
‘भारतरत्न’सारखा सर्वोच्च सन्मान मिळवलेल्या पंडितजींना सर्वसामान्य रसिकांकडून सदैव हृदयापासून दाद मिळत राहिली. पंडितजींचं जन्मशताब्दी वर्ष गुरुवारपासून (ता. चार फेब्रुवारी २०२१) सुरू होत आहे. त्यानिमित्तानं त्यांना ही शब्दांजली...
शास्त्रीय संगीतातला अपूर्व तेजानं झळाळणारा ‘स्वरभास्कर’ म्हणजे पंडित भीमसेन जोशी. अफाट ऊर्जेनं, सामर्थ्यानं साकारलेली त्यांची ‘भीमसेनी’ गायकी प्रत्येक श्रोत्याच्या कानांत आणि हृदयातही आहे. ‘भारतरत्न’सारखा सर्वोच्च सन्मान मिळवलेल्या पंडितजींना सर्वसामान्य रसिकांकडून सदैव हृदयापासून दाद मिळत राहिली. पंडितजींचं जन्मशताब्दी वर्ष गुरुवारपासून (ता. चार फेब्रुवारी २०२१) सुरू होत आहे. त्यानिमित्तानं त्यांना ही शब्दांजली...
पंडित भीमसेन जोशी यांचं भारतीय संगीतातलं स्थान खूप वेगळं आहे. त्यांच्या गायकीबद्दल बोलायचं, तर या क्षेत्रातल्या विद्वानांपासून अगदी सर्वसामान्य श्रोत्यापर्यंत प्रत्येकापर्यंत त्यांचं गाणं पोचलं होतं. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात खरं तर असं अवघड असतं. कारण दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना ते गाणं आवडणं अनेकदा अवघड असतं; पण पंडितजींनी ते साध्य केलं होतं. याचं कारण म्हणजे त्यांना लाभलेली स्वरसिद्धी. त्यांच्या सुरांतली ताकद आणि त्याचा प्रभाव इतका होता, की ते पोचायला कोणतंही बंधन राहत नाही. ही स्वरसिद्धी शास्त्राच्या, चौकटींच्या पलीकडची होती. त्यामुळेच प्रत्येकाच्या हृदयाला ते गाणं भिडायचं. शास्त्राच्या दृष्टीनं विचार करायचं, तर किराणा घराण्याचा ‘बेस’ राखून इतर घराण्यांमधली तत्त्वं त्यांनी त्यांच्या गायकीत आणली होती. त्यामुळे ही अतिशय एकमेवाद्वितीय अशी ‘भीमसेनी गायकी’ तयार झाली होती.
माझं भाग्य असं, की एक गुरू म्हणूनसुद्धा मला त्यांचा सहवास मिळाला. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांची तालीम देण्याची पद्धत सर्वांगीण होती. आवाजापासून रागसंगीतापर्यंत आणि मैफलीत कसं सादरीकरण हवं इथपर्यंत प्रत्येक गोष्ट ते सांगायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातूनही खूप शिकायला मिळायचं. गुरुनिष्ठा, सुरांवर श्रद्धा, मैफलीत शंभर टक्के देण्याची समर्पणवृत्ती अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माझी त्यांची पहिली भेट झाली ती मी दहा-बारा वर्षांचा असताना. मी बालगंधर्वांची गाणी गायचो. पहिली भेट हिराबाई बडोदेकर यांच्याकडे झाली होती. नंतर मग माझं गाणं ऐकवायला मी पंडितजींकडे गेलो होतो. तेव्हापासून तो सहवास लाभला. या पहिल्या भेटीची एक गंमतिशीर आठवणसुद्धा आहे. माझी शरीरयष्टी तेव्हा किरकोळ होती. पंडितजींनी स्वतःच्या गाण्याबरोबरच तब्येतही उत्तम कमावली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचं मनगट दाखवून त्यांनी ‘गाणं तर कमावच; पण असं मनगटही कमाव’ असं सांगितलं होतं. त्यानंतर सतरा वर्षांचा असताना मी त्यांच्याकडं जाऊन शिष्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. तिचा त्यांनी स्वीकार केली हीच मोठी गोष्ट.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मी गाण्याबरोबर अभियांत्रिकीचं शिक्षणही घेत असल्यानं मला बाहेरगावी फार जाता यायचं नाही; पण तसं असलं तरी पंडितजींबरोबर अनेक मैफलींत मागे तानपुरा धरून त्यांचं गायन अनुभवायची संधी मिळाली. अनेक मैफली स्मरणात आहेत. मात्र, शेवटची मैफल अजूनही अंगावर काटा आणते. सवाई गंधर्व महोत्सवातली त्यांची ती शेवटची मैफल. त्यांची तब्येत खूप बिघडली होती; पण गुरुनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यांनी मी मैफलीत गायन करीन असं सांगितलं होतं आणि त्या शब्दाची पूर्ती करण्यासाठी ते स्वरमंचावर आले होते. तब्येत बिघडली असूनही त्यांच्या गाण्यावर काहीही परिणाम नव्हता. प्रत्येक सूर तेजस्वी वाटत होता. सुरामधली ताकद काय असते हे त्या मैफलीनं दाखवून दिलं. आजही ती मैफल अनेकांच्या स्मरणात आहे. अशा या ‘भीमसेनी’ व्यक्तिमत्त्वाच्या तेजाचे काही कवडसे माझ्या अंगावर पडले हे माझं भाग्य.