आपण सारे चश्मेदीद गवाह...

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल. क्रिकेटच्या मैदानातल्या या दोन घटना आपल्याला जिंदगीचा फलसफाच शिकवून जातात
Sri Lankan batsman Angelo Mathews Another is Australia's Glenn Maxwell world cup 2023
Sri Lankan batsman Angelo Mathews Another is Australia's Glenn Maxwell world cup 2023Sakal

एका गोष्टीतला नायक लेट लतीफ. दुसऱ्या गोष्टीचा हिरो सिकंदराच्या कुळातला. या दोन्ही भविष्यातल्या लोककथा आहेत, आणि आपण सारे त्यांचे चश्मेदीद गवाह आहोत. त्यातला एक नायक आहे श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज. दुसरा आहे ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल. क्रिकेटच्या मैदानातल्या या दोन घटना आपल्याला जिंदगीचा फलसफाच शिकवून जातात.

एक, युद्धावर जाताना भांग पाडण्यात वेळ घालवायचा नसतो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं : युद्ध हे सैनिकानं एकट्यानंच लढायचं असतं. जय झाला तर तो फौजेचा असतो... काही काही गोष्टी आयुष्यात मिस होतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्या असत्या, कानांनी ऐकल्या असत्या तर बरं झालं असतं, असं वाटत राहातं. ‘गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा...’

अशी काहीशी कातर मनोवस्था असते. जुनी माणसं चेहऱ्यावर थोडा अहंगंड आणून सांगतात : आम्ही डॉ. लागूंचा ‘नटसम्राट’ पाहिलाय. भक्ती बर्वेची ‘फुलराणी’ पाहिलीये. आम्ही पु. ल. देशपांडेंचं भाषण प्रत्यक्ष ऐकलंय, आम्ही पं. वसंतराव देशपांडेंचं गाणं ऐकलंय.

मधुबाला, नूतन, गुरुदत्त, मोतीलाल... आणि हो, आम्ही सुनील गावस्करची आख्खी कारकीर्द बघितली. डोळ्यात साठवली. हे असं काही ऐकलं की, थोडी हळहळ वाटते. पण फार काही दिल दुखत नाही, पण आपण उशिरा जन्माला आलो, असं मात्र क्षणभर वाटतं. क्षणभरच.

कारण आपल्या देखत अशा काही गोष्टी घडून जातात की पुढल्या पिढीला सांगण्याजोगं काहीतरी आपल्या पोतडीत जमा झाल्याचं फिलिंग येतं. सार्थक यालाच म्हणत असावेत.

सध्या विश्वकरंडकाचे सामने जोशात सुरू आहेत. दुपारी दीडनंतर कामात लक्ष लागणं कठीण होतं. हल्ली मोबाईलवर लाइव स्कोर कळत राहातो, हे एक बरं आहे. काही महाभाग सामने मोबाईलवर बघतातसुद्धा. अगदी ऑन ड्यूटी!

गेल्या आठवड्यात आयुष्यभर लक्षात राहतील अशा दोन घटना क्रिकेटविश्वात घडल्या. एका घटनेला रडीच्या डावाचा वास होता. दुसरी घटना मात्र ज्वालामुखी फुटल्यागत देदीप्यमान होती. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता आऊट झालेला विश्वकरंडकाच्या इतिहासातला पहिला क्रिकेटपटू ठरला. आता पुढे तो क्रिकेट खेळला नाही तरी इतिहासाच्या बुकात त्याचं नाव कायमचं राहणार आहे.

दुसरी घटना घडली ती वानखेडे स्टेडियमवर. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणी गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढत अजेय द्विशतक ठोकलं. अवघ्या १२८ चेंडूत. नुसतंच द्विशतक नव्हतं ते. संकटात सापडलेल्या आपल्या संघाला त्यानं दिमाखात विजयाच्या दिशेनं नेलं. मैदानावर जे काही घडत होतं, ते अद्‍भुतरम्य होतं. कित्येकांनी स्वत:ला चिमटे काढून घेतले असतील. हे खरंच घडतंय? की आपला मनाचा खेळ?

