छोटा दढीयल

ही घटना आफ्रिकेतील रानम्हशी आणि सिंह यांच्यात होणाऱ्या हाणामारीची आठवण करून देणारी होती. ताडोबातील या घटनेत मात्र एक वाघ आणि दोन गवे होते.
southern part of Tadoba Tiger Reserve Chota Dadiyal tiger tourist attraction
southern part of Tadoba Tiger Reserve Chota Dadiyal tiger tourist attractionsakal

- संजय करकरे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दक्षिणेकडे असणाऱ्या भूभागात सध्या ‘छोटा दढीयल’चे साम्राज्य सुरू आहे. पर्यटकांना त्याचे अधूनमधून दर्शन होत असते. तलावाच्या गवतामध्ये राहून त्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

काहीसा अनोखा आणि अत्यंत ताकदवान असलेला ‘छोटा दढीयल’ आता अवघ्या पाच वर्षांचा आहे; पण त्याच्या रुद्रावताराचा थरार अनेक पर्यटकांनी अनुभवला आहे. ‘छोटा दढीयल’ वाघ अतिशय देखणा आहे. त्याचे देखणेपण त्याच्या चेहऱ्याभोवती असणाऱ्या केसांमुळे अधिक खुलले आहे. त्याचे शरीरसौष्ठवही त्याच्या सौंदर्यात भर टाकते.

फेब्रुवारी महिन्यातील ही घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गावाजवळ एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टला लागूनच मोहर्लीचा विस्तीर्ण तलाव पसरला आहे. पाणकणसांनी आणि गवतांनी भरलेला हा तलाव वन्यप्राण्यांचे हक्काचे आश्रयस्थान आहे.

या तलावातील एका थरारक घटनेने सारे वन्यजीवप्रेमी थरारून गेले. ही घटना आफ्रिकेतील रानम्हशी आणि सिंह यांच्यात होणाऱ्या हाणामारीची आठवण करून देणारी होती. ताडोबातील या घटनेत मात्र एक वाघ आणि दोन गवे होते.

त्याचे असे झाले, मोहर्लीच्या या तलावात गव्यांचा एक कळप निवांतपणे ओलसर हिरव्या गवताचा आस्वाद घेत होता. त्यातील एक गवा काहीसा बाजूला चरत असताना, अचानक गवतात लपलेल्या एका दणकट वाघाने त्याच्यावर हल्ला केला.

वाघाने गव्याच्या गळ्याला धरून जोरदार पाण्यात दाबण्याचा प्रयत्न केला. दोन मल्लांमध्ये जेव्हा कुस्ती होते तेव्हा कसलेला मल्ल जसा धोबीपछाड देतो, त्याच तऱ्हेचा हा निर्णायकी हल्ला होता. साधारण पाचशे किलोहून अधिक वजनाच्या या गव्याने जीवाच्या आकांताने मोठी उसळी घेऊन वाघाचा हल्ला अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत वाघाची गळ्याची पकड ढिली झाली. मात्र पटाईत मल्लाप्रमाणे वाघाने गव्याला मानेच्या वरच्या बाजूने पकडून, पाण्यात दाबण्याचा जोरकस प्रयत्न केला. गवा खाली पडला. ही झटापट आता निकाली लागलीच होती.

याचवेळी बाजूला गवतात असलेला एक मोठा नर गवा, जीवाची पर्वा न करता बेधडकपणे त्या वाघाच्या अंगावर धावून गेला. हा पळत येणारा गवा बघितल्याबरोबरच वाघाने आधीच्या गव्याची पकड सोडली आणि तेथून पळ काढला. ४७ सेकंदांचा हा थरारक व्हिडीओ आफ्रिकेतील जंगलाची वारंवार आठवण करून देणारा आहे.

