पण‘ती’ लढत आहे!

चारही बाजूला अंधार असताना ‘पणती’च्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिची ती ‘तेजस्वी आभा’ मलाही चैतन्य देणारी होती. जी मी कधीही विसरू शकत नाही.
strong women Ruapli chakankar solapur flood management
strong women Ruapli chakankar solapur flood managementsakal
Updated on
Summary

चारही बाजूला अंधार असताना ‘पणती’च्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिची ती ‘तेजस्वी आभा’ मलाही चैतन्य देणारी होती. जी मी कधीही विसरू शकत नाही. चार दिवसांपूर्वी जिचं सगळं घरच पुराच्या पाण्यात वाहून गेलं, घरातलं सगळं सामानही वाहून गेलं.

चारही बाजूला अंधार असताना ‘पणती’च्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिची ती ‘तेजस्वी आभा’ मलाही चैतन्य देणारी होती. जी मी कधीही विसरू शकत नाही. चार दिवसांपूर्वी जिचं सगळं घरच पुराच्या पाण्यात वाहून गेलं, घरातलं सगळं सामानही वाहून गेलं. ती आज इतक्या आत्मविश्वासाने दुसऱ्याच्या स्वागतासाठी उभी राहू शकते, ही ताकद फक्त एका ‘स्त्री’मध्येच असू शकते.

सोलापूर जिल्ह्यातील १९ ऑक्टोबर २०२० चा दिवस. मी महिला अध्यक्ष म्हणून त्या भागातील दररोज फोन येत होते व तेथील माहिती मला ग्रामस्थ सांगत होते. पुराच्या संकटामुळे होणारी तारांबळ, या सगळ्यातून स्वतःला वाचवत, स्वतःबरोबर इतरांच्या कुटुंबाला धीर देत काही लोक काम करत होते. शक्य होईल तितके प्रशासन आणि सरकार मदत देत होते. लोकांच्या गाठीभेटी घेणे शक्य नव्हते, कारण रस्तेच पूर्णपणे पाण्याखाली होते.

थोडं पाणी ओसरल्यावर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बार्शी शहर, बारुंगुळे, मंगळवार पेठ, वैराग, हिंगणी, पिंपरी, सासुरे सौदरे, मुंगशी, धामणगाव आणि पिंपळगाव या पूरग्रस्त गावांना भेट देण्याचे ठरवले. या महापुराचा फटका महेश या माझ्या कार्यकर्त्याच्या घरालाही बसलेला. त्याचं घर पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. चार भिंती म्हणून घर म्हणतेय, खरंतर घरातलं सगळंच गंगामाई घेऊन गेलेली, पण महेशच्या चेहऱ्यावर आनंद होता. ‘‘मी या पुरात इतरांना मदत केली आणि माझ्या घरी मदतीला ‘ताई’ आल्या.’’ तसा तो सकाळपासूनच माझ्यासोबत पाहणीसाठी फिरत होता. कोणाचा आनंद कशात असतो, हेदेखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कारण इतरांच्या आनंदाने आपल्याही आयुष्याला सुखाची किनार मिळते.

गावच्या संतनाथ या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन गावकऱ्यांबरोबर पुरामुळे अर्धवट तुटलेला पूल पाहणीसाठी गेलो. नदीला अजूनही पुराचा इतका प्रचंड प्रवाह होता की, माणसांचं आपापसातलं बोलणं ऐकू येत नव्हतं. इतकं रौद्ररूप मला दिसत होतं; पण उत्साही कार्यकर्त्याला कोण आवर घालणार? तो तुटलेल्या पुलाच्या टोकाला उभे राहत, कसा तुटला हे मला दाखवत होता. आहे त्या संकटात अजून संकट नको म्हणून, ‘‘तू स्वतःला आवर!’’ असे सांगत पुलाच्या कडेला उभे राहणाऱ्या कार्यकर्त्याला व अशाच अनेक उत्साही कार्यकर्त्यांना आवरत आणि सावरत गावाचा दौरा पूर्ण झाला.

या पुराच्या दरम्यान पडलेली भिंत, खचलेला संसार, साचलेला गाळ काढत नव्याने घरटं बांधायचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू होता. कोणीतरी चौकशी करत आहे, मी सोबत आहे, आपण लढू असे सांगत आहे, हेच धीराचे चार शब्द लढण्याची ताकद तर देतातच, पण हे दुःख ‘तुझे’ नसून ‘आपले’ आहे, हे सांगणारासुद्धा मनाला भावतो. हा सगळा अनुभव डोळ्याने पाहत मनामध्ये साठवून, तिथून निघून पुढे धामणगावला भेट देऊन पिंपळगावला निघाले.

चारही बाजूला असलेले डोंगर आणि साधारण एक चार चाकी जाईल इतका खाच-खळग्यांचा रस्ता यातून खाली उतरून गेलो. मत्स्य व्यवसाय करणारे हे पिंपळगाव. सगळीकडे भेटी देत गेल्यामुळे दिलेल्या वेळेपेक्षा पोहोचायला उशीरच झाला होता. आता घराबाहेर दिवेलागणीला तुळशीपुढे दिवे लागले होते. मंदिरात गावकऱ्यांची बैठक बसली होती. त्यांच्याशी बोलून चर्चा झाली, माहिती घेतली, नमस्कार करून निघणार तोच सत्तर-पंचाहत्तर वर्षांचे आजोबा पुढे आले. म्हणाले, ‘‘तुम्ही एवढ्या लांब आमच्याकडे आलात, आत्तापर्यंत कोणी आलं नाही, हे सर्व होईलच सुरळीत, पण आमचा आता सत्कारच घेऊन जा.’’ मी सकाळपासून कुठे सत्कार स्वीकारला नव्हता. त्या आजोबांसोबत आज्जीही पुढे आल्या. फार आग्रह होऊ लागला आणि हळूहळू गावकरी ही ‘री’ ओढू लागले. त्यांना सांगितले ठीक आहे. दिवसभरात बराच वेळ पावसात भिजले आहे. आता थंडी वाजतेय, ‘एक कप चहा’ हाच आमचा सत्कार. सगळे खूश झाले. परत चहाबरोबर बैठक बसली आणि ‘लेक’ माहेरी आली की गाव गोळा होतं तसं क्षणभर झालं.