कुण्या चलाख पोरानं कम्प्युटर ग्राफिक खेळात धुवांधार गोळीबार करत एकेक लेव्हल पार करत जावं, तसा मॅक्सवेल विजयाप्रत गेला. वानखेडेवर त्या दिवशी गेलेल्या क्रिकेटच्या चाहत्यांनी त्यांची लढतीची तिकिटं जपून ठेवली असतील.

पुढेमागे कदाचित लॅमिनेटही करतील. घायाळ, दुखावलेला, दमलेला, चिडलेला मॅक्सवेल प्रत्येक चेंडूवर जीव खाऊन तुटून पडत होता आणि धावांचा पाऊस पडत होता. जणू ढगफुटीच.

मॅक्सवेल काही आपला नाही. तो कांगारूंच्या देशाचा. नाही म्हणायला त्याची पत्नी भारतीय आहे. म्हणजे आपला दूरचा नातलगच म्हणायचा. खरं तर अफगाणिस्तानच्या संघाचं जे भजं झालं, ते पाहण्यासारखं नव्हतं.

हा संघ खरोखर दिलेरीनं विश्वकरंडकात उतरला. जिद्दीनं खेळून आपली गुणवत्ता त्यानं दाखवली, पण मॅक्सवेल हे नैसर्गिक संकट होतं- चक्रिवादळासारखं. असल्या विपदेसमोर कुणाचं काही चालत नसतं.

देवाचे आभार मानायला हवेत. मॅक्सवेलच्या समोर त्या दिवशी भारतीय गोलंदाज नव्हते. मागली पिढी उत्साहात सांगायची, ‘अरे, १९८३ चा वर्ल्ड कप आठवा. कपिलदेवच्या नाबाद १७५ धावा! झिम्बाब्वेचा खुर्दा उडाला खुर्दा! के. श्रीकांत साइट स्क्रीनच्या मागे दडून सिगरेट ओढत होता. कपिलचा दणका सुरू झाल्यावर कुणी त्याला हलू देईना! हलला, आणि विकेट गेली म्हंजे?...’’

पण हे सगळं सांगोवांगीच. कारण कपिलची ती खेळी टीव्हीच्या डबड्यात रेकॉर्डच झाली नाही. त्या दिवशी म्हणे बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचा संप होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातल्या बातम्या बघून भारतातल्या क्रिकेटवेड्यांचा होश उडाला. एक माणूस असं कसं करू शकतो?

कपिलची ती लाजबाब खेळी किती महत्त्वाची होती, आणि त्या खेळीनंच खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटला कलाटणी दिली, वगैरे खूप काही चर्वण गेल्या चाळीसेक वर्षांत झालं आहे. मध्यंतरी त्या विश्वकरंडक दिग्विजयावर आधारित एक चित्रपट येऊन गेला होता. त्यात दुधाची तहान ताकावर भागवता आली, पण तो ऐतिहासिक क्षण मर्मबंधातली ठेव काही होऊ शकला नाही. कारण ती घटना कुणी पाहिलीच नव्हती.

ग्लेन मॅक्सवेलनं वानखेडेवर जे काही घडवलं, त्यावरून कपिलच्या ‘त्या’ खेळीची आठवण येणं साहजिकच होतं. असले क्षण आणि अशा खेळ्या काही रोज रोज होत नसतात. मॅक्सवेलला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. अशा खेळीचे चश्मेदीद गवाह आपण ठरलो, हे पुढल्या पिढ्यांना आपल्याला नक्की सांगता येईल.

मॅक्सवेल नावाचं हे चक्रिवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर थडकलं, त्याच्या दोन-चार दिवस आधीच एक विचित्र विक्रम घडून आला होता. लढत होती श्रीलंका विरुद्ध बांगलादेश अशी. बांगलादेशचा कर्णधार शाकिब हसन आपल्या संघाला घेऊन क्षेत्ररक्षण करत होता. लंकेचे एकेक फलंदाज बाद होत होते.

समरविक्रम बाद झाल्यावर अँजेलो मॅथ्यूज उतरला. त्याच्या हातात पट्टा तुटलेलं हेल्मेट होतं. गडी आरामात आला, आणि क्रीजवर स्टान्स घेण्याऐवजी हेल्मेटशी खेळत बसला. मग पॅवलियनमधून नवं हेल्मेट मागवलं. ते येईपर्यंत तीनेक मिनिटं गेली होती.

