जोखडातून मुक्ती (स्नेहल क्षत्रिय)

स्नेहल क्षत्रिय kshatriyasnehal09@gmail.com
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा त्यातून येणारा तणाव या चक्रातून हल्लीच्या अनेक तरुण-तरुणींना जावं लागतं. कामातला आनंद कसा मिळवायचा, या जोखडातून मुक्ती कशी मिळवायची, मार्ग कसा काढायचा, स्वतःचा शोध कसा घ्यायचा असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडत असतात. याच विषयावर दिलखुलास भाष्य करणाऱ्या "बॉर्न फ्री' या लघुपटाविषयी...

नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा त्यातून येणारा तणाव या चक्रातून हल्लीच्या अनेक तरुण-तरुणींना जावं लागतं. कामातला आनंद कसा मिळवायचा, या जोखडातून मुक्ती कशी मिळवायची, मार्ग कसा काढायचा, स्वतःचा शोध कसा घ्यायचा असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडत असतात. याच विषयावर दिलखुलास भाष्य करणाऱ्या "बॉर्न फ्री' या लघुपटाविषयी...

आजच्या स्पर्धेच्या युगातल्या बऱ्याच भारतीय तरुण-तरुणींची व्यथा म्हणजे नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा समजा क्षेत्र आवडतं असलं, तरीही त्यातलं राजकारण, जीवघेणी स्पर्धा यांचा मनावर येणारा तणाव. भविष्य सुरक्षित करताना आपल्या पॅशनकडं मन मारत करावं लागणारं दुर्लक्ष अधूनमधून काही तरी हरवल्याची भावना जिवंत करतं. जगण्यासाठी पैसा गरजेचा असतोच; परंतु त्यासाठी आपण करत असलेली धावपळ आपल्याकडून महत्त्वाचं असं काही हिरावतेय का? आयुष्यातले लहानसहान क्षण साजरे करताना डोक्‍यात सतत कामाच्या ठिकाणी असलेला तणाव डोळ्यासमोर उभा राहतो का? स्वातंत्र्य हरवलं आहे, की आपण स्वतः नको त्या बंधनात स्वतःला बांधून ठेवतोय?... असे नानाविध विचार तरुणाच्या मनात अक्षरशः थैमान घालत असतात. आपण करत असलेलं काम अचानक सोडण्याची तयारी बहुतांशी तरुणांची होत नसते. ते गैर नाहीच; परंतु त्यातून आनंद देणारा एखादा मार्ग काढणं इतकं अवघड नसतं. याच सगळ्याविषयी अतिशय दिलखुलासपणे भाष्य करणारा हा लघुपट म्हणजे "बॉर्न फ्री.' ज्या क्षणी आपण एखादं काम करतो, तेव्हा इतर गोष्टींबरोबर स्वतःला, स्वतःच्याच मोकळ्या नजरेतून बघण्यासाठी निश्‍चितच प्रवृत्त करणारा हा लघुपट. कधीतरी आपण अंतर्मुख व्हावं, स्वतःला प्रश्न विचारावेत, इतरांशी संवाद साधावा, नकळतपणे त्यातून अनोखा मार्ग निघावा अन्‌ आपलं एक फुलपाखरू व्हावं, अशी काहीशी अवस्था करून देणारा हा "बॉर्न फ्री.' लघुपटाचा शेवट सोडला, तर धक्का देणारी विशेष बाब लघुपटात नाही. मात्र, त्यातले संवाद मन अगदी प्रफुल्लित करून टाकतात. एक विशिष्ट वेग न पकडता, अलवारपणे अंतर्मनाचे एकेक कप्पे उलगडत जाणारा हा लघुपट आपल्याला स्वतःच्याच मनाच्या एका अशा कोपऱ्यापाशी आणून सोडतो, जिथं अजूनही काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी शिल्लक आहे, हे जाणवतं. शिवाय पैसे कमावताना "कितपत समाधान मिळतंय?' असे प्रश्न स्वतःला एकदा विचारावेसे वाटतात. "आपलं नशीब घडवणं आपल्याच हातात असतं,' या वाक्‍याची प्रचिती देणारा, सुशांत बालिगा दिग्दर्शित आणि संदीप बालन लिखित हा एक उत्तम हिंदी लघुपट आहे.

