाचे लांबट पातळ तुकडे करून घ्यावेत. राईस नूडल्स शिजवून घ्यावेत. तेल तापवून त्यात आलं, लसूण, कांदा, मिरचीचं वाटण घालावं. खूप वेळ परतावं. नंतर त्यात मटणाचे तुकडे, मीठ, मिरपूड घालावी. मटण पूर्ण शिजेपर्यंत मंद आंचेवर परतत राहावं. मग त्यात राईस नूडल्स घालावेत. हे मिश्रण ढवळण्याऐवजी पातेलं हाडसून मटण व नूडल्स एकत्र करावेत. सर्वात शेवटी नारळाचं दूध घालून एक उकळी येऊ द्यावी. गरमागरम खायला द्यावं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com