शाकिब हसननं आयसीसीच्या नियमाची आठवण करून देत पंचांकडे अपील केलं. आयसीसीचा नियम ४०.१.१ असं सांगतो की, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजानं दोन मिनिटांच्या आत स्टान्स घेणं बंधनकारक आहे.

पंचांचा नाईलाज झाला. शाकिब हसनला विनंती करून बघितली. त्यानं अपील केलंच नसतं, तर हा प्रसंग ओढवलाच नसता, पण शाकिबनं नकार दिला आणि मॅथ्यूजची बहुमोल विकेट एकही चेंडू न टाकता घेऊन टाकली. कचेरीत लेटमार्क झालेल्या कर्मचाऱ्याचा काही ठिकाणी अर्धा पगार कापतात. इथे शाकिबनं अँजेलो मॅथ्यूजची नोकरीच खाल्ली!

२००७ साली आपला सौरव गांगुली असाच विलंबचीत झाला असता. आपला संघ दक्षिण आफ्रिकेत खेळत होता. बिनीची जोडी दुसऱ्या षटकातच परतली होती. काही कारणानं चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरला खेळता येणार नव्हतं.

कसली तरी नियमाची भानगड होती. फलंदाज वासिम जाफर बाद झाल्यावर क्रमवारीप्रमाणे व्हीव्हीएस लक्ष्मणनं पॅड बांधून उतरणं अपेक्षित होतं, पण तो नेमका आंघोळीला गेला होता. लक्ष्मण तयार नाही,

हे बघून सौरव गांगुलीनं घाईघाईत कपडे बदलून पॅडबिडं बांधून बॅट उचलली. खेळपट्टीवर पोचेपर्यंत जवळपास सहा-सात मिनिटं गेली होती, पण द. आफ्रिकेचा कर्णधार ग्रीम स्मिथ थंड होता. पंच हार्पर यांनी त्याला परिस्थिती समजावून सांगितली. मग त्यानं अपीलच केलं नाही. सौरवनं पुढे ४६ धावा काढल्या, पण तो सामना भारतानं गमावला होता.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेतच एका सामन्यात आणखी एक फलंदाज विलंबचीत झाला होता. आदल्या दिवशी नाबाद राहिलेला तो गडी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेळेवर मैदानात पोहोचूच शकला नाही. चिक्कार पाऊस झाल्यानं तो वाहतूक खोळंब्यात अडकला म्हणे!  

काही वर्षांपूर्वी भारतातच, एका प्रथम श्रेणी सामन्यात त्रिपुराचा एक हेमुलाल यादव नामक फलंदाज होता, तो असा टाइम आऊट झाल्याची नोंद आहे. नऊ फलंदाज बाद झाल्यावर यादव उतरणार होता, तेवढ्यात पंचांनी ‘पाणीब्रेक’ पुकारला. हे थोर यादवमहाशय सीमारेषेपाशी संघ-व्यवस्थापकाशी काही बोलत उभे राहिले. बराच काळ गेला, चर्चा आटपेना! शेवटी पंचांनी त्याला टाइम आऊट ठरवून डाव संपवला, आणि त्यांच्या गहन चर्चेत खंड पडू दिला नाही. अर्थात ही उदाहरणं अन्य लढतीची आहेत. विश्वकरंडकात टाइम आऊट झालेला अँजेलो मॅथ्यूज पहिलाच.

एका गोष्टीतला नायक लेट लतीफ. दुसऱ्या गोष्टीचा हिरो सिकंदराच्या कुळातला. या दोन्ही भविष्यातल्या लोककथा आहेत, आणि आपण सारे त्यांचे चश्मेदीद गवाह आहोत. क्रिकेटच्या मैदानातल्या या दोन घटना आपल्याला जिंदगीचा फलसफाच शिकवून जातात. एक, युद्धावर जाताना भांग पाडण्यात वेळ घालवायचा नसतो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं : युद्ध हे सैनिकानं एकट्यानंच लढायचं असतं. जय झाला तर तो फौजेचा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com