लाघवी स्मित..!

वेगानं वाढणाऱ्या दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर व हाँगकाँग अशा आशियाई देशांच्या यादीत जाण्यास व्हिएतनाम आतुर झाला आहे.
लाघवी स्मित..!

- राजू नायक, saptrang@esakal.com

वेगानं वाढणाऱ्या दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर व हाँगकाँग अशा आशियाई देशांच्या यादीत जाण्यास व्हिएतनाम आतुर झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आर्थिक वाढीच्या प्रयत्नात या देशानं सातत्यपूर्ण यश मिळविलं. अधिकारशाही व मानवी मूल्यांची गळचेपी हे तेथील प्रमुख अडसर असले, तरी त्या साम्यवादी राजवटीनं लक्षावधी लोकांना अत्यंत गरिबीतून उन्नतीच्या मार्गाने नेले आहे, हे सत्य आहे.

आमच्या व्हिएतनाम भेटीत मी दुर्मुखलेला व्हिएतनाम पाहिला नाही. आग्नेय आशियाई देशांप्रमाणेच इथंही अक्षरशः महिलांचं राज्य आहे. टुरिस्ट गाइडपासून फळविक्रेत्या व सेल्सवुमनपासून फॅशन, वारसा व सैनिक पेशापर्यंत साऱ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्या सांभाळतात, त्याही हसतमुख राहून. इंग्रजी भाषा फारशी येत नाही, परंतु जुजबी मोडक्या तोडक्या भाषेत त्या हसतमुख चेहऱ्यानं तुमच्याशी संवाद साधत राहतात.

कितीही प्रश्‍न विचारा आणि कितीही घासाघीस करा, त्या नम्रपणानं सुहास्यवदनानं तुमच्याशी संवाद साधतील. युद्धानंतरची गेली अनेक वर्षे या लोकांच्या जीवनात सुखसमाधान कमीच आलं. परंतु आम्ही बलाढ्य देशांना हलवलं, त्यांना गुडघे टेकायला लावलं याचं आंतरिक समाधान या देशामध्ये आहे.

जगाप्रमाणेच या साम्यवादी देशातही आपल्या राजवटीविरुद्ध लोकांना राग आहे. हा देश लोकशाही मूल्यांची कदर करीत नाही. स्वातंत्र्यमूल्यांचे पंख लेवून उडू पाहणाऱ्या तरुणांना तो अडसर बनत आहे, हे अनेक जण आम्हाला ऐकवत होते. मात्र राष्ट्रवादाची भरभक्कम जिगीषा वृत्ती त्यांच्यात पुरेपूर भिनली आहे. कारण वसाहतवादाविरुद्धच्या संघर्षात प्रत्येकाने रक्त सांडले आहे. त्याचा विसर पडलेला नाही. त्यामुळे सरकारविरोधात फारसे वातावरण तिथे कुठे दिसत नाही.

युद्धाची अनेक स्मारकंही त्यांच्या जिगीषा वृत्तीची प्रचिती आणून देतात. त्यांनी आपल्या प्रमुख शहरालाही राष्ट्रपिता हो ची मीन यांचं नाव दिले. यामागंही हीच स्वाभिमानाची चैतन्यदायी भावना आहे. एका बाजूला साम्यवादाबद्दलची बांधिलकी ज्या तत्त्वांनी देश मुक्त केला, एकत्र बांधून ठेवला, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक विकासाचे पंख देणारी मर्यादित भांडवलशाही या मिलाफातून चीनप्रमाणा उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न हा देश बाळगतो आहे.

आमच्या व्हिएतनाम भेटीची सुरुवात हो ची मीन शहरातून झाली. येथील स्थानिक त्या शहराला जुन्या सेगॉन नावानंच ओळखतात. हो ची मीननं वसाहतवादातून दुभंगलेल्या देशाचे दोन भाग एकत्र आणण्याची प्रेरणा दिली. एका छोट्या देशाला राष्ट्र निर्माणाचं तत्त्व शिकवले. त्यानंतरचा इतिहास तर अनेकांना माहीत आहे.

अनेक वर्षे फ्रेंचनं व्हिएतनामला वसाहतवादाचं गुलाम बनविलं होतं व त्यानंतर अमेरिकेनं लाखो सैनिक या देशात उतरवून देशाच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामच्या गनिमी सैनिकांनी ज्या हिकमतीनं हे युद्ध जिंकले, ते जगाला विस्मयचकित करणारं होतं. त्यामुळंच व्हिएतनामचे नाव जगभर झाले.

