

Parenting and Child Development
esakal
प्रणव सखदेव
दिवसातली दहा मिनिटं, मुलांना सहज देता येतात. (थोडं स्क्रोलिंग कमी केलं तर
अगदी सहज!) त्यांना तुमचं काम, त्यातले कष्ट, गुंतागुंत, आनंद असं सारं सांगितलं की त्यांनाही ते समजतं. आई-बाबांना पाहूनच तर मुलं शिकतात ना!
थ कून-भागून घरी पोहोचलो. सकाळी लवकर एका पॉडकास्टचं शूट होतं. एका कादंबरीवर काम सुरू होतं आणि एक भाषांतरही लगेच करून द्यायचं असल्याने डेडलाइन तोंडावर आली होती. दिवसभर नेहमीसारखा वेळ मिळणार नसल्याने पहाटे चार ते सात असं तीन तास काम करून आठला घर सोडलं होतं. शूट झाल्यानंतर संपादक, प्रकाशक यांच्याबरोबर मीटिंग झाली. त्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमाला जायचं होतं. तिथे बोलून, नंतर वाचकांशी गप्पा मारून, दमून रात्री नऊला घरी पोहोचलो. त्यात उन्हाळा असल्याने प्रचंड उकडत होतं. त्याने अर्धा जीव गेला होता.
दार उघडलं. बूट काढून टाकले. पाय मोकळे केले. तोच माझी आठ वर्षांची मुलगी धावतच माझ्याजवळ आली. माझ्या डोळ्यांसमोर हात नाचवत म्हणाली, ‘बाबा! हे बघ काये!’
मी जरा वैतागलोच. घरात येऊन दोन सेकंद श्वास घेतो न घेतो, तोच तिने माझा ताबाच घेतला. पण मी शांतपणे म्हणालो, ‘काय आहे गं?’
‘मला हृत्विकने वर्गात हंस शिकवला आणि मी त्याला कागदाचा फुगा कसा करायचा हे शिकवलं. छान आहे ना?’