गर्तेतून घेई गगनभरारी...

‘मिट्ट काळोख... लख्ख उजेड’ या पुस्तकात सुमेध वडावला (रिसबूड) यांनी दत्ता श्रीखंडे यांचा स्तिमित करणारा जीवनप्रवास मांडला आहे.
Book Mitta Kalokh Lakkha Ujed
Book Mitta Kalokh Lakkha UjedSakal
Summary

‘मिट्ट काळोख... लख्ख उजेड’ या पुस्तकात सुमेध वडावला (रिसबूड) यांनी दत्ता श्रीखंडे यांचा स्तिमित करणारा जीवनप्रवास मांडला आहे.

व्यसनामुळे अनेकांनी आपलं सोन्यासारखं आयुष्य धुळीस मिळवलं. व्यसनाच्या गर्तेत अडकून सुखी संसाराची राखरांगोळी झाली. व्यसनामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती खालच्या पातळीला जाऊ शकतं आणि या व्यसनांपासून दूर गेल्यानंतर व्यसनमुक्तीमुळे ती व्यक्ती यशाची विविध शिखरं पादाक्रांत करू शकते, या सर्व बाबींचा थक्क करणारा प्रवास ‘मिट्ट काळोख’ या पुस्तकात अनुभवायला मिळतो.

‘मिट्ट काळोख... लख्ख उजेड’ या पुस्तकात सुमेध वडावला (रिसबूड) यांनी दत्ता श्रीखंडे यांचा स्तिमित करणारा जीवनप्रवास मांडला आहे. हे पुस्तक वाचताना सर्व घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोर तरळतात. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आता पुढं काय होणार याबद्दल उत्सुकता निर्माण होते. एक तडीपार गुंड ते एक यशस्वी जीवन असा अविश्वसनीय प्रवास करून एका उंचीवर पोहचलेल्या दत्ता श्रीखंडे यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचं कौतुक वाटतं. त्यांना आलेले अनुभव इतरांच्या कामी यावेत आणि व्यसनी व्यक्तींनी या चक्रव्यूहातून बाहेर यावं यासाठी श्रीखंडे करत असलेलं समुपदेशनाचं कार्य आदरणीय आहे.

या पुस्तकातून दत्ता यांचा जीवनप्रवास उलगडत जातो. दोन आई मिळूनही बालपणापासून आईच्या प्रेमासाठी तरसणारा दत्ता लहानपणापासूनच खोडकर होता. आपल्याच घरात परकं असल्याची भावना त्याच्या मनात रुजलेली होती. त्यातून त्याची घुसमट वाढत गेली आणि मग त्यानं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी लहान-सहान कामं करताना मिळालेली अपमानास्पद वागणूक अनुभवली. मग दत्ता अवैध धंद्यांमध्ये गुरफटत गेला आणि त्याचं आयुष्य नकळतपणे अधोविश्वात गेलं. मग चोऱ्या, पाकीटमारी, दारू-गर्द या व्यसनांचा घट्ट विळखा, जेलच्या वाऱ्या, तडीपारी या दुर्दैवी फेऱ्यात दत्ता अडकत गेला.

व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा असूनही त्याला ते शक्य होत नाही. त्यानंतर जीवनात घडलेल्या काही घटनांमुळे त्याची या सर्वातून बाहेर पडण्याची इच्छा प्रबळ होत जाते. मग त्याला गवसतो यातून बाहेर पडण्याचा मार्ग.. तो म्हणजे ‘मुक्तांगण’. त्यातून सुरू होतो त्याच्या यशस्वी जीवनाचा प्रवास. त्यानंतर तो गाठत जातो यशाची नवनवीन शिखरं... जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही दत्ता त्यातून मार्ग काढतो आणि या सगळ्यात त्याला कुटुंबाची आणि ‘मुक्तांगण’ची मोलाची साथ मिळते.

व्यसनमुक्तीचा परीसस्पर्श मिळाल्याने दत्ताचं जीवन सोनेरी क्षणांनी भरून गेलं. दत्ताने मग बॉडीबिल्डिंग, मास्टरशेफ, समुपदेशक अशा अनेक क्षेत्रांत यश मिळवलं. ‘मिट्ट काळोख... लख्ख उजेड’ ही दत्ता श्रीखंडे यांची थक्क करणारी आत्मकथा आहे. त्यात लेखक सुमेध वडावला (रिसबूड) यांनी अक्षरशः प्राण ओतले आहेत. यातून अनेकांना व्यसनमुक्तीची प्रेरणा नक्कीच मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com