आम्ही मित्रांनी व्हिएतनामला भेट देण्याचे ठरविले, तेव्हाही गनिमी काव्याद्वारे युद्ध जिंकणाऱ्या हिकमती व मेहनती देशाची प्रतिमाच आमच्या मनात ठसली होती. परंतु त्या देशाने तो इतिहास मागे टाकून अमेरिका व चीनबरोबर मैत्रीचा हात पुढे केला आहे. व्हिएतनाममध्ये आज ५० वर विमानतळं आहेत आणि जगभरातून हा देश विमानसेवेने जोडलेला आहे.

पर्यटन क्षेत्रात व्हिएतनाम आज अनेकांचा अग्रक्रम बनला आहे, याचे कारण विमानाने तो जोडलेला आहेच. शिवाय तो स्वस्तही आहे. गोव्यासारख्या देशातील प्रमुख पर्यटन केंद्राला व्हिएतनामनं पर्याय निर्माण केल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या आहेत. त्यामुळे दिल्लीच्या एका प्रवाशानं गोव्यापेक्षा व्हिएतनामच्या विमानप्रवासाचा खर्च कमी होता हे आम्हाला सांगितले तेव्हा आश्‍चर्य वाटलं नाही. त्यामुळेच केवळ भारत नाही तर आशियातील कोरिया, थायलंड, तैवान व जपानमधूनही अनेक पर्यटक व्हिएतनामला जाणे, तेही बिझनेस क्लासनं आता पसंत करू लागले आहेत.

व्हिएतनाम आठ-दहा दिवसांत पाहून होतो, शिवाय तुम्हाला पाहिजे त्या वातावरणात पर्यटकांना आवडणाऱ्या सुखसोई निर्माण करण्यात त्या देशानं यश मिळविलं आहे. तो प्रामुख्यानं उष्ण कटिबंधातील प्रदेश असला, तरी अनेक बेटं, जंगलं, अभूतपूर्व सामुद्रिक गुंफा शिवाय पहाडी भागातील थंड हवा व शांतता याचा पुरेपूर अनुभव हा देश देऊ शकतो. आम्ही हो ची मीन शहरात उतरलो तेव्हा एकेकाळचं पुणे शहर आमच्या पुढं उभं राहिलं.

दुचाकी वाहनांची नदीच वाहत होती. त्यात अग्रेसर होत्या मुली. या देशानं आपले युद्धाचे व्रण बुजवले असले, तरी रासायनिक युद्धाचे परिणाम त्यांच्या अपत्यांना अजूनही भोगावे लागत आहेत. तरीही हा देश मागचे पान उलटून पुढं जात राहिला, त्याची प्रचिती हे शहर देतं. या शहरानं उद्योगी म्हणून आपलं नाव कमावलं आहे. युद्धग्रस्त अपंगांसाठी कार्यशाळा आहेत.

तिथं कलाकुसरीच्या वस्तू, विणकामापासून नैसर्गिक साधनांपासून चित्रे, मोतीकाम अशा बऱ्याच कौशल्यानं तयार होणाऱ्या वस्तू मिळतात. पर्यटकांनी खरेदी केलेल्या वस्तू घरपोच पाठविण्याची सोय आहे. मोती तयार करून त्यांचे दागिने तयार करणे यात व्हिएतनामनं प्राप्त केलेलं कौशल्य कौतुकास्पद आहे. किनारपट्टीवर अशी बरीच मोती पैदास केंद्रे विकसित केली आहेत. तेथेही महिलांचा वावर मोठा.

औषधी वनस्पतीपासून तयार केलेली औषधी द्रव्ये ते मोती, दागिने, पाचू या सर्व जडजवाहिरींमध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत महिलांचाच वावर. भाषा तोडकीमोडकी, परंतु लाघवी. संपूर्ण देश त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. कोणत्याही महानगरात दिसणारा विलक्षण वेग तेथे आहे. दुचाकींबरोबरच जगातील नामवंत ब्रँडच्या मोटारगाड्या भारतात कधी न दिसणारे वेगवेगळ्या मॉडेलचे ट्रक व बसगाड्यांचे प्रमाणही मोठे आहे.

