भारत भाग्यविधाता!

देश म्हणजे केवळ चार दिशांच्या सीमांमधला जमिनीचा तुकडा नव्हे आणि देश म्हणजे केवळ शासनव्यवस्थाही नव्हे.
india
indiasakal
Summary

देश म्हणजे केवळ चार दिशांच्या सीमांमधला जमिनीचा तुकडा नव्हे आणि देश म्हणजे केवळ शासनव्यवस्थाही नव्हे.

- सोनाली लोहार sonali.lohar@gmail.com

देश म्हणजे केवळ चार दिशांच्या सीमांमधला जमिनीचा तुकडा नव्हे आणि देश म्हणजे केवळ शासनव्यवस्थाही नव्हे. या सगळ्याबरोबरच देश म्हणजे एक विचारधाराही आहे, देश म्हणजे संस्कृतीही आहे, देश म्हणजे प्रकृतीही आहे...

मी नुकतीच नवीन ठिकाणी राहायला आलेय. सुरुवातीला शेजाऱ्यांशी विशेष परिचय नव्हता. जाता-येताना जुजबी एखाददोन शब्द, स्मित इतकंच. दरवाजावरच्या नावाच्या पाटीवरून ‘हिंदू’ नाहीत, एवढं समजलं होतं. पॅसेजमध्ये त्यांच्या लहान मुलांचा सतत दंगा. एकदा मी लिफ्टची वाट बघत असताना पाठीवर त्या मुलांचा फुटबॉल जोरात आपटला आणि मी कळवळले. त्याच वेळी बाहेर आलेल्या त्याच्या आईने पोराला धपाटा घातला आणि त्या दिवसापासून तिथे फुटबॉल खेळणंच बंद झालं.

परवा सुटीच्या दिवशी मी जरा निवांत घरात बसले होते. सगळीच घरं दुपारचं जेवून सुस्तावलेली. अचानक बाहेरून आवाज आला ‘जनगणमन अधिनायक जय हे...’

तसं बऱ्यापैकी सूरात होतं; पण उच्चार मात्र सगळेच चुकत होते. न राहून धडपडत उठले आणि दरवाजा उघडला तर पॅसेजमध्ये तेच पिल्लू ताठं उभं... नजर समोर, हाताच्या मुठी वळलेल्या, त्याची अम्मी त्याला राष्ट्रगीत शिकवत होती. समोरच्या अदृश्य तिरंग्याला बघत तो छोटा मुलगा ज्या आवेशात ते गात होता, ते बघूनच अभिमानाने ऊर भरून आला. मला बघितल्यावर तो ब्रेक लागल्यासारखा थांबला. म्हटलं, ‘‘बेटा रूकिये मत, चलिये हम साथ गाते है..’

माणसाप्रति असो वा राष्ट्राप्रति, प्रेम हे रुजावं लागतं आणि खूप खोल आतवर ते उमलावंही लागतं. जे जबरदस्तीने केलं जातं ते मुळात प्रेमच नव्हे. ‘भारत माझा देश आहे’ हे म्हणताना ‘माझा’ या शब्दावर जेव्हा नकळत छाती फुलते तेव्हाच तुम्ही तुमच्या देशाच्या प्रेमात असता.

‘काय दिलंय काय हो, या देशाने आम्हाला म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करावं? गरिबी, महागाई, निरक्षरता, अस्वच्छता या सगळ्यांवर आम्ही प्रेम करायचं? भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शासन व्यवस्थेवर आम्ही प्रेम करायचं? डगमगत्या न्यायसंस्थेवरही आम्ही प्रेमच करायचं?’ म्हटलं तर अनेक प्रश्न उभे राहतात.

उत्तर हे की, देश म्हणजे केवळ चार दिशांच्या सीमांमधला जमिनीचा तुकडा नव्हे आणि देश म्हणजे केवळ शासनव्यवस्थाही नव्हे. या सगळ्यांबरोबरच देश म्हणजे एक विचारधाराही आहे, देश म्हणजे संस्कृतीही आहे, देश म्हणजे प्रकृतीही आहे... देश म्हणजे ‘आपणच’. देश बनवणारे, घडवणारे, बदलवणारे आणि मनात आणलं तर संपवणारेही आपणच. ‘देशाने मला काय दिलं’ या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच ‘मी मला काय दिलंय’ या प्रश्नातच सापडेल.

अब्राहम लिंकन यांची दोन फार सुंदर वाक्य आहेत. लिंकन म्हणतात, ‘ज्या ठिकाणी आपण राहतो त्या जागेचा अभिमान असलेला माणूस बघायला मला आवडतं; पण त्या जागेलाही आपल्यात राहणाऱ्या माणसाचा अभिमान वाटावा, अशा रीतीने जगणारा माणूस बघायला मला जास्त आवडतं.’

माझ्या देशाचा मला अभिमान असणं हे रास्तच; परंतु माझ्या देशाला माझा अभिमान वाटावा, असं माझंही कर्तृत्व आणि वर्तन असावं असं वाटणं, हे खरं राष्ट्रप्रेम. जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळाल्यावर स्टेडियममध्ये वाजणारी आपल्या राष्ट्रगीताची धून ऐकताना खेळाडूंच्या डोळ्यांत उभे राहणारे अश्रू म्हणजे राष्ट्रप्रेम. अर्थात राष्ट्र आणि समाज जर अप्रामाणिक आणि चुकीच्या मार्गाने जात असेल, तर ते राष्ट्राच्या निदर्शनास आणून देणे हेसुद्धा राष्ट्रप्रेमच आहे. पण असे करण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा आपण आधी स्वतःलाच ही वचनं देतो की, ‘मी भ्रष्टाचार करणार नाही. मी कायदा आणि सुव्यवस्था राखेन. मी कुप्रथांचे आचरण आणि समर्थन करणार नाही. मी सर्व जातीधर्मांचा आदर करीन. मी सामाजिक सलोखा राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी माझ्या राष्ट्रप्रतीकांचा सन्मान करेन. मी राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीसाठी कटिबद्ध असेन आणि त्यासाठी मी स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करेन.’ या वचनांना जागता आलं तरच ‘माझं माझ्या देशावर प्रेम आहे’ हे म्हणण्यास आपण खऱ्या अर्थाने लायक ठरू.

ता.क. : समोरच्या पिल्लांची १५ ऑगस्टसाठी राष्ट्रगीताची मस्त तयारी झालीय. शिकवणीची फी म्हणून पोरांनी मला त्यांच्या फुटबॉल टीममध्ये घेतलंय.

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com