समर्थ (सुमित व्यास) हा खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत असलेला तरुण. सेवानिवृत्त झालेले शर्माजी (अतुल श्रीवास्तव) म्हणजे उत्साही व्यक्तिमत्त्व. ट्रॅव्हल ब्लॉगर वान्या शर्मा (मुक्ती मोहन) ही स्वतःच्या अटींवर जगणारी अन्‌ आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणारी. हे तीन सहप्रवासी गोव्याच्या फ्लाईटमध्ये भेटतात आणि तिथून सुरू होतो प्रवास अनोख्या कथेचा. कॉर्पोरेट क्षेत्रातला समर्थ अतिशय मेहनती, हुशार, बॉस विक्रमचा (करीम हाजी) आवडता आणि इमानेइतबारे काम करणारा तरुण. त्यानं त्याच्या ध्येयांची एक शिडी तयार केली आहे- जिच्यावरून तो अगदी प्रामाणिकपणानं चढू पाहतोय. आयुष्याच्या बहुतांशी टप्प्यावर तो ध्येय साध्य करण्यात यशस्वीही झाला आहे आणि या गोष्टीची त्याला जाणीव आहे. फ्लाईटमध्ये कंपनीच्या नव्या प्रॉडक्‍ट लॉंचिंगसाठीचं प्रेझेंटेशन तयार करण्यात त्यानं स्वतःला अगदी झोकून दिलं आहे. दरम्यान, शर्माजी सहप्रवासी या नात्यानं ओळख होण्याच्या दृष्टीनं त्याला आणि वान्याला विविध प्रश्न विचारत भंडावून सोडतात. गोव्याला काम करायला जाणं म्हणजे एक अक्षरशः "गुन्हा' असतानादेखील समर्थचं कामाप्रती असलेलं समर्पण पाहून शर्माजी आणि वान्या दोघंही चकित होतात. तीन अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्वं एकत्र प्रवास करतात, तेव्हा होणाऱ्या गमतीजमती, विचारांची देवाणघेवाण हे लघुपटाच्या सुरवातीला एक वेगळं वातावरण तयार करतात. या वातावरणनिर्मितीमध्ये शर्माजींची विनोदबुद्धी भाव खाऊन जाते. शर्माजी समर्थला अन वान्याला अधूनमधून काही तत्त्वज्ञान ऐकवतात. "जगणंच विसरून जावं, इतकंही काम आयुष्यात करू नये,' असं ते सांगतात. सकारात्मक व्यक्तिमत्त्व असलेली वान्या इथं त्यांच्या मताला सहमत असलेली दिसते. गोव्यात पोचल्यानंतर समर्थ आणि वान्याची मैत्री फुलताना दिसते. वान्या ट्रॅव्हल ब्लॉगर आणि स्वतंत्ररित्या काम करणारी असल्यानं कॉर्पोरेट क्षेत्रात असलेला तणाव समर्थच्या चेहऱ्यावरून अगदी सहज टिपते. गप्पा मारत असताना, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी वेगवेगळे संदर्भ देऊन एकमेकांच्या पूर्वायुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी त्यांच्यात चर्चा होत जाते आणि इथून कथा अगदी अलगद एका वेगळ्या वळणावर जाऊन पोचते.

शेवटी नेमकं काय घडतं, हे लघुपट पाहिल्यावर त्याचा निष्कर्ष काढणं उचित ठरेल.
वान्याचं समर्थच्या आयुष्यात येणं त्याच्या आयुष्याला काही वळण देतं का, हे बघण्यासाठी हा लघुपट आवर्जून पाहायला हवा. कथेत कोणताही सस्पेन्स नसतानासुद्धा, लघुपट पाहताना एक सुंदर अनुभूती येत जाते. मनाविरुद्ध असलेली गोष्ट करताना होत असलेलं दुःख आणि आवडती गोष्ट करण्याची संधी मिळताच आयुष्यचं झालेलं सोनं, ही कथेची बेसलाईन आहे. सुमित व्यासची व्यक्तिरेखा काही अंशी गंभीर असली, तरी बहुतांशी तरुण स्वतःला त्या व्यक्तिरेखेशी अगदी सहज रिलेट करू शकतील. मुक्तीचा स्क्रीनवरचा एकूण वावर अगदी धीट असल्याचं जाणवतं. तिचा अभिनय म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच. अगदी सहज, साधा अन उत्कृष्ट अभिनय. अतुल शर्मा आणि करीम हाजी असे इतर सहकलाकार अगदी कमी वेळात व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसवतात. संवाद अतिशय साधे, सोपे, संवेदशील आहेत आणि काही तितकेच विनोदी असल्यानं भावभावनांचं संमिश्र रूप पाहायला मिळतं. त्यांच्यात कुठलाही अभिनिवेश आणि उदात्तीकरण दिसत नाही. चित्रीकरण अतिशय नैसर्गिक असून, ते पाहताना त्यात आपण गुंतत जातो. प्रॉडक्‍शन टीमचं वर्क अमेझिंग आहे.

सुशांत बालिगानं केलेलं दिग्दर्शन कथेला आणि कलाकारांच्या अभिनयाला पूर्णत्वास नेतं. दिग्दर्शन करताना सुशांतनं विविध नाट्यमय पैलू जपत पटकथेची कलात्मकता राखली आहे, असं म्हणणं निश्‍चितच वावगं ठरणार नाही. चाळीस मिनिटांचा हा लघुपट प्रेरणादायी असून, एक नितांतसुंदर अनुभूती देणारा आहे.

Web Title: snehal kshatriya write article in saptarang