येथे तुम्हाला लॅमोझिन परवडते. टॅक्सीचालक भाषा समजत नसली तरी तुमच्याशी आदराने वागतो. आपल्या देशातील कोणत्याही पर्यटन स्थळी जाल, तेथील टॅक्सीचालक तुम्हाला लुबाडायलाच टपला आहे. भाड्याची वाहने, हॉटेल, उपाहारगृहे किंवा स्‍ट्रीटफूड, मित्रत्वाच्या भावनेचेच दर्शन तुम्हाला होईल.

कोठेही लुबाडणूक नाही किंबहुना या देशात गुन्हे घडतच नाहीत का, असा प्रश्‍न पडावा. त्याशिवाय फॅशनेबल वस्तू, फॅशन कपड्यांसह अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सारे ब्रँड व त्यांची दालने सगळीकडे आहेत. परंतु तरीही विमानतळावर गर्दी, कोलाहल नाही. इमिग्रेशन सोपे आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन व सिक्युरिटी बसस्थानकासारखीच सोपी, जलद व सुटसुटीत. इमिग्रेशनसाठी अवघी काही मिनिटे. भारताच्या कोणत्याही शहरातून पाच तासांत हो ची मीन गाठता येते. पर्यटकांसाठी हो ची मीनने उत्तम सोयी निर्माण केल्या आहेत. स्वस्त हॉटेलांपासून थ्री-स्टार ते पंचतारांकित हॉटेलांची सेवा येथे उपलब्ध आहेत.

व्हिएतनाम हा देश समुद्रांनी, नद्यांनी वेढलेला आहे. त्यामुळं पर्यटकांसाठी होड्या आणि बोटींच्या सफरी हा सुद्धा रोमांचकारी अनुभव असतो. दाणांग येथील कोकोनट, बागायतींमधून नदींमधील प्रवास हासुद्धा एक गमतीदार अनुभव आहे. मुली या होड्या चालवतात, तेथे विविध कसरती केल्या जातात. हरहुन्नरी प्रवाशांना मासे पकडता येतात. बाणाहिलवरील सनवर्ल्ड हा थिम पार्कचा प्रकारही पर्यटकांना सर्वोच्च अनुभव देणारा आहे.

खासगी तत्त्वावर सनवर्ल्ड हा जगातील एक उत्कृष्ट नव, आधुनिक शहरी अनुभव आहे. केबलकारने तुम्ही कित्येक पहाडावर १२ अंश सेल्सियस तपमानाच्या परिसरात जाता. तेथे मुरलीप्रमाणे दोन्ही हातात अलगद पकडलेला ‘सोनेरी पूल’ व तेथून दिसणारे धुक्यातील कडे व सुखद वातावरणात गवसणारा अनुभव व्हिएतनाम भेटीतील सर्वांत आनंददायी अनुभव आहे.

फ्रेंच पद्धतीची घरे, महल, त्यांचा डायनिंग हॉल, शेकडो खाद्यपदार्थ अनुभवण्यासारखे आहे. व्हिएतनामच्या मध्य किनारी भागात वसलेल्या दाणांगची संस्कृती, स्ट्रीट फूड व विविधांगी समुद्री वैशिष्ट्ये वाखाणण्यासारखीच आहे. या शहराला फुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. व्हिएतनामला २ हजार मैलाची किनारपट्टी लाभली असून, या शांत सुंदर किनाऱ्यावर फिरण्याचा एक आगळा अनुभव आहे. महत्त्वाचे म्हणजे युरोपात आढळणाऱ्या सर्फिंग, स्नॉरकॅलिंग व जॅटस्काइंग सारख्या अनेक सोयी तेथे निर्माण केल्या आहेत.

अनेक अन्नपदार्थ, जिन्नस व ताज्या मासळीसाठी व्हिएतनाम विख्यात आहे. अन्न व वेगळी अन्नसंस्कृती तसेच तेथील निसर्गस्थानेही भुरळ घालतात, परंतु अन्नावर विशेष प्रेम करणाऱ्या खवय्यांनी या भूमीला भेट द्यायलाच हवी. जुन्या गल्ल्यांमध्ये तुम्हाला फ्रेंच स्थापत्यकलेचा अनुभव मिळतो, शिवाय तेथील अनेक शहरांमध्ये फ्रेंच अन्नपदार्थांचीही चवही मिळणे ही एक वेगळी अनुभूती असते.