तेथे अशाच तऱ्हेने बेधडक हल्ला करून जंगली म्हशी आपल्या पिल्लांची, आपल्या सगे-सोयऱ्यांची त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहांपासून मुक्तता करत असल्याचे हजारो प्रसंग आहेत. ताडोबातील या प्रसंगातही जीवाच्या आकांताने बचावाचा पवित्रा घेतलेल्या गव्याचे आणि त्याच्या मदतीला धावून आलेल्या दुसऱ्या गव्याचे अनोखे भावबंध बघायला मिळतात.

जंगलातील तृणभक्षी प्राणी जीवावर बेतल्यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी कशा तऱ्हेने संघर्ष करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या घटनेतील अत्यंत ताकदवान असणारा हा वाघ आजच्या आपल्या कथेचा नायक आहे. त्याचे नाव आहे ‘छोटा दढीयल.’

‘छोटा दढीयल’ हा वाघ कमालीचा ताकदवान आणि धष्टपुष्ट शरीराचा आहे. २०१९ मध्ये जन्माला आलेला हा वाघ आता अवघ्या पाच वर्षांचा आहे. त्याच्या मानेजवळ आणि गळ्याजवळ असणारे केस त्याच्यातील रौद्रपणा वाढवणारे आहे. या वाढलेल्या केसामुळेच त्याला त्याच्या वडिलांसारखेच नाव प्राप्त झाले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सिरकडा या बफर क्षेत्रामध्ये ‘पाटलीणबाई’ नावाच्या वाघिणीच्या पोटी ‘छोटा दढीयल’चा जन्म झाला. या वाघाच्या बापाचे नावही त्याच्या दाढीवरूनच ‘दढीयल’ असे पडले होते.  हा ‘दढीयल’ही चांगलाच दणदणीत वाघ आहे. वाघांच्या आयुष्यातील एक अनोखी घटना त्यावेळेस सिरकडाच्या जंगलात दिसत होती.

‘छोटा दढीयल’ लहान असताना तो आणि त्याच्या भावाला, आदल्या बाळंतपणातील भीमा नावाचा एक नर वाघ सांभाळ करत असल्याचे अनेक पर्यटकांनी तेथे बघितले आहे. या दोन बछड्यांची आई त्यांना सोडून गेल्यावर, या वाघांचा हा मोठा भाऊ या पिल्लांसोबत खेळत असे. त्यांच्यावर जणू देखरेख करत असे.

या अनोख्या छत्रछायेमध्ये ‘छोटा दढीयल’ लहानाचा मोठा झाला. स्वतंत्र झालेला हा वाघ मग पळसगावमार्गे मोहर्लीच्या जंगलामध्ये साधारणतः दोन वर्षांपूर्वी दाखल झाला. सुरुवातीच्या काळात या वाघाला ‘भीम’ हे नाव होते.

मात्र, आपल्या बापाप्रमाणे त्याला गळ्याभोवती व मानेभोवती केस (दाढी) येऊ लागले तसे त्याचे नामकरण ‘छोटा दढीयल’ असे झाले. ऐन जवानीत पदार्पण करणाऱ्या या वाघाची सुरुवातीला मोहर्ली क्षेत्रातील दादा असणाऱ्या ‘बजरंग’शी खडाखडी झाली.

मात्र, ‘बजरंग’ने सुरुवातीला त्याला आपल्या क्षेत्रात येऊ दिले नाही. मात्र, २०२२ च्या हिवाळ्यात छोट्याने अशी काही मुसंडी मारली की ‘बजरंग’ची मोठी कोंडी झाली. क्षेत्र सोडलेला बजरंग मग आगरझरी क्षेत्राकडे सरकला.

मात्र, तेथे असणाऱ्या ‘तारू’ आणि ‘पारस’ या नर वाघांनी आपल्या हद्दीत त्याला येऊ दिले नाही. परिणामी हे सर्व क्षेत्र सोडून ‘बजरंग’ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूला निघून गेला. नंतर तेथे त्याला ‘छोटा मटका’कडून असे काही पराभूत व्हावे लागले की त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडापासून मोहर्लीतील तेलिया, जामुनझोरा असे प्रदेश मग ‘छोटा दढीयल’ने पादाक्रांत केले आणि तो थेट जुनोना बफर क्षेत्रातही दाखल झाला. वर सांगितलेली गव्यासोबतच्या हाणामारीतील पुढची कथा मुंबईतील वन्यजीवप्रेमी नितीन ऊले यांनी सांगितली. त्यावेळेस ते त्याच जंगलात फिरत होते.