सगळ्यांचा निरोप घेऊन पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघाले. रात्रीचे आठ-साडेआठ वाजले असतील, तोच माझ्या गाडीत बसलेल्या त्या भागातील ग्रामस्थाने सांगितले, ‘‘ताई हा डोंगर चढून वर गेले की, काही महिला तुम्हाला औक्षण करायला थांबल्या आहेत. दोन मिनिटं भेटून निघू...’’ हे सांगत असतानाच आम्ही डोंगराच्या चढणीचा वळणाचा रस्ता चढून वर आलो होतो. समोर एक मुलगी रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली दिसली. खरंतर चहूबाजूला अंधार होता; पण तिच्या हातात असलेल्या ताटातल्या पणतीमुळे जो, प्रकाश पडला होता तो प्रकाश तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. मी गाडीतून उतरून तिच्यासमोर उभी राहिले. तिने मला हळदी-कुंकू लावून औक्षण केले. आज नवरात्रीचा पहिला दिवस होता, मी तिला विचारले, ‘‘तू उपवास करते का?’’ तिने मान हलवत ‘नाही’ म्हणाली. मग आई करते का उपवास? तर ‘हो’ म्हणाली. कुठे आहे तुझी आई? असे विचारत असतानाच दोन-तीन महिला तिच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. ती म्हणाली, ‘‘ही माझी आई आणि हे आमचे शेजारी.’’ ती म्हणाली, ‘‘तुम्हाला खूप वेळा पेपरात पाहिलं, टीव्हीवर पाहिलं, तुम्ही गावात येणार म्हणून समजलं, मी संध्याकाळपासून इथेच उभी हाय. तुम्हाला ओवळण्यासाठी!’’ क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिले. कुठे राहता तुम्ही, असं मी सहजच विचारलं. तर पाठीमागे बोट करून म्हणाली, ‘इथेच मागे राहतो.’ मी तिने दाखवलेल्या दिशेने पाहिलं, पण मला काहीच दिसले नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून तिला कदाचित जाणवलं असेल. ती लगेच मला म्हणाली, ‘‘नाही दिसणार तुम्हाला काही. चार दिवसांपूर्वी पावसाच्या पुरात माझं घर वाहून गेलं. आता फक्त मातीचा ढिगारा आहे.’’ तिचे हे वाक्य ऐकून अंगावर शहारे आले. कारण तिने औक्षणासाठी जे ताट आणलं होतं, त्यात दिव्याऐवजी देवळातली ‘पणती’ होती, हळदी-कुंकूच्या पाळ्याऐवजी हळदी-कुंकूच्या देवळातल्या कागदाच्या पुड्या होत्या. वाहून गेलेल्या घरामध्ये तिचं सर्वच वाहून गेलं होतं, हे तिच्या ताटाकडे पाहूनच समजत होतं.

चारही बाजूला अंधार असताना ‘पणती’च्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिची ती ‘तेजस्वी आभा’ मलाही चैतन्य देणारी होती. जी मी कधीही विसरू शकत नाही. चार दिवसांपूर्वी जिचं सगळं घरचं पुराच्या पाण्यात वाहून गेलं, घरातलं सगळं सामानही वाहून गेलं. ती आज इतक्या आत्मविश्वासाने दुसऱ्याच्या स्वागतासाठी उभी राहू शकते, ही ताकद फक्त एका ‘स्त्री’मध्येच असू शकते.

माझं सगळं संपलं, माझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या, माझ्या चहूबाजूला अंधार असला, तरी उद्याची होणारी ‘पहाट’ ही माझ्यासाठीच आहे, हा प्रत्येक ‘स्त्री’मधला आत्मविश्वास जगण्याचे बळ देणारा असतो. प्रत्येक ‘गर्भ’ वाढविणाऱ्या त्या आईमध्ये हा आत्मविश्वास दृढ असतो. कदाचित या अशा अनेक ‘पणत्या’ मला क्षणोक्षणी भेटतात म्हणूनच माझ्याही ‘संघर्षाचा’ आवाज बुलंद होतो. म्हणूनच तिच्या या रूपात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिमायेचा, आदिशक्तीचा जागर अनुभवला. या नऊ दिवसांत, नवरात्रीत घटात बसणाऱ्या देवीची आराधना जशी होते, जसं वाजतगाजत प्रत्येक घरात तिचं स्वागत होतं, तसंच गर्भात वाढणाऱ्या ‘लेकीचं’ही स्वागत प्रत्येक घरातून व्हावं, हाच नवरात्रीचा संकल्प केला तर ही देवीची आराधना सुफळ ठरेल.

इवलीशी पणती वाऱ्यावर डुलते

अंधाराशी कशी एकटीच भांडते..!

तिची ही धडपड, खूप काही शिकवते

उजेडाने तिच्या, अंधाराला पळवते..!

तिच्यासारखं, धीट व्हायला हवं

तिच्यासारखं जिद्दीने, जगता यायला हवं..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com