सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विश्‍वासार्हता वापरकर्ते ठरवतील!

यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर एरवी ज्या त्या विषयांभोवती बोलणारे-लिहिणारे चेहरे एकदम ‘अटल सेतू’च्या प्रेमात पडले होते.
social media influencer credibility users decide
social media influencer credibility users decideSakal

अरबी समुद्रातून जाणारा आणि मुंबई-पनवेल जोडणारा ‘अटल सेतू’ जानेवारीत सुरू झाला, तेव्हाची गोष्ट. एरवी ‘फूड’, ‘एन्टरटेन्मेंट’, ‘फिटनेस’ अशा विषयांच्या भोवती व्हिडिओमाध्यमातून समोर येणारे चेहरे ‘ ‘अटल सेतू’ किती महत्त्वाचा आहे,’ हे सांगायला लागले.

माहिती उपयुक्त होतीच. म्हणजे, पुलाची लांबी २१.८ किलोमीटर आहे, सहा लेन आहेत वगैरे. पुलाच्या निर्मितीचा इतिहास त्यानिमित्त मांडला गेला. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर एरवी ज्या त्या विषयांभोवती बोलणारे-लिहिणारे चेहरे एकदम ‘अटल सेतू’च्या प्रेमात पडले होते. त्यांच्या माध्यमातून ‘अटल सेतू’ कोट्यवधी जनतेपर्यंत पोहोचला...

‘अटल सेतू’बद्दल बोलणारे, लिहिणारे चेहरे लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाही दिसले. राजकीय नेत्यांसमवेत. हा नेता डाएट कसं राखतो, तो नेता कोणते चित्रपट पाहतो, अमुक नेता कुठलं पुस्तक वाचतो वगैरे माहिती घेऊन हे चेहरे समोर आले.

नेत्यांबरोबर त्यांनी कधी शॉपिंग केलं...कधी पाणीपुरी खाल्ली...घरात, बागेत, प्रचाराच्या रॅलीतही वेळ काढून नेते या चेहऱ्यांशी गप्पा मारताना दिसले. हंगाम निवडणुकीचा असला तरी, नेत्यांबरोबरच्या त्यांच्या गप्पा फक्त राजकीय नव्हत्या. राजकीय वातावरणात राजकारणाबाहेरच्या विषयांतून नेत्यांची न दिसलेली बाजू लाखो लोकांसमोर मांडली गेली.

भारतातल्या यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीतला हा आशय नावीन्यपूर्ण होता. कल्पक होता. या स्वरूपाच्या आशयाची विपुल निर्मिती होणारी ही पहिलीच निवडणूक होती. अशा स्वरूपाच्या आशयाच्या निर्मितीतले चेहरे राजकारणाबाहेरचे म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या आशयनिर्मितीत एरवीच्या विषयांमध्ये राजकारणाचा समावेश नव्हता. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर त्यांच्या ‘हट के’ आशयाला वापरकर्त्यांचा प्रतिसाद होता. त्यांच्या विषयांभोवती लाखो वापरकर्त्यांचं मोहोळ जमा झालं होतं.

या साऱ्या वापरकर्त्यांसमोर गेल्या पाच महिन्यांत या चेहऱ्यांनी कधी ‘अटल सेतू’ मांडला, तर कधी एखादा नेता सादर केला, तर कधी एखाद्या पक्षाचं धोरण मांडलं. विशिष्ट विषयांभोवती जमलेल्या वापरकर्त्यांसाठी हे असे अचानक टपकलेले विषय म्हणजे कधी ‘आश्चर्य’ होतं, कधी ‘आनंद’ होता, तर कधी ‘संताप’ही होता. हा सारा प्रकार होता इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा मार्केटिंगचा प्रकार अस्तित्वात येऊन दशक होत आलं आहे. आता हा प्रकार स्थिरावू पाहतो आहे. भारतात विशेषतः २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला व्यावसायिक स्वरूप यायला सुरुवात झाली.

यंदाची लोकसभेची निवडणूक हे या व्यावसायिकतेच्या प्रवासातलं महत्त्वाचं पाऊल ठरलं. ‘यांनी असं करावं की करू नये,’ हा मुद्दा तूर्त बाजूला ठेवू. एका सर्वस्वी नव्या कौशल्याला मिळत असलेली व्यावसायिक मान्यता या दृष्टिकोनातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या व्यवसायाकडं पाहिलं तर गेल्या पाच महिन्यांतला या चेहऱ्यांचा सर्व क्षेत्रांतला वाढता वावर लक्षात येईल.

भारतात २०१७ पासून विलक्षण वेगानं विस्तारलेल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळं समाजमाध्यमांचा, म्हणजेच सोशल मीडियाचा, वापर वाढला. समाजमाध्यमांवर विशिष्ट विषयांभोवती आशयनिर्मिती करणारे वापरकर्तेही याच काळात संख्येनं वाढलं.

