नव्याने रुजू झालेल्या सोशल मीडियाचे मॉडर्न शिष्टाचार

social-media-
social-media-

आपल्या सगळ्यांनाच स्वतःवर कौतुकाचा वर्षाव झालेला प्रचंड सुखावह वाटतो. याला तुम्ही, मी किंवा इतर कुणीही अपवाद नाही. हल्ली ही चैन मिळवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आपले लाडके सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस. त्यात आपण सगळे लॉकडाउनमध्ये असल्यामुळे तर सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन करमणुकीचा एक महत्त्वाचा घटक झाला आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक नव-नव्या ट्रेंड्‌सनी या सोशल मीडियावर थैमान घातलंय. साडी नेसलेला फोटो पोस्ट करण्यापासून ते थेट ऑनलाइन अंत्याक्षरी खेळणे आणि असंख्य प्रकारचे डाल्गोना कॉफीचे फोटोज शेअर करणे. या सगळ्या-सगळ्याचे आपण केवळ साक्षीदारच नाही तर सहभागीसुद्धा आहोत.
अनेक कलाकारांनी या काळात व्यवसाय ठप्प झाला तरी धीर नं सोडता सोशल मीडियावर आपल्या कलाकृती समस्त रसिकांसाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी नावाजलेले कलाकारही याला अपवाद नाहीत. कवी, गायक, वादक, लेखक, मुक्तहस्ताने आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी नियमितपणे आपल्यापर्यंत पोहोचवताहेत आणि असं का असू नये? रंगमंचानंतर इतके रसिक प्रेक्षक एका ठिकाणी दाखवणारं दुसरं माध्यम तरी कोणतं? काही प्रथितयश कलाकारांबरोबर काही नवखे कलाकारही उदयाला आले आहेत. अनेकांनी वेळ मिळाला म्हणून किंवा इतरांचं बघून उत्साह वाढला म्हणून स्वतःचे सादरीकरण आपल्याबरोबर शेअर केले आहे. मला वाटतं जीवनावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांच्या यादीत या सगळ्या कलाकारांनाही स्थान देऊन त्यांचा गौरव करायला हवा. त्यांच्याशिवाय आपल्या सोशल मीडिया वॉलला आणि पर्यायाने आपल्या सध्याच्या अत्यंत निरस आयुष्याला रंगत कशी येणार?
एका बाजूला अनेक मंडळी या कठीण काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मकता जपण्याचा प्रयत्न करत असले तरी याच सोशल मीडियावर वैताग आणणारे पण अनेक लोक आहेत हे सांगायला नकोच. राजकारणावर चर्चेपेक्षा भांडण करणारे; स्वतःचा विज्ञान शाखेशी काडीचाही संबंध नसताना सरकार, डॉक्‍टर्स आणि वैज्ञानिकांना "ही परिस्थिती कशी हाताळावी' यावर सल्ले देणारे; आपण यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही, आपल्या देशाचं काही खरं नाही अशी नकारात्मकता पसरवणारे; या सगळ्यांपासून लांब राहणच बरं. पण, अशा व्यक्तींबरोबरच मला स्वतःला आणखी एका प्रकारच्या व्यक्तींचा वीट आलाय. ते म्हणजे या लॉकडाउनला एखाद्या उत्सवासारखं साजरं करून, दिवस रात्र विविध खाद्य पदार्थांचे फोटोज शेअर करणारे लोक.
हो, मला अगदी मान्य आहे की घरी, मेहनतीने बनवलेले पदार्थ इतरांना सांगावे, मित्र-मैत्रिणींना दाखवावे हे आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. या क्षेत्रात काम करणारी अनेक प्रथितयश मंडळी नवनवीन पदार्थांचे व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध करून देताहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण ते पदार्थ घरी बनवतो हे उत्तमच आहे. पण, केलेला प्रत्येक पदार्थ अगदी कुळाचार असल्याप्रमाणे आधी शेअर करायचा आणि मगच खायचा असं बंधन कुठे आहे?
आपल्यापैकी अनेक या मताशी असहमत असतील तरीही मी हे बोलण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याच समाजातल्या मजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांची अत्यंत क्‍लेशदायक परिस्थिती. दोन बोचकी आणि दोन मुलं कडेवर घेऊन रणरणत्या उन्हात गावाकडे पायी निघालेल्या आपल्याच समाजातल्या बांधवांना विसरून कसं चालेल?
आज एकीकडे भुसावळला जाताना रेल्वे रुळावर 19 मजुरांचा झालेला भयावह अंत आणि दुसरीकडे "आजच्या लॉकडाउनचा खास बेत' हे वाचताना यातना झाल्या. हा विरोधाभास समाजात आहे हे नाकारता येणार नाही पण ईश्वराच्या कृपेने आपल्यासारखी मंडळी खाऊन पिऊन सुखी असताना कोणालातरी एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. कोणीतरी आपल्यासारखे राजेशाही किंवा महागड्या हॉटेलात मिळणारे कॉन्टिनेन्टल पदार्थ बनवू शकत नाही आणि म्हणून कदाचित आपली पोस्ट बघून दुःखी होऊ शकतो का? हा विचार तरी नक्कीच व्हायला हवा. प्रत्येकाने त्याच्या कुवतीप्रमाणे जगावं, घरी हवं ते करावं, हे स्वातंत्र्य मान्य आहेच ना! पण ते शेअर करायचं माध्यम इतकं सोशल असणं आवश्‍यक नाही हेदेखील तेवढंच खरं आहे. शेवटी काय, तर मी राहत असलेल्या समाजात मला शक्‍य तेवढ्या लोकांना मी उपाशी राहू देणार नाही हा विचार करणं जशी आपली संस्कृती शिकवते. तसंच मी सोशल मीडियावर काहीतरी शेअर करीत असताना इतर कुणाच्या भुकेची चेष्टा होणार नाही याची काळजी घेणं हे नव्याने रुजू झालेले सोशल मीडिया शिष्टाचार शिकवतात. नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com