
नारायण यावले- saptrang@esakal.com
घाटवळणाच्या रस्त्यावर निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत असतानाच कधी एकदा चिखलदऱ्यात पोहोचतो, याचीच ओढ साऱ्यांना लागते. डोंगराच्या माथ्यावर पोहोचताच आल्हाददायक गारवा हवाहवासा वाटतो. हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरावरच्या भव्य पवनचक्क्या परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. चिखलदऱ्याच्या पूर्वीच रस्त्याच्या कडेला असलेल्या स्ट्रॉबेरीच्या बहरलेल्या बागा अनेकांना त्यांचे वाहन थांबविण्यास भाग पाडतात. विदर्भाच्या नंदनवनात निर्माण होत असलेल्या नव्या फळांनी मन प्रफुल्लित होते. लालभडक रंगाच्या रसरशीत स्ट्रॉबेरीने मोथा या लहानशा गावाला दाखविलेला मार्ग समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणारा आहे.