Story of Vamana Avatar of Vishnu and Bali King Bali promice
Story of Vamana Avatar of Vishnu and Bali King Bali promiceSakal

राजा बळीचं वचन

विष्णूचा वामनावतार आणि बळी यांची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. तरीही, मी ती पुन्हा कथन करतो
Published on

- विवेक देबरॉय

विष्णूचा वामनावतार आणि बळी यांची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. तरीही, मी ती पुन्हा कथन करतो. कारण, काही कथाभाग अपरिचित असू शकतो. बळीनं स्वर्गावर विजय प्राप्त केला आणि इंद्रासह इतर देवांना हाकलून दिलं. त्यामुळे देवांची माता असलेल्या अदितीची स्थिती फारच दयनीय झाली.

पती कश्‍यप यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिनं तपस्येला सुरुवात केली. विष्णू हा पुत्र म्हणून आपल्या पोटी जन्माला यावा हा तिच्या तपस्येचा हेतू होता. अदितीचा पुत्र म्हणून विष्णूनं जन्म घेतल्यानं तो ‘उपेंद्र’ म्हणजेच इंद्राचा धाकटा भाऊ म्हणून ओळखला जातो.

जन्माला आल्यावर त्यानं बटुरूप धारण केलं. त्याच्या मुंजीचा विधी झाला त्या वेळी स्वत: सूर्यदेवानं त्याला सावित्रीमंत्राची दीक्षा दिली. बृहस्पतीनं त्याला जानवं दिलं आणि कश्‍यपांनी त्याला मुंज या गवतापासून तयार केलं गेलेलं कौपिन हे वस्त्र दिलं.

पृथ्वीनं वामनाला काळविटाचं कातडं दिलं. सोमदेवानं त्याच्या हातात दंड दिला. वामनाच्या आईनं त्याच्या मस्तकावर वस्त्र ठेवलं आणि आकाशानं त्याच्या हातात छत्री दिली. ब्रह्मानं त्याला कमंडलू दिलं, तर सप्तर्षींनी कुश नावाचं गवत दिलं.

सरस्वतीनं वामनाला अक्षमण्यांची माळ दिली. जानवं विधिपूर्वक धारण केल्यानंतर कुबेरानं त्याला भिक्षापात्र दिलं. भगवती उमा अंबिकेनंच त्याला पहिली भिक्षा दिली. त्याच्या हातात छत्री, दंड आणि पाण्यानं भरलेलं कमंडलू होतं.

त्याचं कौपिन हे वस्त्र मुंज या गवतापासून तयार केलं गेलेलं होतं. त्याच्या गळ्यात जानवं होतं आणि त्यानं काळविटाच्या कातड्याचं उत्तरीय परिधान केलेलं होतं. त्याचे केस भुरभरत होते. त्याच्याकडे पाहून बळी प्रसन्न झाला. त्यानं वामनाला बसण्यासाठी आसन दिलं.

बळीनं त्याचं स्वागत केलं आणि त्याची पाद्यपूजा केली. बळी म्हणाला : ‘‘तुझं स्वागत असो. मी तुला नमन करतो. हे ब्राह्मणा! मी तुझ्यासाठी काय करू शकतो? आज आमचे पूर्वज संतुष्ट झाले आहेत. आज आमचा वंश शुद्ध झाला आहे.

आमच्या घरी तुझ्या झालेल्या आगमनामुळे यज्ञविधीही योग्य पद्धतीनं पूर्ण झाला आहे. आज, अत्यंत विधिवत् यज्ञकर्म झाल्यानंतर अग्नीला अत्यंत उच्च दर्जाची आहुती देण्यात आली आहे. तुझ्या पदस्पर्शानं ही भूमी आणि सर्व लोक पावन झाले आहेत.

तुझ्या बालपावलांनी सर्वच गोष्टी पवित्र झाल्या आहेत. हे वामना! तुझं ईप्सित काहीही असो, तू माझ्याकडून हवं ते माग. कोणताही मागचा-पुढचा विचार न करता मी तुला जमीन, सोनं, उत्तम निवासस्थान, रुचकर अन्न, पेय, ब्राह्मणकन्या, समृद्ध गावे, हत्ती, घोडे किंवा रथ हे देईन. त्यांचा स्वीकार कर.’’