ते सांगतात, या घटनेनंतर जखमी झालेला गवा वेगळा होऊन पुढे जाऊ लागला. त्या वेळेस जरी ‘छोटा दढीयल’ने माघार घेतली असली तरी तो त्याच्या मागावरच होता. गवा जसा जंगलाच्या आत शिरला तसे या वाघाने त्याला तेथे लोळवले. आम्हाला ही झटापट बघायला मिळाली. आम्ही ‘कॉलरवाली’ नावाच्या वाघिणीसोबतही या ‘छोटा दढीयल’ला भांडताना बघितले आहे. त्या वेळेस या दांडग्या नर वाघाचा रुद्रावतारही आम्ही बघितला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ‘छोटा दढीयल’ने या क्षेत्रात जम बसल्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या सोनम, कॉलरवाली, C ३ आणि पळसगाव परिसरातील मादीशी घरोबा केला. ‘दढीयल’पासून त्यांना पिल्लेही झाली आहेत. पळसगाव परिसरातील मादीला तर पाच पिल्ले असून ती आता साधारण वर्षभराची झाली आहेत.

वाघांना पाच पिल्ले होणे ही काहीशी आश्चर्यकारक घटना आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ही सर्व पिल्ले वाढवणे हे अत्यंत कठीण असे काम ही मादी करत असून तिला ‘छोटा दढीयल’ने चांगली साथ दिली आहे. अलीकडेच ही पाच पिल्ले, त्यांची आई आणि हा भलामोठा नर वाघ पळसगाव वनपरिक्षेत्रातील काही मोजक्या पाणवठ्यांवर दिसत होता. 

मोहर्ली गावाच्या जवळच असणाऱ्या तलावाच्या परिसरातील या ‘दढीयल’ची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर बघायला मिळतात. एमटीडीसीचे रिसॉर्ट याच तलावाच्या काठावर असल्याने अनेक छायाचित्रांत मागच्या बाजूला हे रिसॉर्ट व समोरच्या बाजूला पाण्यातून चालत जाणारा वाघ, असेही अनोखे छायाचित्र आहे. 

पुण्यातील कुशल कुलकर्णी नियमितपणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. त्यांनी गेल्या वर्षी जुनोना परिसरात याच ‘छोटा दढीयल’ला आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. सुमारे दोन तास त्याने या वाघाला बारकाईने बघितले.

यावेळेस त्याचा स्वभाव, त्याचा अंदाज अनुभवता आला. हा वाघ अतिशय देखणा आहे. त्याचे हे देखणेपण त्याच्या चेहऱ्याभोवती असणाऱ्या केसांमुळे अधिक खुलले आहे. तसेच त्याचे शरीरसौष्ठवही त्याचे सौंदर्य अधिक खुलवते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दक्षिणेकडे असणाऱ्या भूभागात आता ‘छोटा दढीयल’चे साम्राज्य सुरू आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांना त्याचे अधूनमधून दर्शन होत असते. हा वाघ मोहर्लीचे कोअर क्षेत्र, ताडोबाकडे जाणारा मुख्य डांबरी रस्ता यासोबतच कोंडगाव, सितारामपेठ या परिसरातही वावरत आहे. मात्र प्रामुख्याने जुनोना बफर क्षेत्र त्याचे हक्काचे ठिकाण आहे. मी मोहर्लीच्या काठावरील जंगलात काही वाघांना बघितले आहे. मात्र तलावाच्या गवतामध्ये राहून आपले अस्तित्व निर्माण करणारा हा वाघ माझ्या दृष्टीने काहीसा अनोखाच आहे.

sanjay.karkare@gmail.com (लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com