

Sister Midnight Movie Analysis
esakal
‘सिस्टर मिडनाइट’मध्ये लैंगिकता ही आनंदाची किंवा रोमँटिक अनुभूती नाही. ती एक जबाबदारी, एक कर्तव्य आणि कधी कधी एक हिंसक प्रक्रिया आहे; मात्र ही हिंसा दृश्य स्वरूपात दाखवली जात नाही. ती सूचित केली जाते, कारण इथे स्त्रीवर होणारी हिंसा ही अपवाद नसून ती सामाजिक नियमाचा भाग आहे, असं सिनेमा सांगतो.
करण कंधारी दिग्दर्शित ‘सिस्टर मिडनाइट’ हा सिनेमा पाहताना पहिल्याच काही मिनिटांत जाणवतं, की ही नुसती एका जोडप्याची ‘लग्नानंतरची कथा’ नाही, तर लग्नसंस्थेवर टाकलेला एक अस्वस्थ, तीव्र कटाक्षही आहे. राधिका आपटे अभिनित मध्यवर्ती व्यक्तिरेखा फारच फटकळपणे, कुठल्याही पार्श्वभूमीशिवाय, (प्रेक्षकाच्या) कोणत्याही भावनिक तयारीविना आपल्यासमोर येते. विवाह हा इथे प्रेमाचा, सहजीवनाचा किंवा सामाजिक सुरक्षिततेचा उत्सव नाही; तर तो एक व्यवस्थात्मक करार आहे. या करारात स्त्रीचा देह, तिच्या इच्छा आणि तिची मौनसंमती या साऱ्या बाबी गृहीत धरल्या जातात.