बाईपण दुर्दैवी देवाऽऽ

दांभिकपणाच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या ग्रामीण भागातील एका अशिक्षित स्त्रीची कहाणी म्हणजे ‘मुडकं कुंपण’ ही कादंबरी.
Book Mudak Kupan
Book Mudak Kupansakal

दांभिकपणाच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या ग्रामीण भागातील एका अशिक्षित स्त्रीची कहाणी म्हणजे ‘मुडकं कुंपण’ ही कादंबरी. हातावरचं पोट असणाऱ्या अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या रंभाची काळीज पिळवटून टाकणारी ही कहाणी आहे. ग्रामीण भागातील चालीरिती, गरिबीची व्यथा, बाईच्या चारित्र्याचं अवडंबर माजविणाऱ्या, तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्या समाजाच्या हीन वृत्तीवर लेखकानं यामध्ये प्रकाश टाकला आहे.

प्रवाही लेखन, वास्तववादी मांडणी, प्रसंग फुलवण्याचं कसब, कासावीस करणारा वेदनेचा हुंकार आणि अहिराणी भाषेचा मुक्त वापर ही या कादंबरीची वैशिष्ट्यं आहेत. तलाववाडीत आई-वडिलांच्या घरी गुरं सांभाळून उदरनिर्वाह करणारी, तारुण्यात पाय घसरला म्हणून समाजाने दिलेली हीन वागणूक, लग्न ठरण्यात आणलेल्या अडचणी, अर्धवट नवऱ्याबरोबर संसाराचा गाडा रेटणारी, तिच्या व्यथा-वेदनांची, न संपणाऱ्या भोगांची, मनातल्या उलाघालीची, संघर्षाची अन् आशावादाची ही कहाणी वाचकांच्या मनावर दीर्घकाळ रेंगाळते.

रंभाच्या बालपणापासून ते तिची मुलं मोठी होईपर्यंतचा प्रवास लेखकानं मोठ्या ताकदीनं यात रेखाटला आहे. कादंबरी वाचायला सुरवात केल्यानंतर वाचक त्यात अडकून पडतो आणि कळत-नकळत तिच्या संघर्षात अडकून पडतो. यात ग्रामीण भागातील बाईपण किती अवघड आहे, याची जाणीव त्याला झाल्याशिवाय राहत नाही.

रंभाला चारभिंतीच्या शाळेत गोडी वाटत नसल्यानं तिचं शिक्षण अर्धवट राहतं. ती गुरं सांभाळून उदरनिर्वाह करत असते. मात्र, ऐन तारुण्यात तिचा पाय घसरतो अन् तिथूनच तिच्या दुर्दैवाला सुरवात होते. लेखकाच्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर ‘‘काटेरी झुडपांच्या फांदीत अडकलेला आपला पदर रंभीनं कसाबसा सोडवला खरा; पण तिच्या पदराला काटेरी फांदीचा खोसा लागला तो कायमचाच. त्या खोशानं रंभीच्या आयुष्याचं मातेरं केलं.’

पाटलाच्या भुशाच्या आणि तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गावातच काय पण परिसरातील गावांतही पसरली आणि त्यामुळं तिचं लग्नच ठरेना. दुसरीकडं भुशाच्या आयुष्यात कसलाही फरक पडला नाही. त्याचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. मात्र, सगळं बाई म्हणून रंभाला भोगावं लागलं. पांढुर्लीतील एका वेडसर आणि मोलमजुरी करणाऱ्या तरुणाबरोबर तिचं लग्न झालं. मात्र, तिच्या दुर्दैवाचे दशावतार काही कमी झाली नाहीत.

माहेरातलं चुकीचं लेबल सासरीही लागलं होतं. यावरून अनेकजणी तिचा पाणउतारा करीत होत्या. तिला अनेकदा हे असह्य व्हायचं, तरीपण आई-वडिलांच्या जिवाला घोर लागू नये म्हणून ती रेटून नेत होती. असा या कादंबरीचा विषय आहे. यामध्ये लेखकानं रंभाच्या आयुष्यातील चढ-उतार उत्तम रेखाटले आहेत. त्याचबरोबर अनेक प्रसंग खुबीने फुलवले आहेत.

वाचकांचा विरस होणार नाही, तो गुंतून राहील, याची काळजी घेतलेली आहे. रंभाचा मुलगा लग्नाचा झाल्यानंतर त्याला स्थळं येतात. त्यावेळी ती हरिबाला म्हणते, ‘‘माझ्याविषयी त्यांना माहिती आहे ना? नंतर काही अडचण नको.’’ त्यावर हरिबा म्हणतो, ‘‘बी चांगलं हायेनं मग माटीचा कोन इचार करतं.’’ त्याचं बोलणं ऐकून, रंभा मात्र अस्वस्थ होते आणि घाम पुसत चरफडतच संतापते. महिलेकडं पाहण्याचा समाजाचा काय दृष्टिकोन आहे, हे एका वाक्यात लेखकानं मांडलं आहे.

मोडलेल्या कुंपणाचा जसा पिकांच्या रक्षणासाठी काही उपयोग होत नसतो, तसाच हतबल आई-वडील व वेडपट नवऱ्याचा बाईलाही फारसा उपयोग नसतो, हे ‘मुडकं कुंपण’ या रूपकातून लेखकानं दाखवलं आहे. ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक मात्र अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाहीत, एवढं नक्की.

पुस्तक : मुडकं कुंपण

लेखक : रवींद्र पांढरे

प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (०२०) २४४८०६८६

पृष्ठं : १०६

मूल्य : १६० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com