आठवड्यात तीनदा योगासने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लीम फिट - जान्हवी कपूर, अभिनेत्री
फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच मी माझ्या शरीरावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. तेव्हापासूनच मी माझे शरीर फिट ठेवायला सुरवात केली. मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यायला आवडते आणि मी माझ्या आरोग्याविषयीही नेहमीच सतर्क असते. यामुळे मी कधीही जिम चुकवत नाही. यासाठी मी एक पर्सनल ट्रेनर घेतला आहे, जो मला फिट राहण्यास मदत करतो. मी कार्डिओ आणि वेट लिफ्टिंग करते. जिमला जाता न आल्यास मी जॉगिंग किंवा स्विमिंगला जाते. काहीच करता आले नाही, तर घरातल्या घरात उड्या मारते. 

योगासने माझ्या फिटनेसचा अविभाज्य भाग आहे. आठवड्यातून तीन वेळा मला योगासने करायला आवडते. योगासने आपल्याला असलेला मानसिक तसेच शारीरिक ताण कमी करतात, शांत राहण्यास मदत करतात. यामुळे मी योगासने करण्याला खूप महत्त्व देते. याबरोबर खाण्याचेही नियम पाळणे आवश्‍यक असते. त्यासाठी मी डाएटही करते, पण मी कुठलेच स्ट्रिक्ट डाएट करत नाही, मी फक्त हेल्दी खाण्यावर भर देते. 

मी दिवसातून किमान १० ग्लास पाणी पिते, यामुळे शरीर चांगले राहते. मी दिवसातून तीन वेळा खाते. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी ज्यूस, टोस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग खाते. त्याचबरोबर कडधान्य आणि दूध घेते. माझा सकाळचा नाश्‍ता जास्त असतो. तुलनेत दुपारचे जेवण कमी असते. दुपारच्या जेवणात मला घरगुती जेवण लागते. यामध्ये मला ब्राऊन राइस खायला आवडतो. सोबत चिकन सॅण्डविच, सलाड, शेंगा खाते. कामात खूपच व्यग्र असल्यास फळे खाते किंवा ज्यूस पिते. रात्रीचे जेवण मी बेडवर जाण्यापूर्वी तीन तास आधी घेते. हा आहार हलका असण्याकडे कटाक्ष देते. यामध्ये भाज्यांचे सूप, वरण किंवा उकडलेल्या भाज्या, हिरव्या भाज्या आणि भाजलेले मासे खाते. मी गोड व जंकफूड खाणे पूर्णपणे टाळते. माझी सकाळची सुरवातच काही ग्लास पाणी पिऊन होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit janhvi kapoor maitrin supplement sakal pune today