सुभाषितरत्नानि : शौर्य-धैर्यप्रशंसा

धैर्यशील माणसावर कितीही संकटं आली तरी त्याचा धैर्यगुण नाश पावत नाही.
Subhashitratnani Praise for courage and patience
Subhashitratnani Praise for courage and patienceSakal

- मंजिरी धामणकर

निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु।

लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्।

अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा।

न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः।।

अनुवाद : लक्ष्मी स्वतःहुन येवो कि जावो निंदोत वा वंदोत नीतिमान असो मरण ते आज वा युगांनी सोडी न न्यायमार्गा धैर्यवान

अर्थ : नीतिवेत्ते निंदा करोत की स्तुती, लक्ष्मी म्हणजेच धनसंपत्ती, तिच्या इच्छेनं येवो अथवा जावो...मृत्यू आज येवो किंवा युगांनी येवो...धैर्यवान माणसं न्यायाच्या मार्गापासून विचलित होत नाहीत.

कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्ते-

र्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम्।

अधोमुखस्यापि कृतस्य वह्ने-

र्नाधः शिखा याति कदाचिदेव।।

अनुवाद : संकट आले धैर्यशिलावर धैर्य तरी ना सोडुन जाई मशाल केली जरि उलटी ती तियेचि ज्वाला खालि न जाई

अर्थ : धैर्यशील माणसावर कितीही संकटं आली तरी त्याचा धैर्यगुण नाश पावत नाही. मशाल जरी उलटी केली तरी तिची ज्वाला कधी खालच्या दिशेनं जात नाही.

प्रायः कन्दुकपातेनोत्पतत्यार्यः पतन्नपि।

तथा पतत्यनार्यस्तु मृत्पिण्डपतनं यथा।।

अनुवाद : धीर पुरुष जरि पडला तरिही चेंडुप्रमाणे उसळी घेई भित्रा परि पडला जर, मातीच्या गोळ्यासम पडुनी राही

अर्थ : धैर्यवान माणूस पडला तरीही तो चेंडूसारखी परत उसळी घेतो; पण भित्रा माणूस मात्र मातीचं ढेकूळ पडलं की जसं पडूनच राहतं, तसा कायमचाच पडतो.

कान्ताकटाक्षविशिखा न खनन्ति यस्य

चित्तं न निर्दहति कोपकृशानुतापः।

कर्षन्ति भूरिविषयाश्च न लोभपाशै –

र्लोकत्रयं जयति कृत्स्नमिदं स धीरः।।

अनुवाद : भेदि न रमणी कटाक्ष ज्याला क्रोधाग्नि न दाहे हृदयाला विषय लोभपाशात न गुंते त्रिभुवन वश त्या धीरनराला

अर्थ : ज्या धैर्यशील पुरुषाला स्त्रीचे कटाक्षबाण भेदत नाहीत, क्रोधाग्नी ज्याच्या हृदयाला जाळत नाही, विषयसुखांच्या जाळ्यात जो ओढला जात नाही तो पुरुष त्रिभुवन जिंकू शकतो.

तरन्ति मातङ्गघटातरङ्गं रणाम्बुधिं ये मयि ते न शूराः।

शूरास्त एवेह मनस्तरङ्गं देहेन्द्रियाम्भोधिमिमं तरन्ति।।

अनुवाद : युद्धसमुद्री गजकाय लाटा, त्यात तरंगे तो नच शूर मनोविकारी लाटांमध्ये देहसमुद्रि तरे, तो वीर

अर्थ : हत्तीसारख्या महाकाय लाटा असलेल्या युद्धरूपी समुद्रात जे पोहतात त्यांना मी शूर मानत नाही. मनोविकारांच्या लाटा असलेल्या देहसागरात जे न बुडता तरंगतात तेच खरे शूर.

चलन्तु गिरयः कामं युगान्तपवनाहताः।

कृच्छ्रे ऽ पि न चलत्येव धीराणां निश्चलं मनम्।।

अनुवाद : प्रलयाच्या वाऱ्याने आहत पर्वत जरि का डळमळती संकट येवो कितिही मोठे, धैर्यवान कधि ना चळती

अर्थ : प्रलयकाळी वाऱ्याच्या आघातानं प्रत्यक्ष पर्वतही हलोत; पण धैर्यवान माणसाचं निश्चल मन कोणत्याही संकटानं चळत नाही.

रत्नैर्महाहैर्स्तुतुषुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिम्।

सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः।।

अनुवाद : समुद्रमंथनि अमोल रत्ने आणि हलाहल वरि आले रत्नांनी ना देव हर्षले नाहि विषाला घाबरले अमृतप्राप्तीपर्यंत त्यांनी प्रयत्न नाही सोडियले निश्चित ध्येयाप्रत जाताना धैर्यवान ना कधी चळे

अर्थ : समुद्रमंथनाच्या वेळी अनमोल रत्नं मिळाली म्हणून देव हरखून गेले नाहीत की हलाहल हे महाविष निघाल्यानं घाबरून गेले नाहीत. अमृतप्राप्ती हे त्यांचं ध्येय होतं आणि ते साध्य होईपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. धैर्यवान हे निश्चित कार्य पार पडेपर्यंत ढळत नाहीत.

स एव धन्यो विपदि स्वरूपम् यो न मुञ्चति।

त्यजत्यर्ककरैस्तप्तं हिमं देहं न शीततांम्।।

अनुवाद : तोचि धन्य, जो संकटातही स्वभाव अपुला ना सोडी रविकिरणांनी बर्फ वितळले, तरि ना थंडपणा सोडी

अर्थ : संकटातसुद्धा जो आपला स्वभाव सोडत नाही तोच खरा धन्य. सूर्याच्या किरणांमुळे बर्फाने जरी आपला देह सोडला, म्हणजेच ते वितळलं, तरी ते आपला स्वभाव, म्हणजे थंडपणा, सोडत नाही.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com