सर्वच क्षेत्रांत संचार

व्यापक उपयुक्तता, मनोरंजनमूल्य आणि प्रामुख्यानं वापरकर्त्यांना खिळवून ठेवण्यातलं कौशल्य या तीन प्रमुख निकषांवर हा आशय समाजमाध्यम कंपन्यांना हवाच होता. अशा आशयाची निर्मिती करणाऱ्यांना कंपन्यांनी अधिक प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

त्यांची कौशल्यं अधिक प्रभावी केली. त्यांचा आशय अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल अशी रचना उभी केली. त्यातून आशय निर्माण करणाऱ्यांना अधिकाधिक पाठिराखे मिळायला सुरुवात झाली. वापरकर्ते समाजमाध्यम कंपनीची सेवा (उदाहरणार्थ : यूट्यूब, इन्स्टाग्राम इत्यादी) अधिक वेळ वापरायला लागले.

समाजमाध्यम कंपन्या आधीपासूनच वापरकर्ते, त्यांचा वेळ जाहिरातदारांसाठी वापरत होतेच; आता संख्यात्मक वाढ सहज झाली. परस्परांना सोईची एक नवी व्यवस्था आकाराला आली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची ही व्यवस्था.

त्यात आशयनिर्मिती करणाऱ्यांचा, समाजमाध्यम कंपनीचा आणि वापरकर्त्यांचा असा तिन्ही घटकांचा फायदा होता. आशयाला वापरकर्ते, वापरकर्त्यांना आशय आणि दोन्ही घटक एकत्र येणारं समाजमाध्यम अशी ही रचना.

मनोरंजन-उद्योगानं सर्वप्रथम या रचनेचा स्वतःच्या व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायला सुरुवात केली. भारतात २०१८ पासूनचे गाजलेले चित्रपट आठवले तर या चित्रपटांबद्दल आधी यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवरून माहिती मिळाल्याचं लक्षात येईल. चित्रपटाभोवती, त्यातल्या कलाकारांभोवती समाजमाध्यमांवर आशयनिर्मिती व्हायची.

चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याबद्दल चर्चा घडून यायची. स्वाभाविकपणे याचा लाभ चित्रपटाला अधिक गर्दी खेचण्यात व्हायचा. पर्यटन-उद्योगानंही या रचनेचा उपयोग केला. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या कंपन्यांकडून; विशेषतः मोबाईल-संगणक, लॅपटॉप-उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रचनेचा वापर व्हायला लागला. हळूहळू आरोग्यक्षेत्रात या रचनेनं पाय पसरले.

गेल्या तीन वर्षांत एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही, जिथं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची व्यवस्था वापरली जात नाही. निवडणूकप्रचार हे या व्यवस्थेनं पादाक्रांत केलेलं नवं क्षेत्र.

सेलिब्रिटींनाही मोह...

उत्तम आणि उपयोगी आशयाच्या बळावर मिळालेले पाठिराखे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं बलस्थान. भारतात समाजमाध्यमांचे वापरकर्ते जगाच्या तुलनेत सर्वोच्च संख्येनं आहेत. तथापि, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दलचं संशोधन अत्यंत अल्प आहे.

उदाहरणार्थ : अमेरिकेतलं संशोधन सांगतं की, एखाद्या उत्पादनाची विक्री ‘सेलिब्रिटीं’नी केलेल्या जाहिरातींपेक्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमुळं अधिक वाढते. त्यामुळंच, सेलिब्रिटींनाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हावसं वाटतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची भाषा, सादरीकरणाची पद्धत अधिक अनौपचारिक असते.

परिणामी, त्यांच्याबद्दल वापरकर्त्यांमध्ये अधिक विश्वास असतो. साधारणतः चाळिशीच्या आतला ग्राहकवर्ग सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात राहतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे, इन्फ्लुएन्सर एखाद्या विषयाच्या सर्व बाजूंची माहिती मांडत असतात. अमेरिकेतलं हे संशोधन भारतातही लागू पडेल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा सर्व क्षेत्रांतला वाढता प्रभाव नेमकं हेच सांगतो आहे.

विश्वासार्हतेच्या कक्षा...

आता, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजकारणातही शिरल्यानं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. युरोप-अमेरिकेपेक्षाही भारतात सोशल मीडिया-वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीही संख्या वाढते आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं राजकारण्यांची व्यावसायिक; पण छुपी प्रसिद्धी करणं भारतीय वापरकर्त्यांना कितपत रुचतं यावर या नवकौशल्याचं भविष्य ठरू शकतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एखाद्या पक्षाची बाजू घेऊन आशयनिर्मिती करत असेल तर त्या पक्षाच्या पाठिराख्यांपलीकडं त्याची विश्वासार्हता कितपत जाईल याबद्दल साशंकता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत व्हॉट्सअॅपपासून यूट्यूबपर्यंत, सगळीकडं रोज आदळणाऱ्या व्हिडिओंनी हा प्रश्न निर्माण केला आहे. या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात वापरकर्तेच शोधतील आणि त्यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या व्यावसायिकतेचंही भविष्य दडलेलं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com