

Social Media and Marathi Literature
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
माझा किंवा माझ्या पिढीचा कवी-लेखक म्हणून प्रवास उलटा- म्हणजे फेसबुक किंवा इंटरनेटवरून नियतकालिकांकडे म्हणजे ऑनलाइनकडून प्रिंट-छापील असा झाला आहे.
कॉलेजच्या साहित्य-मंडळाच्या कार्यक्रमानंतर एका मुलाने विचारलं- ‘‘दादा, आपलं रायटिंग पोचवण्यासाठी तू फेसबुक वापरलंस असं म्हणालास मघाशी. थोडं डिटेलमध्ये सांग ना.’’
मी म्हणालो, ‘‘२००८ मध्ये मी फेसबुकवर अकाउंट उघडलं. आतासारखं फेसबुक ‘म्हातारं’ नव्हतं, तेव्हा सळसळतं होतं चांगलं. तसा मी फेसबुकवर यायच्या आधीपासून कविता लिहीत होतो. मराठी भाषा आणि साहित्य या विषयाचा ग्रॅज्युएट. सो, मला मराठीतले वेगवेगळे प्रवाह, लेखक माहीत होते. वाचनही बऱ्यापैकी होतं. त्यामुळे मराठी साहित्य वर्तुळ आणि नियतकालिकं माहिती होती. तेव्हा मला वाटायचं, की आपण जे काही लिहितो आहे ते कोणत्यातरी नियतकालिकात प्रकाशित झालं तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. पण मुळातच स्वभाव काहीसा भिडस्त असल्यामुळे नियतकालिकांकडे बेधडक कविता पाठवणं काही जमलं नाही. आता वाटतं, ते बरंच झालं एकाअर्थी!’’