योग्य खा, रोज व्यायाम करा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री
खूप जास्त वर्कआऊट आणि खूप जास्त डाएट करण्याऐवजी दोन्हींचा सुवर्णमध्य मी गाठते आणि हाच माझा फिटनेस मंत्र आहे. योग्य प्रमाणात व्यायाम, योगासने आणि डाएट यांमुळे मी स्वतःला फिट ठेवू शकते. मी माझ्या जेवणात साखर पूर्णपणे टाळते. चॉकलेट आणि पिझ्झा मला आवडतात आणि ते मी खाते. पिझ्झा खायची इच्छा होते तेव्हा मी चांगले हॉटेल गाठते, जिथे आपल्या आवडीप्रमाणे भाज्या निवडून खाली गव्हाचा पातळ ब्रेड मिळतो. तुमच्या आवडीमध्येही तुम्हाला योग्य डाएट करता आल्यास ती आवडही जोपासता येते. मी पाणी भरपूर प्रमाणात पिते. माझ्या दिवसाची सुरवात कोमट पाणी आणि मध किंवा लिंबासोबत होते.

त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये उकडलेले अंडे, ताजी फळे आणि ग्रीन टी घेते. दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस आणि खूप प्रमाणात सलाड खाते. रात्रीचे जेवण खूप हलके खाते आणि शक्‍यतो भूक असल्यासच खाते. वर्कआऊट करून आल्यानंतर प्रोटिन शेक घेते. 

मी सकाळी ७ वाजता उठते. उठल्यानंतर मी योगासन व स्ट्रेचिंग करते. स्टॅमिना वाढविण्यासाठी कार्डिओ करते, तसेच लाइट वेट ट्रेनिंगही घेते. व्यायामासाठी मला डान्स करायलाही आवडतो. आठवड्यातून तीनदा मी धावते आणि स्वीमिंग करते. योग्य खा, योग्य झोप घ्या, आणि रोज व्यायाम करा हेच खरेतर निरोगी राहण्याचे रहस्य आहे. केस आणि त्वचेसाठी योग्य उत्पादने वापरल्यास त्यांचेही आरोग्य चांगले राहते. 

योगासने हा माझा आवडता प्रकार आहे. माझ्या फिटनेसमध्ये स्विमिंगपासून योगासने, कपालभाती अशा सर्वांचा समावेश असल्याने मला फिट राहण्यास मदत होते. मी ध्यान आणि प्राणायमालादेखील तेवढेच महत्त्व देते. ध्यानामुळे मनाला शांती मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit jacklin fernandes maitrin supplement sakal pune today