उजेडाचा मार्ग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजेडाचा मार्ग...

आपल्या अवतीभवती अनेक व्यक्ती अशा आहेत, ज्यांचे प्रेरणादायी जीवन तरुणाईला प्रकाशाची दिशा दाखवणारे ठरू शकेल. आयुष्यात अनेक अडथळे येत असतात.

उजेडाचा मार्ग...

- सोनाली लोहार sonali.lohar@gmail.com

आपल्या अवतीभवती अनेक व्यक्ती अशा आहेत, ज्यांचे प्रेरणादायी जीवन तरुणाईला प्रकाशाची दिशा दाखवणारे ठरू शकेल. आयुष्यात अनेक अडथळे येत असतात. ते अडथळे पार करत, परिस्थितीवर मात करत आपणच आपल्या नव्या वाटा शोधायच्या असतात. असाच उजेडाचा मार्ग दाखवणाऱ्या स्त्रियांची गोष्ट...

परवा एका बारावीतील मुलाचा फोन आला. अगदी भरभरून बोलला. संभाषण संपवता संपवता म्हणाला, ‘माझी एक विनंती आहे, आपण आम्हा विद्यार्थ्यांसाठी काही तरी प्रेरणादायी लिहा. आयुष्य कसं असावं याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.’’

एका सोळासतरा वर्षीय मुलाकडून ते जड शब्द ऐकताना एकीकडे मला पु. लं.चा ‘गटने’ही आठवत होता आणि दुसरीकडे नकळत कौतुकही वाटत होतं. ‘तरुण पिढी भरकटली आहे, उन्मत्त आहे’ वगरै म्हणताना आपण विसरतो की ही मनंही कुठे तरी आधार शोधत असतात. या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी मला प्रभावशाली वाटणाऱ्या तीन स्त्रियांच्या प्रवासाविषयी...

त्यातील आज चर्चेत असलेलं नाव म्हणजे द्रौपदी मुर्मू. भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार. आदिवासी क्षेत्रातील एका छोट्या खेडेगावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. वंचित घटकातील असूनही धडपडत शिक्षणाची कास पकडली, ओडिसा सरकारच्या वीज विभागात ज्युनिअर असिस्टंट म्हणून नोकरी व त्यानंतर शिक्षिकेची नोकरी करत असतानाच समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी अव्याहत समाजकार्य. पुढचा नगर पंचायत समिती सदस्य ते आमदार, मंत्री, राज्यपाल व आता राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार हा प्रवास प्रेरणादायी आहे.

६४ वर्षीय द्रौपदी यांनी या प्रवासात स्वतःची दोन तरुण मुलं गमावण्याचं प्रचंड दुःखही अनुभवलं आहे. वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्याच आघाड्यांवर एक खंबीर स्त्री किती समर्थपणे टक्कर देऊ शकते, याचं एक उदाहरण म्हणजे द्रौपदी मुर्मू.

दुसरे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे बिजयशांती टोंगब्राम. कमळाच्या देठापासून बनणाऱ्या कापडाविषयी तुम्ही ऐकलंय? २०१८ पर्यंत असं कापड फक्त म्यानमार या देशामध्येच बनायचं. मणिपूर राज्यातील एका छोट्याशा गावातील बिजयशांती या २७ वर्षीय तरुणीला वाटलं, की आपणही हे करू शकतो. वनस्पतीशास्त्रात पदवी घेतलेल्या बिजयशांतीला इच्छा असूनही आर्थिक कारणाने पुढील शिक्षण घेणं शक्य नव्हतं; मात्र स्वतःचा व्यवसाय असावा आणि गावातल्या इतर महिलांनाही काही रोजगार उपलब्ध करून देता यावा, हे तिचं स्वप्न होतं. मग धाडसाने आणि जिद्दीने २०१८ मध्ये या कामाला सुरुवात केली. गावाशेजारच्या तळ्यात हजारोंनी कमळं फुलायची. फुलं उमलून गेल्यानंतर त्यांचे देठ घरी आणायचे. त्याच्या चिकाची सुखाई, चरख्यावर कताई होऊन मग हातमागावर हे कापड विणायचं. अतिशय मेहनतीच्या या कामात साधा एक स्कार्फ बनवायलाही एक महिना लागतो, म्हणूनच त्याची किंमतही जास्त असते. आज त्या गावातल्या ६० स्रियांना रोजगार मिळालाय आणि कित्येक तरुणींना प्रशिक्षण. जगाच्या नकाशात कमळापासून कापड बनवणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचेही नाव आले आहे आणि यासाठी स्वतः पंतप्रधानांनी या तरुणीचं जाहीर कौतुक केलंय.

तिसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे मालविका अय्यर. घराशेजारच्या बंद पडलेल्या दारूगोळा कारखान्यातला जमिनीवर पडलेला एक गोळा तेरा वर्षीय मालविकाने निरागसपणे उचलला... तो जिवंत हातबॉम्ब होता. मालविकाचे मनगटापासून दोन्ही हात कापले गेले. दोन्ही पायांना असंख्य फ्रॅक्चर्स आणि नर्व्ह डॅमेजही झालं. पुढील दोन वर्षं मालविका रुग्णालयात असह्य वेदनेने तळमळत पडली होती. गेलेले हात परत येणार नाहीत, हे सत्य या लहान मुलीने स्वीकारलं आणि शारीरिक आणि मानसिक वेदनेला नवीन अर्थ देण्याचं आव्हानही. मदतनिसाच्या साह्याने दहावीची परीक्षा देऊन ९७ टक्के मार्कांनी पास झाली. आज ३३ वर्षीय विवाहित मालविका एमफिल, पीएचडी होल्डर आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्रेरक वक्ता, दिव्यांग अधिकार चळवळीची प्रतिनिधी आणि प्रेरणादायी फॅशन मॉडेलही आहे. पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘वूमन अचिव्हर’ म्हणून खास आमंत्रित केली गेलेली ही तरुणी समस्त तरुणाईसाठी एक आदर्श आहे. आजही कमकुवत नसांमुळे प्रचंड वेदनांचा सामना करणारी मालविका आयुष्याप्रती मात्र तितकीच सकारात्मक आणि आशादायी आहे.

या तीन महिलांविषयी मी जेव्हा माझ्या २१ वर्षीय लेकाला सांगितलं, तेव्हा तो थोडा भावनाविवश झाला... म्हणाला,‘‘ममा, मला हे ऐकण्याची गरज होती.’’ तरुणाईला या महिलांच्या प्रवासातून एखादा तरी आशेचा किरण सापडेल आणि कदाचित स्वतःच्या पुढील प्रवासाची दिशाही.

(लेखिका प्रसिद्ध स्तंभलेखक, कवयित्री असून, गेली २५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. देशातील अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्टस्‌पैकी त्या एक मानल्या जातात.)

Web Title: Sonali Lohar Writes Womens Story Direction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womensaptarang