हानोई राजधानीमध्ये तर नव्या-जुन्याचा व वसाहतवादाच्या अनेक खुणांचा संगम पाहायला मिळतो. रस्त्याच्या बाजूला उघडून बसलेले अनेक अन्नपदार्थांचे स्टॉल, मांस व मासळीचे अनेक प्रकार व त्यांचा रुचिक दरवळ, रस्त्यावर ग्रील केले जाणारे मांस, मासळी, नुडल्सचे विविध प्रकार त्यामध्ये टाकले जाणारे मांस व त्याचा सुगंध, शिजवलेल्या स्थानिक तांदळाचे विविध प्रकार, केळीच्या पानामध्ये व्यवस्थित नेटकेपणाने विकला जाणारा भात, शिवाय स्थानिक वाइनचे अनेक प्रकार, तांदळापासून तयार केलेली वाइन येथे विख्यात आहे व भारताच्या पारंपरिक खाद्य पदार्थांवर पोसलो गेलेलो आम्ही जेव्हा जेवणाच्या टेबलावर मांसाचे ठेवलेले अद्‍भूत प्रकार पाहून चक्रावून जातो.

आम्ही हा देश उभा फिरलो, परंतु नाजूक, सडपातळ महिलांचाच वावर आम्हाला सगळीकडे दिसला. चपळ, तत्पर आणि मेहनती तरुणी. त्यांची आरोग्यदायी निरोगी जीवनपद्धती हे त्यांच्या सुदृढपणाचे रहस्य आहे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्हाला खुल्या उपाहारगृहात किंवा रस्त्यांवरील खानपानगृहात तरुण मुले खात बसलेली दिसतील, परंतु कमनीय बांधा, सुडौल शरीरयष्टी. ही त्यांची नवीन पिढी आहे आणि ती निरोगी आहे. सेंद्रिय शेती, काबाडकष्ट, निरोगी जीवनपद्धती यामुळे निश्‍चितच हा देश भविष्यात मेहनती आणि धडधाकट तरुणांच्या हातात जाणार आहे.

व्हिएतनाममध्ये नाइट लाइफही तेवढीच रोचक आहे. परंतु थायलंडसारखी सहजता अनुभवता जाल, तर पस्तावाल. कारण या देशाने पर्यटन व संस्कृतीचा समतोल साधला आहे. इथं फळबागांचं वैशिष्ट्य साधलं आहे, या फळांची चव भारतापेक्षा कितीतरी अनेक प्रमाणात श्रेष्ठ. ठिकठिकणी विकले जाणारे फणसाचे गरे, सेंद्रिय फळे व त्यांचे विविधांगी खाद्यपदार्थ निश्‍चित चाखण्यासारखे आहेत.

तरुणांना आकर्षण वाटेल अशी अनेक ठिकाणे व्हिएतनामनं विकसित केली आहेत. निसर्गसौंदर्य आहेच, धाडसी खेळ, रोमांचक किनारे, जुना क्वॉर्टर, शिवाय स्ट्रीट फूड व झळाळती संस्कृती आपल्याला संपूर्ण पर्यटनाचा अनुभव देते. साम्यवादी देश असला तरी बौद्ध हा त्यांचा प्रमुख धर्म. चिनी संस्कृतीचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर आहे. चीनने त्यांचा बराच भाग बळकावला. परंतु प्रत्यक्ष लढाईत चीनलाही माघार घ्यावी लागली.

पूर्वंजांबद्दलचा आदर, समाज व कुटुंबांबद्दल अभिमान, निसर्ग व बंधुभाव येथील स्थायिभाव आहे. भरपूर नैसर्गिक हालचाली, हातकाम, बागकाम, सतत सक्रिय, योग्य आहार, जीवनविषयक उमेदी दृष्टी, मूल्यांचे अधिष्ठान, शिवाय कुटुंब, तरुण पिढी, मित्र यांचा सहवास, प्रेमाचे नाते, समाजाचे नाते, समाजकल्याणासाठी योगदान, असा या लोकांचा जीवन-दृष्टिकोन आहे.

त्यामुळेच आर्थिक वाढीचं स्वप्न पाहत असला, तरी व्हिएतनाम पर्यटन क्षेत्रात अचाट साहसं करायला जात नाही. कौटुंबिक तसेच सामाजिक मूल्यांचं त्याला कसोशीनं जतन करायचं आहे, हे येथील आर्थिक वाढीचं तत्त्व आम्हाला जाणवत होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com