निसर्गपूजा आणि चैत्रांगण

वसंत ऋतू म्हणजे चैत्र आणि वैशाख महिने. यातला चैत्र महिना म्हणजे हिंदू संवत्सराचा पहिला महिना.
 Spring months of Chaitra and Baisakh this Chaitra month first month of Hindu calendar
Spring months of Chaitra and Baisakh this Chaitra month first month of Hindu calendarSakal

वसंत ऋतू म्हणजे चैत्र आणि वैशाख महिने. यातला चैत्र महिना म्हणजे हिंदू संवत्सराचा पहिला महिना. होळीत उधळलेले सारे रंग जणू सृष्टी आपल्या अंगावर लेऊन नटून सजून नव्या वर्षासाठी सज्ज होते. झाडं आपली जुनी जीर्ण पानांची वस्त्रं टाकून नव्या हिरव्या पालवीत आपलं जीवन फुलवायला सुरवात करतात.

देवचाफा तर सगळी पानं टाकून देतो आणि फांदी फांदीतून फुलं डोकावतात ती पानाशिवाय. याच महिन्यात जमिनीत कुठंतरी अचानक निळी जांभळी कळी डोकावते तीही बिनपानाची आणि न दिसणाऱ्या कंदाची. स्वर्गीय रूप आणि सुगंध घेऊन आलेला हा भुईचाफा म्हणजे चैत्राचं मुग्धगंधित आश्चर्यच.

चैत्रात एक वेगळी प्रथा गोव्याच्या खेड्या पाड्यातील कुटुंबात जोपासली जाते ती म्हणजे चैत्रगौरीचं हळदी कुंकू आणि ‘चैत्रांगण’. गोमंतकातील गावात आजही निसर्ग आपली मन मोहक रुपं दाखवतो आणि त्याची पूजा आणि महती सांगणारा हा महिना.

विश्वाची आदिशक्ती- गौरी माहेरवाशीण म्हणून आपल्या घरी येणार ही कल्पनाच आपलं आणि देवीचं नातं एका वेगळ्याच पातळीवर आणून देते.

ती देवी न राहता आपल्या घरातील लाडकी लेक, माहेरी विसाव्याला आली आहे आणि तिला आवडणारे सारे वैभव म्हणजे आजूबाजूच्या रानावनात मिळणारी फुले फळे तिच्यासाठी अर्पण करायची. तिला सजवून झुल्यावर बसवायचं.

समोर करवंदे, जांभळे, चारा चुन्ना, आंबा, फणस, पेरु, अशी बागेतली फळं ठेवायची. तिला मोगऱ्याच्या, अबोलीच्या फुलांनी सजवायचं. संध्याकाळी गावातील बायका, मुली बोलावून त्यांना आंब्याचं पन्हं आणि आंबा डाळ,

आणि सगळ्या फळांच्या फोडी द्यायच्या आणि येणार्‍या लेकीबाळींनी निरखून पहायचं ते दारातील निगुतीनं रेखीवपणानं काढलेलं ‘चैत्रांगण’. ही एक रांगोळीची पद्धत म्हणा किंवा प्रथा म्हणा, काढली जाते वर्षातून फक्त एकाच महिन्यात.

मागच्या पिढीतील महिला सूर्योदयापूर्वी उठून आपलं अंगण झाडून आणि शेणाने सारवून स्वचछ करीत. या जमिनीवर एक चौकोन आखून त्यात हिंदू संस्कृतीची प्रतीकं रांगोळीतून काढली जातात. काही घरात चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रांगण रेखाटलं जातं तर काहीच्या घरी चैत्र प्रतिपदेपासून ते चैत्र अमावस्येपर्यंत ही रांगोळी अंगणात असते.

यात निसर्ग येतो. ध्वज, गुढी, सूर्य, चंद्र, कासव, तुळस, गोपद्म, स्वस्तिक, ओम सरस्वती, गणपती, हळद कुंकू, शंकराची पिंडी,त्रिशूल,गदा, शंख याच बरोबर डमरू, बासरी, मोरपीस, कमळ, आंबा, केळी, नागयूग्म, खण नारळ , गरुड, अशी अनेक प्रतीकं,

दैवतं, त्यांची शस्त्रं, वाद्यं येतात. गाय वासरू, हत्तीची अंबारी हे मात्र काढणं हे तिचे कौशल्य असते. गौरी आणि तिच्या सखीचा झूला येतो. त्यांना वारा घालणारा पंखा असतो. या अंगणात जणू त्या गृहिणीनं जीव ओतून आपलं सारं शुभ, सात्विक आणि सुंदर असं जगणं मांडलेलं असतं. तिचं जगणं नेहमीच आनंदाचं, सुखाचं असतं असं नाही.

किंबहुना ते नसतंच. पण ते तसं असावं यासाठी हा एक सृजनरूपी प्रयत्न असतो. आपल्या लेकीला म्हणजे गौरी आणि तिच्या सखीला माहेरी सुख, आनंद लाभावा यासाठी ती मनापासून राबते, स्वत;ला आणि घराला सजवते, नटवते. बाहेरच्या उष्ण हवेला हरवताना गौरीबरोबर झोका घेते.

माहेरवाशीण गौरी आणि तिची सखी बसतात तो झूला, त्यावर एक झुंबर आणि वर लावलेलं शुभ कार्याचं प्रतीक असं आम्रपल्लवाचं तोरण, यानं या रांगोळीची सुरवात होते. मग त्या दोघींना वारा घालणारा पंखा, एका बाजूला अभिमानाचा जरीपटका, विजयाची गुढी. दुसर्‍या बाजूला अखिल विश्वाला प्रकाश, ऊर्जा देणारा सूर्य, तिचा भाऊराया चंद्र आणि शेजारी चांदणी असं एक एक रूप, प्रतिरूप त्या चौकोनात येत जातं.

आपल्या हातातील सारे कौशल्य पणाला लाऊन कमीत कमी रांगोळी आणि रंग वापरुन (खऱ्या चैत्रागणात हळद आणि पिंजर हे दोनच रंग असतात ) शेणानं सारवलेल्या अंगणात काढलेली ही रांगोळी पाहून ती जगन्माता नक्कीच माहेरी येत असेल. या रांगोळीतील प्रत्येक प्रतिकाला अर्थ असतो. समृद्ध निसर्गपूरक संस्कृतीचा वारसा दाखवणारे असे हे ‘चैत्रांगण’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com