वामन म्हणाला : ‘‘वरदान देण्याची क्षमता असणाऱ्यांमध्ये तुझं स्थान वरचं आहे. वास्तविक पाहता, संपूर्ण पृथ्वीचं दान देण्याची तुझी पात्रता आहे. हे दैत्येंद्रा! मला केवळ माझ्या तीन पावलांमध्ये जितकी भूमी व्यापली जाईल तितकीच भूमी हवी आहे. हे राजा! हे दानवीरा! जो या विश्र्वाचा स्वामी आहे त्याच्याकडून मला इतर काहीही नको. ज्ञानी व्यक्तीनं त्याची गरज भागेल इतकेच दान स्वीकारलं तर त्याला कोणतंही पाप चिकटत नाही.’’ उदार असलेल्या बळीला त्याचं म्हणणं पटलं.

वामनाला त्याला हवी आहे तितकी भूमी देण्यासाठी बळी राजानं पाण्यानं भरलेली झारी उचलली (कोणतीही पवित्र कृती करण्यापूर्वी जलस्पर्श करणं आवश्‍यक असतं). विष्णूला भूदान करण्यास बळी सज्ज झाला. मात्र, दैत्यांचे गुरू असलेल्या उषानस शुक्राचार्यांनी त्याला रोखलं. शुक्राचार्य म्हणाले : ‘‘हे विरेचनपुत्रा! हा खुद्द विष्णू आहे. देवांचा हेतू पूर्ण करण्याच्या उद्देशानं त्यानं कश्‍यप आणि अदिती यांच्या पोटी जन्म घेतला आहे.

त्याला वचन देऊन तू स्वत:वर काय आपत्ती ओढवून घेतली आहेस याची तुला कल्पना नाही. दैत्यांसाठी हे योग्य आहे असं मला वाटत नाही. एक मोठंच संकट ओढवलं आहे. हा साक्षात् हरी असून मायेचा वापर करून तो मनुष्यरूपात आला आहे.

तो तुझं पद, ऐश्‍वर्य, समृद्धी, ऊर्जा, प्रसिद्धी आणि ज्ञान तुझ्यापासून हिरावून घेईल आणि ते शक्राला देईल. तो विश्‍वरूप धारण करून त्याच्या तीन पावलांनी तिन्ही लोक व्यापून टाकेल.

अरे मूर्खा, तू असं का वागलास? तू विष्णूला सर्व काही देऊन टाकलंस. हा देव एका पावलात पृथ्वी व्यापेल आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापून टाकेल. आपल्या भव्य शरीरानं तो सर्व आकाश व्यापून टाकेल. त्याच्या तिसऱ्या पावलासाठी जागाच शिल्लक राहणार नाही.

त्यामुळे त्याला दिलेलं वचन पूर्ण न झाल्यानं, मला वाटतं, तुला यापुढंही नरकातच राहावं लागेल. जी इच्छा पूर्ण करण्याची तुझ्यात क्षमताच नाही ते देण्याचं वचन तू दिलं आहेस. एखाद्याच्या उदरनिर्वाहाला धोका पोहोचवणाऱ्या दानाची कधीही प्रशंसा करता येणार नाही.

या जगात, ज्याची उदरनिर्वाहाच्या सर्व साधनांवर सत्ता आहे त्यानंच दान, बळी, तपस्या आणि सत्कृत्य अशा गोष्टी कराव्यात. जी व्यक्ती आपल्या संपत्तीची धर्म, प्रसिद्धी, अर्थ, काम आणि कुटुंबीय अशा पाच भागांमध्ये विभागणी करते, ती व्यक्ती या आणि पुढील जगात सुखी राहते. हे असुरश्रेष्ठा! यासंदर्भात, पवित्र ग्रंथांमध्ये एक मंत्र सांगितलेला आहे.

तो तू माझ्याकडून ऐक. ‘ज्याची सुरुवात ‘ओम्’नं होते ते सत्य आहे आणि सुरुवातीला हे अक्षर नसल्यास ते असत्य समजावं.’ (बळीनं वचन देण्यापूर्वी ‘ओम्’ असा उच्चार केलेला नव्हता, हे निदर्शनास आणून देणं हा यामागचा हेतू होता). ज्याला स्वत:च्या कल्याणाची कामना आहे त्यानं ‘ओम्’चा उच्चार केल्यानंतरच आपलं सर्वस्व सत्पात्री याचकाला देणं योग्य ठरतं. त्यामुळे, तू जे शब्द उच्चारलेस ते अपूर्ण होते...’’

बळीनं मात्र शुक्राचार्यांचं म्हणणं मानलं नाही. ‘‘हा विष्णू असो वा शत्रू, त्याला हवी असलेली जमीन मी देईनच,’’ बळीनं असं म्हणताच शुक्राचार्यांनी त्याला त्याची सर्व समृद्धी गमावण्याचा शाप दिला. मात्र, बळी आपल्या वचनापासून ढळला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com