पावसाचा आकृतिबंध समजून घेणे गरजेचे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पावसामुळे मिळणारे पृष्ठजल कशा प्रकारे आणि कसे मिळू शकेल ह्याची नेमकी कल्पना येण्यासाठी पावसाचे आकृतिबंध समजणे गरजेचे असतेच. ते समजले नाहीत तर पाणी साठवण्याच्या  सगळ्या योजना व त्यासाठीचे प्रयत्न तोकडेच पडण्याची शक्‍यता अधिक का असते, याचा ऊहापोह करणारा लेख.....

पावसामुळे उपलब्ध होणाऱ्या एकूण पाण्याचा ढोबळ अंदाज आणि उपलब्ध पाण्याचे अपुरे व अनेक वेळा अशास्त्रीय व्यवस्थापन हे महाराष्ट्रातील पाण्याच्या दुर्भिक्षाचे महत्त्वाचे कारण आहे. एकूणच महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता पर्जन्याच्या विशिष्ट आकृतिबंध, लहरी आणि अनियमिततेवर अवलंबून आहे हे विसरता येत नाही. पावसामुळे मिळणारे पृष्ठजल कशा प्रकारे आणि कसे मिळू शकेल ह्याची नेमकी कल्पना येण्यासाठी पावसाचे आकृतिबंध  समजणे गरजेचे असतेच. ते समजले नाहीत तर पाणी साठवण्याच्या  सगळ्या योजना व त्यासाठीचे प्रयत्न तोकडेच पडण्याची शक्‍यता अधिक का असते, याचा ऊहापोह करणारा लेख....

महाराष्ट्राच्या विविध भागात आढळणारा पर्जन्यकाल हा सारखा नाही. पर्जन्यकाळातील विविधता ही  केवळ सांख्यिकीदृष्ट्‌याच नाही तर पर्जन्य उपयुक्ततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. पर्जन्यमानातील व पर्जन्यकाळातील असमान वितरणाचे फार मोठे परिणाम पाण्याच्या उपलबद्धतेवर महाराष्ट्राच्या विविध भागात नेहमीच जाणवत असतात. जून ते ऑक्‍टोबर या प्रमुख पर्जन्यकाळात ८५ टक्के पेक्षा जास्त पाऊस पडतो हे खरे असले तरी अमोसमी काळात पडणारा अत्यल्प पाऊसही तितकाच महत्त्वाचा असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राच्या पूर्व भागात डिसेंबर हा ख-या अर्थाने ईशान्य मान्सून व नैॡत्य मान्सून यातील सीमारेषा आहे. पूर्व भागात हिवाळी पर्जन्य जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यात सामान्यपणे होतोच. मात्र त्याचे प्रमाण केवळ ५०  ते ६०  मिमी एवढेच असते. ह्या काळात भंडारा येथे ३५  मिमी, चंद्रपूर येथे  २५ मिमी तर अमरावती व नागपूर मध्ये अनुक्रमे केवळ १६ मिमी व २३ मिमी एवढ्या पावसाचीच नोंद होते. पश्‍चिम महाराष्ट्र यावेळी पूर्णपणे कोरडाच असतो.

या सर्व पर्जन्य आकृतीबंधात पर्जन्यदिनाना खूपच महत्त्व असते. सामान्यपणे महाराष्ट्रात वर्षभरात ३ पेक्षा कमी पर्जन्यदिन कुठेही नसतात. सर्वात जास्त म्हणजे १२५ पर्जन्यदिन आंबोली ह्या ठिकाणी नोंदवले जातात. कोकणात संपूर्ण वर्षात एकूण ८० ते १०० पर्जन्यदिन तर सह्याद्रीत ते १०० ते १२५ व पठाराच्या पश्‍चिम भागात ते ३० ते ६० इतके असतात. पूर्व महाराष्ट्रात हेच प्रमाण ५०  ते ७५ पर्जन्यादिन एवढे असते. जुलै ह्या मौसमी महिन्यात नेहमीच सर्वात जास्त पर्जन्यादिनांची नोंद होत नाही. ती काही ठिकाणी ऑगस्ट मध्येच होते.

मान्सून मध्ये आढळणारे पावसाचे वितरणही वैशिष्ट्‌यपूर्ण असते.  आगमन काळात पाऊस मुसळधार वृष्टीच्या स्वरूपात होतो. ऑगस्टमध्ये हे प्रमाण एकदम कमी होते. सप्टेंबरमध्ये सामान्यपणे रिमझिम स्वरुपात तर कधी मुसळधार वृष्टी होते. ऑक्‍टोबर मधला पाऊस जमिनीतील आर्द्रता  वाढविण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात मृदेत साठलेले पाणी वर्षभर टिकून राहील एवढे नसते. महाबळेश्वर, माथेरान सारख्या जास्त वृष्टीच्या भागातील जमिनीतही पाणी साठत नाही. नोव्हेंबर ते मे मध्ये सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोरड्या ऋतूत थोडाफार पाऊस पडतोही पण तो सगळाच कोरडया जमिनीची धारणक्षमता वाढवण्यात खर्च होतो. आणि  जास्त पाण्याचा काहीच उपयोग होत नाही.

या नेहमीच्या पर्जन्य आकृतीबंधावर आधारित उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्‍य असते . गेल्या काही वर्षापासून नेहमी येणारा पाण्याचा तुटवडा आणि वाढणारे दुर्भिक्ष कमी किंवा नष्ट करण्यासाठी जल संधारणाचे शास्त्रशुद्ध आणि मनापासून प्रयत्न निश्‍चितच सुरु झाले आहेत .  राज्य सरकार चालवीत असलेले  ’जलयुक्त शिवार अभियान ’  आणि अमीर खान यांनी सुरू केलेले ’पाणी फाऊंडेशन ’ ही  अशा प्रयत्नांची उत्तम उदाहरणे . यामुळे अनेक गावातील पाण्याचा प्रश्न नक्कीच संपून जाईल. अनेक दृष्टीनी हे प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थाने लोक अभियान आहे यात शंका नाही. या अंतर्गत प्रामुख्याने पाणी साठवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि जमिनीतील ओलावा वाढविणे ह्या गोष्टी केल्या जात आहेत.

Web Title: Srikant Karlekar article